Monday, May 10, 2010

लोकमत जाहिरात

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सकाळ-सकाळी काय मस्त झोप लागते (हिवाळा असल्यामुळे), बहुतेक साखरझोप म्हणतात ती हिलाच की काय! पण ह्या वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मला साखरझोप अनुभवताच नाही आली, मग काय! रोज सकाळी एक रिक्षावाला आमच्या रूमच्या खाली येऊन थांबायचा, आणि लगेच मोठ्या आवाजात एक गाणं लावायचा -- "वाचका, कोणते वृत्तपत्र घेऊ हाती..", तसं पाहिलं तर चाल एका गाण्याची घेतली आहे त्यांनी, ते गाणं झेंडा चित्रपटातील आहे- "विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती" मूळ गाणे फार छान आहे. पण हा गायक यार.. अक्षरशः बरळतो.

तो रिक्षावालासुद्धा भल्या पहाटे यायचा, म्हणजे सकाळी ६.३०-७.०० वाजता, आणि मी लगेच खडबडून उठायचो. मग घड्याळात पहायचे, किती वाजलेत बघू? च्या मारी! आत्ता ६.३० झालेत, झोपा अजून! पण झोप काही यायची नाही. कधी कधी थोडा डोळा लागायचा, की लगेच चालू.. वाचका कोणते वृत्तपत्र घेऊ हाती.. लोकमत फक्त एका रुपयात.. लोकमत फक्त एका रुपयात..

मी एके दिवशी विचार करत होतो, च्यायला ह्या रिक्षावाल्याच डोक दुखत कस नसेल? एके दिवशी त्या भल्या माणसाला पहायचा योग आला, हा कानात मस्त हेडफोन टाकून बसला होता! मी म्हटल बर आहे, आपण छान गाणी ऐकायची आणि इकडे दुसऱ्यांची झोप उडवायची..

मी एवढा चिडलो होतो त्या जाहिरातीवर, की एके दिवशी मला स्वप्न पडल, तो रिक्षा सकाळ-सकाळी आला, आणि जोरजोरात ती जाहिरात वाजवू लागला. मी चिडून उठलो, आणि एक चेंडू हातात घेतला, (हा तो स्पंज सारखा चेंडू आहे, ज्यावर स्माईली असते) गच्चीवर गेलो आणि त्या रिक्षावाल्याला फेकून मारला. पण तो रिक्षावर टप्पा खाऊन बाजूच्या मिठाईवाल्याच्या तेलाच्या कढईत पडला. तो माणूस वडापाव तळत होता, आणि त्याने तो तळलेला चेंडू एका माणसाला पावमध्ये घालून दिला, आणि त्या माणसाने तो खाल्ला सुद्धा! खाल्ल्यावर त्याला म्हणाला, आज पाव लई भारी झाला होता, मस्त मऊ होता.. मी पळत जाऊन झोपी गेलो.. आणि सकाळी उठल्यावर स्वतः वरच हसत होतो..

आता ती जाहिरात बंद झालीये. आणि वेगळीच कुठली तरी जाहिरात चालू केलीये त्या लोकमतवाल्यांनी. काही का असेना, आता मी माझी रूम बदलली आहे म्हणून झोपमोड होत नाही :) पण हे स्वप्न मात्र एक नंबर वाटल. म्हणून म्हटल पोस्त करूनच टाकाव.. त्यासाठी हा उपद्व्याप!

-पी.के.

No comments: