Thursday, February 28, 2013

भैरोसिंग (बंटी)

बंटी म्हणजे आमच्या ताफ्यातला मोठ्ठा प्राणी. पूर्ण नाव-- यशवंत जीवनराव देशपांडे. 
खूप दिवसांआधी यांच्या नावाने एक पोस्ट टाकली होती, पण त्या वेळी याचं वर्णन अतिशय कमी शब्दांत झालं होतं. खरं तर यांच्या देहयष्टीच्या मानाने तेवढी छोटी ब्लॉग पोस्ट म्हणजे लज्जास्पद ठरेल, म्हणून परत एकदा व्यक्तीवर्णन!

बंटीचं मूळगाव अजून कुणालाही ठाऊक नाही, ते एक न समजणारं कोडं आहे. हिंगोली, वसमत, नांदेड, की यमलवाडा यावरून सगळ्याचं दुमत होतं. बंटी सांगायचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी कोडं तितकंच किचकट होत जातं, म्हणून आम्ही याविषयी अति विचार करणं सोडून दिलंय. 

बंटीची आणि आमची ओळख फर्स्ट इअर पासून. एकदा असंच कॉलेजच्या कोरीडॉरमधून फिरत असताना बंटी पळत आला, आणि फ्रेशर्स पार्टी मध्ये येण्याचं आमंत्रण देऊ लागला. १-२ दिवसांनंतर भार्ग्या कडून कळलं की बंटी त्याच्या सोबत एन. एस. बी. कॉलेजमध्ये होता. फर्स्ट इअर मध्ये त्यानंतर बंटीचा आणि आमचा जास्त काही संपर्क नाही झाला. 

सेकंड इअरचे डिजिटल इलेक्ट्रोनिक्स आणि बेसिक इलेक्ट्रोनिक्स म्हणजे बंटी आणि टोळीची दुखती नस. भार्ग्या च्या ओळखीमुळे डक्क्याची आणि माझी दोस्ती जमली, आणि तो माझ्यासोबत बसायचा, आणि त्यामुळे बंटीभाऊ आणि टोळी आमच्यासोबत चिकटली. त्यावेळी बंटीभाऊ सोबत बिल्डर घेऊन फिरायचे, म्हणून कॉलेजमध्ये एक 'दरारा' असायचा. वर्गात आणि   Practical मध्ये विनाकारण खी-खी करणे ही या टोळीची खासियत. यांच्यामध्ये बाजीराव सुद्धा शामिल होते. 

दरम्यान, बंटीला एकदा कानाचा आजार झाला आणि कमी ऐकू यायला लागलं. बंटीचं 'भैरोसिंग' असं  नामकरण व्हायला एवढं कारण पुरेसं होतं. त्यानंतर बंटीने बरेचदा सिद्ध करून दाखवलं की त्याला खरंच बहिरेपण आलंय. मग ते मोबाईल ऐकू न येणे असो, की ड्रील मशीनचा आवाज विमानासारखा वाटणे असो. 

सेकंड इअर च्या शेवटी ही टिंगल टवाळी बंटी आणि बिल्डरला महाग पडली, आणि तीन-चार विषय घालून एक वर्ष घरी बसले. बंटी म्हणजे एवढी प्रसन्नमूर्ती की, आपलं वर्ष गेलंय त्याच्या दुःखापेक्षा शत्रूचे १-२ विषय घातले याचं त्यांना समाधान! त्यात कहर म्हणजे बंटीभाऊंनी लेक्चररसोबतच्या एका भांडणात नाहक आम्हाला अडकवल होतं :) आम्ही साफ सुटलो, पण बंटी पुरता अडकला होता. 

असो, एक वर्ष कम्प्लीट झालं आणि बंटी परत कॉलेजमध्ये रुजू झाला. नवीन मित्र भेटल्यामुळे बंटीचा आणि आमचा संपर्क तसा तुटलाच. पण मी रोज भाग्यनगरची वारी करायचो म्हणून बंटी अधून मधून भेटायचा. पण टी. वी. च्या अतूट प्रेमापोटी तो आमची भेट बरेचदा टाळायचा. बालिका वधू आणि तत्सम 'सास-बहु' सिरिअयल्स म्हणजे त्याचे फेवरेट कार्यक्रम. अजूनही त्याला सगळ्या पात्रांची नावं तोंडपाठ आहेत. 

आमचं कॉलेज जीवन संपलं आणि आम्ही नोकरी निमित्ताने पुण्याला आलो. अधून मधून बंटी आम्हाला फोन करत असे. नांदेडला गेल्यावर त्याची आणि आमची भेट ठरलेलीच असायची पण इथे सुद्धा 'सास-बहु' आडव्या यायच्याच. 

बंटीने फायनल इअर डिस्टींक्शन घेऊन काढलं आणि थेट आमच्या रूमवर अवतीर्ण झाला. रूमवर आल्यावर कसून तयारी चालू झाली आणि काही महिन्यातच बंटीने नोकरी मिळवली. 

बाहेरच्या जेवणावर बंटी आधीपासूनच नाराज असायचा. जेवण घरी बनवायला सुरु केलं, आणि बंटीच्या कलागुणांना वाव मिळाला. रोज नवनवीन पदार्थ आम्हाला खायला मिळत आहेत. तसंच बंटीच्या वसमत वारीनंतर नवनवीन शब्द सुद्धा शिकायला मिळतात. 

उदा. 
१. सिनेमात एखादा इरोटिक सीन आला तर -- हिरो हिरोइनचा 'हिसाब' करत आहे. 
२. जेवण 'नंबर एक' झालंय . 
३. 'वन साईड' खाल्लं (म्हणजे खूप खाल्लं). 
४. आज 'आवताण' आहे (आमंत्रण)

मागे काही दिवसांआधी आम्ही ट्रिप्स आयोजित केल्या होत्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली कि बंटी जास्त फिरला नाही, आणि मित्रांसोबत एखाद्या ट्रीपला जाण्याची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावरून साफ दिसते. लगेच अंगाला गुदगुल्या होणे, अति एक्साईट होणे हे गुणधर्म. 

त्यातल्या त्यात कुणाच्या हातात केमेरा दिसला तर बंटी सहनशीलता सोडून फोटोसाठी तयार होतो. मग समोरच्या माणसाला फोटोग्राफी सोडून पोट्रे काढावे लागतात. मागे दिवेआगरच्या पोस्ट्स मध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की एस. एल. आर. केमेरा असून सुद्धा मला 'नेचर फोटोग्राफी' करता आली नाही :P 

तर असा हा बंटी. अजून काही गोष्टी आहेत, त्या लिहिल्या तर बंटी हाणेल. म्हणून पोस्ट आटोपतो. 

-पी. के. 

Wednesday, February 27, 2013

निख्या

पंक्यानंतर कुणाचं नाव जास्त घेतलं असेल तर तो म्हणजे निख्या. पूर्ण नाव - निखील चंद्रकांत जोशी. 
निख्याची आणि माझी ओळख सेकंड इअरच्या पहिल्या क्लास मध्ये झाली. निख्याने फर्स्ट इअर मध्ये माती खाल्ली होती, म्हणून एक वर्ष कुत्रे मारत बसला होता आणि मग आमच्या सोबत जॉईन झाला. 

त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजी सहसा कोणी बोलत नव्हतं. फर्स्ट इअर मध्ये माझे जास्त कोणी मित्र नव्हते, होता तो फक्त भार्ग्या. तो गेला इलेक्ट्रोनिक्स मध्ये. मी एकटा बसलो होतो, आणि थोड्या वेळात निख्या माझ्या बाजूला येउन बसला. जे फाड फाड इंग्रजी बोलायला चालू केली त्याने… बाप रे…. आम्ही राहिलो गावठी मानसं. निख्याला काय उत्तरं द्याव! तरी कसा बसा दिवस काढला. 

नंतर नंतर निख्याने त्याचे कारनामे दाखवायला चालू केले. हातावर, अंगावर काहीबाही लिहिणे…. वर्गात पच्चकन काहीतरी बोलणे…. आणि असं काही करून लोकांच्या शिव्या खाणे हे त्याचे आवडते छंद! 

असाच एक किस्सा सांगतो- एके दिवशी निख्याच्या हातावर लिहिलं होतं-- "आज समोसा खायचा नाही". आम्ही विचारलं - "का रे भाई?" तर निख्याचं उत्तर--"आज चतुर्थी आहे. आज उपवास आहे, म्हणून समोसा खायचा नाही"
घ्या. एवढ्याश्या गोष्टी साठी अंगावर लिहून घेतलं. 

अजून काही उदाहरणं-- "आज पेट्रोल भरायचं आहे"
"आज बुधवारचा बाजार आहे".  हे कशासाठी? तर आज गाडी दुसर्या रस्त्याने न्याव लागेल. ते लक्षात राहिलं पाहिजे!

१-२ वर्षाखाली गजनी पिच्चर पाहिला, आणि लगेच निख्याला फोन लावला. अबे तू केस ठोक. त्याने तुझ्या जीवनावर मूवी बनवलीय ;)

त्यावेळी निख्या अवास्तव वादावादी करायचा. खासकरून त्रिवेदी सरच्या लेक्चरमध्ये दिसून आल्यासारखं करत होता. ऐन क्लास संपायची वेळ आली, कि ह्याला काहीतरी डाउट मिळायचे. इथंही शिव्या खाउन घेत होता, आणि त्याचं पोट भरत होतं. 

थर्ड इअर च्या आसपास त्याने अजून चाळे चालू केले. लोकांकडे बारकाईने पहायचं आणि त्यांच्या नकला मारायच्या. मग लेक्चरर कसे शिकवतात, मी फोन कसा उचलतो, श्रीकांत्या कसा चालतो, बारकं कसं चालते ते सगळं दाखवायचा. मागे मी एकदा प्रोजेक्ट बद्दल लिहिलंच होतं, तेव्हा श्रीकांत्या आणि निख्या रोज हाणामारी करून धुमाकूळ घालत होते. 

अरे हो, निख्यात आणि माझ्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे आमच्या दोघांच्या बापाचं नाव चंद्रकांत होतं, आणि दोघांचे बाप स्वभावाने जवळपास सेमच! कधी बसलो की आमचं डिस्कशन सुरु व्हायचं की सगळे चंद्रकांत नावाचे मानसं कसे सर्किट असतात ;)

इकडे पुण्यात आल्यावर निख्या रूम पार्टनर झाला, आणि रोजचाच धिंगाणा चालू झाला. मला अजूनपण आठवतंय पंखा चालू ठेवायचा की नाही यावरून एकदा मारामारी झाली होती. सांगायचं तात्पर्य हेच, की युजुअली त्याचेच बाकीच्यांशी भांडणं व्हायचे, आणि तेही क्षुल्लक गोष्टींवरून ;)

मूवी बघायचा नाद त्याच्या एवढा कोणालाच नाही. त्याला कोणाची सोबत लागायचीच नाही. शनिवार असला की ह्याने एखादी मूवी प्लान केलेलीच असायची आणि मग अलार्म लावून उठायचा. ते पण अलार्मच्या आधी उठून अलार्म कधी वाजतो त्याची वाट पहायचा :P आणि एकदा परत आला की मूविच्या पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंतची स्टोरी सांगितली नाही तर नवलंच!

शहाण्याने निख्याला रस्ता विचारू नये! त्याचे स्वतःचेच लेफ्ट-राईटचे कन्सेप्ट्स चुकीचे आहेत, आणि विचारणारा माणूस भरकटलाच म्हणून समजा!

एकदा आम्ही असंच बाजीरावच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुरंदर किल्ल्यावर गेल्तो. त्यावेळी त्याने अन्याची जी घेतली!!! अन्या जोरजोरात हसायचा, आणि हा तिथ सगळ्यांना सेम तसंच हसून दाखवू लागला. किल्ल्यावरचे येणारे जाणारे परेशान, हे पोरगं असं का करायले? अन्या इतका चिडला की आता निख्याला मारतोच म्हणून बसला! ;) 

पण नंतर काही दिवसांनी निख्याचा स्वभाव बदलला, आणि भयानक मनमिळावू झाला. आजच्या घडीत एकच पोट्ट आहे, जे सगळ्यांच्या संपर्कात आहे. आणि सहसा कुठल्याच गोष्टींचा राग मानून घेत नाही. काही दिवसांनी निख्या पुणे सोडून गेलं आणि बेंगलोरला स्थाईक झालं.
 
आता तिथं नवीन नाटक चालू झालेत. उगाचच अंगावर टेटू काढून घेतंय. 
पाहू, निख्या काही दिवसात पुण्याला यायची प्लानिंग करतोय. ते इकडं आलं, की परत पहिले पाढे पंचावन्न होतीलच!

-पी. के. 

Wednesday, February 20, 2013

पंक्या

माझ्या बऱ्याच ब्लॉग पोस्ट्स मध्ये मी माझ्या मित्रांबद्दल लिहिलं आहे, पण कधीच त्यांची ओळख नाही लिहिली. आता एकेक करत सगळ्या कार्यकर्त्यांबद्दल लिहावं म्हणतो. सुरुवात पंक्यापासूनच झाली पाहिजे. 

पंक्या काही कॉलेजचा दोस्त नाही, मी जेव्हा कॉलेज सोडून कंपनी जॉईन केली, त्या दिवशी पंक्याची आन माझी भेट झाली. ठिकाण होतं कंपनीचं ऑफिस-- आम्ही सगळे चोर धरून आणल्यागत उभे होतो. आमच्या कॉलेजचा मी फक्त एकटा कार्यकर्ता सेलेक्ट झालो होतो, त्यामुळे माझे कोणी मित्र नव्हते. म्हणायला तसा बंटी होता माझ्यासोबत, तो नांदेडच्याच दुसऱ्या कॉलेजमधून आला होता. 

मी आन बंटी जरा गप्प गप्पच बसायचो, पण पंक्या आणि त्याच्या कॉलेजचे बाकी पोट्टे खी-खी करायचे. आमचं इंडक्शन चालू झालं, आणि हळू हळू पोट्यांची ओळख होऊ लागली. महिन्याभराने मी कंपनीने दिलेली हॉटेलची रूम सोडली, आणि कर्वेनगरला शिफ्ट झालो. इथून येणं-जाणं श्रीकांत्याच्या बाइकवरच.

पंक्या राहतो वडगावला, आणि जाता जाता राजाराम पूल लागतो. मग पंक्या माझ्यासोबत यायचा, मी त्याला राजाराम पुलाजवळ सोडून पुढे जायचो. त्यावेळी मी जरा रिजर्व्ड टाईपचाच होतो, आणि कधी कधी रूमपार्टनरला पिक अप कराव लागायचं म्हणून पंक्याला दुसरा ऑप्शन पहाव लागायचा. 

पण नंतर मी स्वतःची गाडी घेतली, आणि पंक्याची आणि माझी चांगलीच दोस्ती झाली. हार्डली असा एखादा दिवस जायचा की मी आन पंक्या सोबत घरी गेलो नाही. ऑफिसमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता सोबतच व्हायचा. 

ओळख झाल्यापासून थोड्याच दिवसात आम्हा दोघांना कळल की आम्ही दोघे एकाच केटेगरीचे आहोत, मग काय! रोज धिंगाणा चालू झाला, उठता बसता शिव्या चालू झाल्या. नव-नवीन शिव्या आम्ही शोधून काढायचो. कधीकधी नवीन म्हणी सुद्धा बनवायचो. मागे एका ब्लॉग पोस्ट मध्ये बोललोच की आम्ही गाण्यांना सुद्धा सोडलं नाही. 

पुण्यात नवीन असताना मी माझ्या कोलेजच्या मित्रांना प्रायोरिटी द्यायचो, पण आता पंक्या आणि बाकी ऑफिसचे पोट्टे जिगरी दोस्त बनले. पंक्या एवढा खास, की आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो- घरचे प्रॉब्लेम्स, गर्लफ्रेंडचे लफडे (म्हणजे एकेरी लफडं असो, की दोन्ही बाजूने), आणि बरंच काही. 

कहर तर तेव्हा झाला जेव्हा आमचा डेस्क शिफ्ट झाला आणि आम्ही दोघे एकमेकांच्या बाजूला बसायला लागलो. आमचं काही नाही, पण आजूबाजूच्या लोकांना आमच्या शिवीगाळीची सवय झाली :) आधी त्यांना जरा आमचं बोलणं आक्षेपार्ह वाटायचं. पण नंतर त्यांना कळून चुकलं की हे पोट्टे सुधारणारे नाहीत, आपणच बदलावं. त्यांचा तो डिसिजन चांगला होता. 

तसं पाहिलं तर पंक्या पटापट दोस्त बनवतो. रिसेंटली तो दुसऱ्या टीममध्ये शिफ्ट झाला, आणि २-३ दिवसातच त्याने तिकडेपण टोळी बनवली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला राग लई कमी येतो. आणि प्रत्येक गोष्ट लाईटली घ्यायची सवय असल्यामुळे लोकही लवकर कनेक्ट होतात. पंक्यामुळे पारेख, अप्पी आणि बाकी पोट्टे आमच्या ग्रुप मध्ये आले, त्यांच्या बाबतीत नंतर कधी लिहीन. 

जरी पंक्या आता दुसऱ्या टीम मध्ये गेला, तरी आमचा धिंगाणा काही कमी नाहीये. सकाळी सकाळी ९ वाजता मी ऑफिसला येतो, तेव्हा अर्ध्या वाटेत असतानाच पंक्याचा पिंग येतो-- "लई भूक लागलीय, कधी येणारेस?".  अजूनही आमचा ब्रेकफास्ट सोबतच होतो, आणि मग खाली टपरीवर जाउन स्पेशल चाय. तिथंही वाह्यातपणा अजूनही चालूच आहे. विशेष म्हणजे टपरीवाला पण कधी कधी आमच्या वाह्यातपणात सहभागी होतो :)

तर असा हा पंक्या. लिहायला भरपूर काही आहे, पण नेमकं आत्ता लक्षात येत नाही :)

-पी. के. 

Thursday, February 7, 2013

कुत्री ("कुत्रा" शब्दाचं अनेकवचन)

हा काय विषय आहे का? अरे, पण ब्लॉगचं नावच उगाच काहीतरी आहे, म्हणून मी काहीही लिहू शकतो.
तर विषयाला लगेच हात घालू. 
माणसा खालोखाल पृथ्वीवर कुणाची संख्या जास्त असेल, तर मला वाटत की कोंबड्या आणि कुत्री. 
ता.क.: आता यात वाद घालण्यात काहीही अर्थ नाही, की कोंबड्या जास्त, की कुत्रे जास्त कि मुंग्या. मी बोलतोय म्हणलं की हं म्हणायचं.

तसं कुत्र्याचं आमच्या घरी सगळ्यांनाच वेड. आत्ता पर्यंत आम्ही २-३ कुत्रे पाळले असतील. ती गोष्ट वेगळी आहे म्हणा, कुत्रे कधी विकत नाही आणले. आमच्या मायबापांना लई हौस. एखादं पिल्लू गोंडस दिसलं की घाला त्याला पोळी, आणि आणा रोजचीच कटकट.

एक कुत्रा पाळला होता, आईनं त्याचं नाव 'ब्राउनी' ठेवलं. का? तर ब्राउन कलरचे ठिपके त्याच्या अंगावर होते. त्याला रोज चांगलाच खुराक असायचा. कधीकधी तर आई त्याला दुधात पोळी कुस्करून खाऊ घालायची. त्यावर माझा टोमणा-- "स्वतःच्या लेकरांना कधी कुस्करून खाऊ घातलं नाही, कुत्र्यांची लई माया!".
त्यावर आई म्हणायची-- "शिक त्याच्याकडून. तुझ्या पेक्षा जास्तच ऐकतो तो माझं. कमीत कमी घराकडे लक्ष तरी असतंय त्याचं".

एक भारी गोष्ट म्हणजे त्याला लहान मुलांची फार एलर्जी होती. गेटजवळ मुलांच्या खेळण्याचा आवाज आला तरी हा भुंकत जायचा. एके दिवशी चुकून कुणीतरी गेट उघडं ठेवलं, आणि समोरच्या शाळेचे पोट्टे खिदळत चालले. ब्राउनीचा राग अनावर झाला आणि लेकरांच्यामागे सुसाट लागला. 
सीन असा होता-- लेकरं पुढे.. त्यांच्या मागे ब्राउनी आणि त्याच्या मागे मी. कसं बसं १००-२०० मीटरची शर्यत झाल्यावर ब्राउनीला गाठलं, आणि सगळ्यात आधी त्याच्या साखळी वर पाय ठेवला. लेकरं आणि मी पळू-पळू दमलो, पण हा साला फुल मूडमध्ये होता.
 
मला फार सवय होती.. येता-जाता त्याच्या कानफाडीत झापड मारायची. आधी तो लहान असताना क्वाय-क्वाय करून बोम्बलायचा. पण नंतर नंतर त्याने दादागिरी चालू केली. एके दिवशी अशीच जोरात कानशिलात हाणली, आणि त्याने माझा तळहात चावला. ब्राउनीनं 'कुत्र्या'सारखा मार खाल्ला त्यादिवशी. पण माझ्या चुकीमुळे बिचाऱ्याला बेघर व्हाव लागलं. काय शिव्या खाल्ल्या मी आईच्या.. बाप रे. एक तर ब्राउनी घर सोडून गेला, आणि दुसरी गोष्ट मला ४ इंजेक्शन्स घ्याव लागले होते.

त्यानंतर कुत्रे आणि माझ्यात हाडवैर झालं. याचा अर्थ असा नाही, की मी कुत्र्यांना भ्यायला लागलो.
काही दिवसांनी कळलं की माझ्या भरपूर मित्रांना कुत्र्यांची भीती वाटते. उदा. अज्या, डक्क्या, इ.

अज्या तर कहर होता. रात्री आमची मीटिंग संपली, आणि घरी जाताना गल्लीच्या तोंडाशी एखादा कुत्रा दिसला, तर अज्या तासंतास तिथंच बसून राहायचा. जेव्हा तो कुत्रा तिथून निघून जाइल तेव्हाच अज्या घरात जाई.

पंक्या आणि मी चहा पिताना कुत्र्यांचे डिस्कशन करतो. म्हणजे हा कुत्रा आता काय बोलत असेल? समोरच्या कुत्र्याची काय प्रतिक्रिया असेल? असं.

मागच्या दिवाळीला डक्क्याने कार घरी घेऊन जायचा प्लान ठरवला. जाता जाता एक कुत्रा त्याने यमसदनी पाठवला. त्यानंतर प्रत्येक कुत्रा त्याचा वैरी झाला. परवा आम्ही लोहगडावर चाललो होतो, आणि वाटेत बरेच कुत्रे दिसले. आम्ही त्यांना हाय-बाय करत चाललो होतो, पण एका कुत्र्याने डक्क्याची हलकट नजर ओळखली आणि आमच्या मागेच लागला. डक्क्या एवढा दचकला की त्याने चौधरीची अनमोल बॉटल हातातून सोडून दिली. नशीब, माझा मोबाईल फेकला नाही. एकवेळ माझा मोबाइल पडला असता तर मी कमी शिव्या दिल्या असत्या. पण चौधरीने अर्धा तास डक्क्याचा दिमाख खाल्ला. का? तर बॉटल पाडली! ती पण कुत्र्याच्या भीतीने!

असो, श्वान-पुराणात इतकंच!

-पी.के.