Thursday, May 6, 2010

ट्राफिक: एक गंभीर प्रश्न

काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर ते कर्वेनगर मी १० मिनिटात जायचो, पण हल्ली २५-३० मिनिट लागतात, त्यामुळे विचार केला, च्यायला ह्या ट्राफिकवरती एखादी पोस्ट करावीच!

कारणे तशी भरपूर आहेत, पण काही ठळक करणे आपण इकडे डिस्कस करू :)

माझ्या मते सर्वात मोठं कारण म्हणजे चारचाकी वाहन चालविणारे.. जर आपण पाहणी केली तर १० पैकी फक्त २-३ चारचाकी वाहनात तुम्हाला २ जण बसलेले दिसतील. इतर कार्समध्ये फक्त १ माणूस बसलेला सापडेल. म्हणजे तुम्ही पाहू शकता, एका माणसासाठी एवढे पेट्रोल, रस्त्यावरती एवढी जागा वाया जात आहे आणि प्रदूषणाचाही प्रश्न आहेच की! परवाचीच गोष्ट सांगतो, मी नळस्टॉपच्या सिग्नलला थांबलो होतो आणि थोड्या वेळाने तिथे टोयोटा फोर्च्यूनर कार येऊन थांबली. आईशप्पथ सांगतो, एवढी उष्णता होती त्या कारची, की मला तिथून शेवटी थोडं पुढे जाव लागल! हा, ही एक समस्या. कारवाले मस्त ए.सी. लावून बसतात, पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या ए.सी.मुळे बाहेर किती उष्णता फेकल्या जात आहे!

त्यातल्या त्यात, काही गर्भश्रीमंत लोकांना आजकाल एस.यु.वी. चे फॅड लागले आहे. ह्या गाड्या पेट्रोल किंवा डिझल अक्षरशः गटागट पितात! परिणाम- प्रदूषण, उष्णता, आणि इंधन टंचाई. आणि मी काही गोष्टी पाहिलेल्या आहेत जशा-- सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीस्वार लवकर सुटून जातात, जेणेकरून रस्ता मोकळा होतो, पण चारचाकी वाहनधारक खूपच संथ गतीने गाडी चालवतात, त्यामुळे रस्ता मोकळा व्हायला वेळ लागतो.

दुसरा मोठा प्रोब्लेम म्हणजे पी.एम.टी.. हे पी.एम.टी. चालक भयंकर वेगात बस चालवतात. कित्येक वेळेस त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेले आहेत. बऱ्याच रस्त्यांवरती बी.आर.टी. नाहीये. त्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग बसेस व्यापून टाकतात. त्यामुळे दुचाकी आणि इतर चारचाकी वाहनांना रस्त्यावरती कमी जागा मिळते. कित्येक ठिकाणी तर सिग्नलच्या जवळच पी.एम.टी. चा स्टॉप असतो, मग प्रवासी चढू किंवा उतरू लागले की बाकी वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागते.

थोडा छोटा प्रोब्लेम म्हणजे स्त्री वाहनचालक. जेव्हा मुली किंवा स्त्रिया गाडी चालवतात, तेव्हा मागील पुरुषाला खरच सांभाळून चालवावे लागते. कारण स्त्रियांना ट्राफिक चे नियम जास्ती माहित नसतात, त्यामुळे त्या थोड्या विचित्र गाडी चालवतात. अपघातांना तेवढे कारण पुरेसे आहे, आणि अपघात झाल्यावर साहजिकच सहानुभूती मुलींकडे जाते. त्यामुळे एखाद्या पुरुषाची चूक नसताना सुद्धा त्याला मार खावा लागतो.

द्रुतगती महामार्गांवर तर कारचालक हद्द करतात. परवाचीच गोष्ट सांगतो, मी कापूरहोळ ते पुणे असा प्रवास करत होतो, तेव्हा एक कार माझ्या मागून सुसाट वेगाने पुढे गेली. पाच मिनिटानंतर मला माझ्या दृष्टीक्षेपात माणसांचा घोळका दिसत होता. मी माझा वेग जरा कमी केला, आणि पाहिले तर तीच कार अपघातग्रस्त झालेली दिसली. कारचा अक्षरशः चुराडा झालेला दिसत होता, कोण जाणे तो माणूस जगला का मेला! हे कारचालक स्वतः तर जीव धोक्यात घालतातच, आणि दुसऱ्यांचा सुद्धा जीव घेतात. त्यापेक्षा ट्रकचालक बरे, कारण त्यांच्यात "पेशंस" असतात, आणि कुठे किती वेग घ्यायचा ते त्यांना माहित असत.

कार किंवा दुचाकी वापरावर पूर्णपणे बंदी ही अशक्य आणि मूर्खपणाची गोष्ट होईल, पण खरच काहीतरी निर्बंध असले पाहिजेत, म्हणजे १ माणूस जर कार चालवत असेल तर तो कार ऐवजी दुचाकी वापरू शकतो. किंवा २ पेक्षा जास्त लोक बसणार असतील तरच कारचा वापर करावा. ही सरकारची जिम्मेदारी नसून वैयक्तिक जबाबदारी आहे असे मला वाटते. कारण जे दुष्परिणाम होतील, त्याला शेवटी आपल्यालाच सामोरे जाव लागणार आहे. कधी कधी सायकलचा वापरसुद्धा केला पाहिजे (हे मला सुद्धा लागू होईल), ह्याने ३ फायदे होतील, इंधन बचत, प्रदूषणावर कंट्रोल आणि वाहतूक सुरळीत होईल.

जाउद्या, च्यायला हे नेहमीच चालू राहील आपल्याकडे. कोण ऐकतंय?
आपण आपल्याला जे शक्य आहे ते करावे!

-पी.के.

No comments: