Friday, November 30, 2012

गोवा

पोस्टचं नाव वाचून तुम्हाला वाटल की आम्ही गोव्याला जाऊन आलो, आणि आता मी गोव्यातल्या गोष्टी सांगणार आहे. गलत!
झालं काय, की मागच्या एपिसोड (ब्लॉग पोस्ट) मध्ये मी बोललो होतो ना, की  महाबळेश्वरवरून माणगावला जाताना डक्क्याने गाडी गोवा हायवेने घेतली होती. त्या वेळी मी, बारक्या आणि भैऱ्याने स्वप्न रंगवलं. डक्क्याची कार, डक्क्या आणि आम्ही तिघं असा प्लान होता. असंच डिसेंबरमध्ये जाऊ बोललो होतो.

पण दिवाळीत डक्क्यानं आमच्या आनंदावर विरजण घातलं. घरी कार घेऊन गेलं आणि तिथंच ठेऊन आलं! काय शिव्या खाल्ल्या त्यानं, विचारू नका.. भैरं तर येता जाता त्याचं डोकं खायलय!

एक उदाहरण सांगतो. परवा 'दिल चाहता है' पाहू लागलो. डक्क्या बाजूलाच बसलं होतं. पिक्चर थोडा पुढे गेला आणि ते तिघं गोव्याला निघतात. लगेच मी आणि भैऱ्याने पिक्चर ठेवला बाजूला, आणि डक्क्याला घेतलं.
"मायला रे.. बघा ते पोट्टे गोव्याला चालले.."
"आमचे मित्र बघा.. असलेली गाडी घरी ठेऊन येतेत"
"आमचं गोवा जायचं स्वप्न बहुतेक स्वप्नंच राहील.."
"आमच्याकडे गाडी असती, तर पोट्यांना दुनिया दाखवून आणली असती.."

हे तर झालं त्या दिवशीचंच! एरव्हीसुद्धा डक्क्याला ही डोकेदुखी झालीय.
परवाच आम्ही 'बसलो' होतो. कधी नाही ते डक्क्यापण आलं त्या दिवशी. सहजंच कोणीतरी गोव्याचा विषय काढला आणि झालं.. मग काय.. अर्धा तास तेच चाललं. दुसऱ्या दिवशी पाजी मला सांगू लागला 'अबे, त्याला एवढं घेत जाऊ नका... काल चिडल होतं ते'
आमचा पाजी लई ग्रेट माणूस. ह्याबद्दल डक्क्याला विचारलं तर ते म्हणलं 'मला कधी तरी रागात येताना पाहिलंय का? पाजी काही म्हणते'

तर डक्क्यानं राग मानून घेतला नाहीच, पण नांदेडला गेल्यावर त्यानं माझ्यासाठी सेकंड हेंड कार मात्र पाहिली. मी त्याला नेहमी म्हणत असतो, तुझी कार विक बे मला.. तू नवीन घे. चुकून घरी म्हणलं काय कि ते.. घरच्यांनीच माझ्यासाठी दुसरा ऑप्शन दिला :)

तर असं आहे ते.. लोकांना वाटते मजा आहे.. बघू, गोवा कधी नशिबात लिहिलाय!!

-पी.के.

Saturday, November 17, 2012

वाघ

आधी आम्ही नांदेडच्या सिडको मध्ये राहायचो. आधी म्हणजे मी बराच लहान होतो तेव्हाची गोष्ट.
त्या काळी नांदेडमध्ये शिवसेनेची चलती होती. आ. प्रकाश खेडकरसारखे नेते शिवसेनेत होते. जागोजागी शिवसेनेचे बोर्ड असायचे. त्यावेळी फ्लेक्स प्रिंटींग वगैरे काही नव्हत्या, ओईल पेंट मध्ये सगळे बोर्ड बनवले जात. एका बाजूला पिवळ्या आणि काळ्या रंगाने बनवलेला वाघ आणि दुसऱ्या बाजूला श्री. बाळासाहेब ठाकरे.

त्या वयात जास्त काही कळायचं नाही, पण एवढं नक्कीच माहित होतं कि हे चांगलंच मोठं व्यक्तिमत्व आहे. एवढं मोठं नाव, कि ज्यांच्या एका शब्दावर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठायचा. कधी चुकून बाळासाहेबांवर कुणी प्रक्षोभक विधान केलं तर अख्खा महाराष्ट्र बंद व्हायचा. तेव्हा एवढंच कळायचं- शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे, आणि बाळासाहेब म्हणजे वाघ.

नंतर जसं जसं कळायला लागलं तसं तसं बाळासाहेबांबद्दल वाचायला मिळालं, ऐकायला मिळालं. प्रत्येकाचे वेगळे राजकीय मत असतात, पण मी स्वतः बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होतो, राजकीय असो किंवा वैयक्तिक. त्यांची भरपूर राजकीय भाषणे ऐकली आणि भरपूर लोकांकडून बाळासाहेब एक "माणूस" म्हणून कसे आहेत हे हि ऐकलं. त्यामुळे एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा पटायचे, आणि एक माणूस म्हणून सुद्धा.

जेव्हा कधी बाळासाहेब टी.व्ही.वर बोलायचे, तेव्हा मी आणि माझे रूम पार्टनर आवर्जून ते भाषण ऐकायचो. त्यांची एक अलग स्टाईल होती, मी अजून तरी असा रोखठोख बोलणारा नेता पाहिला नाही. 

परवा दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच भाषण ऐकलं, आणि त्यांचा थकवा स्पष्ट जाणवला. पण ते एवढ्या लवकर सोडून जातील असं वाटलं नाही. १९६६ पासून मराठी माणसांसाठी लढणारा वाघ काल सोडून गेला.


बाळासाहेबांना विनम्र आदरांजली.

-पी.के.

Thursday, May 3, 2012

माझा आणि पंक्याचा वात्रटपणा

मागे एक पोस्ट लिहिली होती, ज्यात मी बोललो की मी आणि पंक्या गाण्यांची आई बहिण करतो. त्याच संदर्भात ही पोस्ट.
४-५ दिवसाआधी मी आणि तो ऑफिसला येत होतो. आणि त्या दिवशी त्याला कुठलेसे जुने गाणे आठवले. ते बहुतेक ऋषी कपूरचे होते.
आठवतंय का-- "ओम शांती ओम"?

तर झालं काय, तो आणि मी अर्ध्या रस्त्यात आलो, आणि सिग्नलवर थांबलो. आणि पंक्या म्हणजे सगळे काम व्यवस्थित करणार. त्याने गाणे अगदी सुरुवातीपासून म्हणायला सुरुवात केली.
ऋषीकपूर-- तुमने कभी किसी से कभी प्यार किया?
ऑडीयंस-- हां किया!
ऋषीकपूर-- तुमने कभी किसी को दिल दिया?
ऑडीयंस-- हां दिया!
ऋषीकपूर-- मैने भी दिया!

लगेच क्षणार्धात माझा रिप्लाय-- ओळखा पाहू ;) युजुअली माझ्या जवळच्या मित्रांना माझा रिप्लाय माहित असावा ;)


दुसरा क्षण आजचा. आज येताना कुठेतरी नाव वाचलं- बाय द वे. मी पंक्याला म्हणालो, इथे फक्त एक अक्षर चेंज करायची गरज आहे, आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आवडीचं नाव बनेल ;)
इथे सुद्धा, आमचे जिवलग मित्र ओळखून चुकले असतील, मला कुठलं अक्षर चेंज करायचं होतं ते!

तर असा आमचा वात्रटपणा :)

-पी.के.

Wednesday, April 18, 2012

विदर्भ आणि मराठवाडा

परवा राजू, डी.डी. आणि भैरोसिंघ जेवत होते, आणि त्यावेळी भाषेवरून काही तरी बाचाबाची झाली. राजू आमच्या भैरोसिंघाला म्हणायला लागला, तुमची नांदेडची भाषा लईच अलग आहे. मी पहिल्यांदा नांदेडला आलो, तेव्हा कुणीतरी मला म्हणाला "उभं टाक", मला खुप हसायला आलं.

भैरोसिंघाने कारण विचारलं, तर राजू म्हणे की त्यांच्याकडे "उभं राहा" असं बोलतात. मग ह्या विषयावर वाद चालू झाला की कोणतं वाक्य बरोबर. रोख माझ्याकडे वळला. मी कारणमीमांसा करायला लागलो.
राजूला मी उदाहरण दिलं-- "तू कधी असं वाक्य ऐकलय का-- देव विटेवरी उभा ठाकला"? त्यावरूनच उभं टाक हा शब्द आमच्याकडे आला! ह्याचा अर्थ असा, की मराठवाड्याची भाषा शुद्ध आहे, तुमच्यासारखी नाही ;)

शेवटी डिस्कशन बंद करायचं होतं, म्हणून मी आमच्या स्टाईल मध्ये एक वाक्य जोडलं-- "काय आहे न राजू, माणसाचा मूड पाहिजे. मूड असला की काहीही करता येतं. उभं राहता ही येतं आणि उभं टाकताही येतं ;)"

-पी.के.

Tuesday, April 17, 2012

वात्रट

आज मी आणि पंक्या ऑफिसहून घरी निघालो. उशीर झालेला होता, आणि रस्त्यावर चांगलीच गर्दी होती. जीव मुठीत घेऊन कसा बसा डेक्कन कॉर्नर पर्यंत आलो. सिग्नल लाल झाला, आणि गाडी थांबली. बाजूला पी.एम.टी. थांबलेली होती, आणि इंजिनची गर्मी आम्हाला जाणवत होती.

पंक्या मला म्हणाला, बसचं इंजिन केवढं गरम आहे बे! मी म्हणालो- थांब, ड्रायवरला इंजिन बंद करायला सांगू का? पंक्या खरंच ड्रायवरला बोलला- "काका, इंजिन खूप गरम झालंय, बंद करता का?"

ड्रायवर आमचा बाप निघाला. त्याचा मार्मिक आणि वात्रट रिप्लाय-- "काय आहे न, भाद्रपदात कुत्री आणि उन्हाळ्यात इंजिन गरम होतातच!". पंक्या आणि मी अचाटच, कारण आमच्या मते आम्हीच सर्वात जास्त हलकट आणि वात्रट! पण आज आम्हालाही टफ कोंपीटीशन देणारा कुणी मिळाला :)

-पी.के.

Thursday, March 29, 2012

दिवेआगर प्रवास

जवळपास अडीच ते तीन वर्षांनंतर लांबचा प्रवास करायची आमची मनीषा जागी होऊ लागली. परंतु साथ मिळेना. मित्रांना कुठेतरी लांब फिरायला जाऊ म्हणल्यावर एकही जण तयार होत नव्हता, म्हणून आमची मनीषा मनीच राहिली. अनायासे ह्या वीकेंडला पाडव्याची सुट्टी आली, आणि तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या. आमचा अग्निमित्र नारा, त्याला मी १-२ वेळेस विनवणी करून पहिली, आणि तो तयार झाला. दोघांकडेसुद्धा 'खास' कारण होतं प्रवासासाठी. दोघांनीही नवीन महागडे कॅमेरे घेतले, परंतु कुठे फिरायला गेलोच नाही, म्हणून दोघांमधला फोटोग्राफर दडूनच होता. आम्हा दोघांना पण जास्त लोक नको होते. काय होत न, की एकही जण नाही म्हणाला, की प्लान फिस्कटतो. दिवस ठरला, आणि मंजिल पण ठरली. मंजिल होती दिवेआगर.
प्रश्न आला, कोणत्या गाडीने जावे? नाराची की माझी? नाराच्या गाडीला तूर्तास थोडा प्रॉब्लेम होता, चालता चालताच ती थोडी हलायची. रस्ता घाटमाथ्याचा म्हणून त्याला आणि मला काळजी, की रस्त्यात त्रास दिला तर काय कराव? माझी गाडी घ्यावी, तर तिला पेट्रोल जास्त लागतं, आणि थोडी गरम सुद्धा होते, पण चालते टकाटक. पण त्यांची लई इच्छा. गाडी घ्यावी तर त्याचीच. मी जास्त घासघीस न करता संमती दर्शवली, आणि गुरुवारी रात्री थेट त्याच्या घरीच गेलो.
गुरुवारी रात्री जरा थंड झोप घेतली, आणि सकाळी सहा वाजता गजराच्या आवाजाने उठलो. अंधार होता, आणि लोकांनी भीती सुद्धा घातली होती, की ताम्हिणी मधून जरा सांभाळून, कारण तिथे वाटमारी होते. म्हणून तो थोडावेळ थांबला. शेवटी ७ वाजेच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. पिंपरीमध्ये कधी गेलो नसल्याने त्याला सांगितलं, भई, कसाही मला चांदणी चौकापर्यंत ने. तिथून पुढे रस्ता दाखवायची जिम्मेदारी माझी. नेशनल हायवे ४ वरून निघालो, आणि पहिला फोटो हा घेतला.

लगेच न थांबता प्रवास सुरु. मध्ये थोडा वेळ थांबून चहा, नाश्ता केला आणि रस्ता पकडला. पिरंगुट, पौड मागे गेले, आणि आलं मुळशी. गावात न थांबता आम्ही पुढे गेलो, आणि लगेच टाटा पावरच्या प्लांट पुढे एक तळे होते, आणि सूर्याची किरणे त्यावर पडून मस्त सीन झाला होता, मोह न आवरल्याने नाराने मला बाईक थांबवायला लावली, आणि फोटोसेशन चालू. तिथला हा फोटो.


 अरे हो, इथे फोटो घेताना फोन वरच्या खिशात ठेवलेला होता, आणि कानात हेडफोन. कॅमेरा गळ्यात अडकवलेला, आणि फोटो घ्यायला कॅमेरा डोळ्याला लावला, आणि अचानक गाणी बंद झाली. क्षणार्धातच मला कळलं कि फोन खाली पडलाय. फोनची पाहणी करण्यात १० मिनिटे वाया गेली, पण पत्थरफोड फोन असल्यामुळे काहीही झाल नाही. प्रवास चालू झाला. एकामागून एक गावे सरत होती, आणि आता निर्मनुष्य रस्ता लागला होता. ४-४ ५-५ किलोमीटर पर्यंत चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते, आणि नारा मला किरकिर करत होता. "साल्या, कसल्या रस्त्याने घेऊन चालला मला. एक माणूस दिसत नाही, इथे कुणी आपल्याला मारून टाकलं तरी कुणाला कळायचं नाही". मी-"चूप बे, क्या लगता, मेरेको देख के कोई अपनेको मार्नेकी हिम्मत करेगा?".

शेवटी सो कॉल्ड क्रीपी ताम्हिणी घाट चालू झाला. नाराने बाईकची सूत्रे माझ्या हाती दिली, कारण रस्ता तसाच अवघड होता. १-२ स्पॉट फोटो काढून झाले, पण मनासारखे फोटो मिळत नव्हते. त्यातल्या त्यात एक अंधारी जागा होती, फक्त सूर्यकिरणाचा एक कवडसा येत होता, नाराला वाटलं ह्याचा एक फोटो होऊन जावा. तो फोटो काढायला गेला, तेवढ्यात भस्सकन कुत्रा भुंकला, आणि नारा कॅमेरा घेऊन पळत गाडीपर्यंत :P. गाडी पुढे सरकली, आणि एक थोडा प्रेक्षणीय स्पॉट मिळाला. फोटो काढला, पण एवढा विशेष जमला नाही. खाली पहा.

ताम्हिणी घाट अजून सरला नव्हता, तसा तो भरपूर मोठा घाट आहे. तिथे आम्हाला अजून काही स्पोट्स मिळाले.


ताम्हिणी घाट उतरताच एक एम.आय.डी.सी. लागते, तिथे थोडावेळ चहा घेऊन पुढे रस्ता पकडला, आणि जाता जाताच एके ठिकाणी जागा दिसली, जिथे झाडे जाळली होती. फोटो घ्यावा वाटला, आणि तो असा निघाला.


 त्यानंतर आम्ही जास्त कुठे थांबलो नाही, सूर्यनारायण तापत होता, आणि आम्हाला अजूनही बरंच अंतर कापायचं होतं. माणगाव गेलं, म्हसला गेलं आणि शेवटी दिवेआगरची ओढ लागली. हवेत थंडावा चालू झाला होता बोर्ली पंचायतन गेल्यावर लगेच दिवेआगरची कमान दिसली. आणि एक रिसोर्ट बुक झालं.  जरा थंडगार होऊन बसलो, आणि संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास किनाऱ्यावर गेलो. त्यावेळेस फोटोसेशन सुरु झालं. ते फोटोज खाली दिलेत.







अंधार पडला, आणि आम्ही रिसोर्ट मध्ये परतलो. रात्री थोड बसलो, आणि मग जेवण झालं. नंतर मला रात्री समुद्रावर फोटो काढायची हौस आली. एकदा एका ब्लोग वर नाईट फोटोग्राफी वाचली होती, सेम तसंच करून फोटो काढावा अशी इच्छा होती. नारा नको म्हणत होता, पण मी एकटा निघालो, म्हणून तो सुद्धा आला. किनारा जवळ आला की खवळलेल्या समुद्राचा आवाज येत होता. चोहीकडे भयान अंधार. आधीच दिवेआगर हे खूप छोटंसं गाव, म्हणून तिथे कुणीही नसायचं. मोबाईलचा टोर्च लावला, आणि फोटो काढायला गेलो, नारा बहुतेक बिचकूनच होता, परंतु त्याने दाखवलं नाही. बहुधा असली थेरं पहिल्यांदा करत असावा तो. फोटो काही जमले नाही, त्यासाठी ट्रायपोड आणि रिमोट लागत होतं, जे आमच्याकडे नव्हतं. नाराने घाई करून मला तिथून काढलं. रूमवर येऊन गाढ झोपी गेलो.

सकाळी जाग आली, आणि ११ वाजता चेक आउट करायचं होतं. अंघोळ करून झाली, नाश्ता केला, समुद्रावर जाऊन थर्डक्लास फोटो काढून आलो, आणि चेक आउट केलं. पण आज रिसोर्टवाला जरा अस्वस्थ च होता. त्याने मोबाईल नंबर लिहून घेतला. आम्ही निघालो, आणि श्रीवर्धनचा रस्ता पकडला. जाताना आम्हाला भरपूर पोलीस दिसले, वाटल गावात कुणी मंत्री आला असेल. पण लक्ष दिलं नाही आम्ही. पुढे रस्त्यावर १-२ ठिकाणी थांबून फोटो काढले. ते खाली दिलेत.





यानंतर उन वाढत होतं म्हणून न थांबता पुढे निघालो. श्रीवर्धन तालुक्यात थांबून चहा घेतला, तिथे बर्ड वाचींग केली ;) खरंच तिथल्या मुली, सुंदर आणि सुरेख. एकापेक्षा एक मुलगी चांगली दिसत होती, आणि हे नाराने सुद्धा एक्सेप्ट केलं. सुंदर म्हणजे "माल" अश्या नाही, पण छान!

शेवटी आमच डेस्टीनेशन आल. हरिहरेश्वरला मंदिरात जाऊन देवदर्शन केल, आणि फोटोसेशन. फोटो खाली दिलेत.








हरिहरेश्वरला खूप थकलो होतो आम्ही, तिथून थेट दिवेआगर गाठलं. तिथे आल्यावर पोटपूजा करावी म्हणलं तर एकही हॉटेल चालू नाही. चौकशी केली, तेव्हा दुर्दैवी घटना कळाली की कालच्या रात्री (म्हणजे ज्या दिवशी आम्ही तिथे होतो) गणेश मूर्ती चोरीला गेली, आणि त्यात एकाचा दुर्दैवी अंत झाला. हॉटेल वाल्यांशी गप्पा मारल्या तेव्हा ते खूप नाराज वाटत होते. दिवेआगरच मुख्य आकर्षण हरवलं होतं, त्यांचा देव कुणी चोरला होता. म्हणून त्यादिवशी म्हसल्यापर्यंतची बाजारपेठ बंद होती. आम्ही उपाशीच निघालो. आता उन्हाचा पारा वाढला होता. चटके लागत होते. तरीही न थांबता मुळशी पर्यंत आलो, आणि एक रम्य नजारा दिसला.



इथून जे निघालो, ते थेट रूमवरच.
तर असा हा आमचा प्रवास.

नोट: काही फोटोवर pk photography असं लिहिलेलं नाहीये, तरीही कॉपी करू नयेत.

धन्यवाद,
-पी.के.

Thursday, March 15, 2012

मला माहित आहे न!

मागच्या वर्षी २९ मे ला आमच्या दिन्याच लग्न होतं. दिन्या म्हणजे ऑफिसमधल्या जिगरी दोस्तांपैकी एक. दिन्या म्हणजे मितभाषी, म्हणून त्याचे ऑफिसमध्ये जास्त मित्र नाहीत. जे कोण आहोत ते आम्हीच समजा. तर त्याने आम्हाला आवर्जून आमंत्रित केलं. लग्न होतं त्याच्या गावी, म्हणजे सटाणा, ते आहे इथून ३००-३५० कि.मी. आमचे बाकी मित्र फुल आळशी, कुणी तयार होत नव्हतं. बर, बाईक वर जाव म्हणलं तर मला रोड माहित नाही, आणि पंक्याला रोड माहित तर तो त्याच्या घरी गेलेला.

कसं बसं नारा, निल्या, महेश बाबू, अमृता, दर्शन आणि स्नेहल तयार झाले. बर, त्यांनी कधी हो म्हटलं? तर आदल्या रात्री! धांदल उडाली, आणि मला कार बुक कराव लागली, नशीब ऐन वेळी भेटली एक कार. त्या रात्री मी आणि पटेल उशिरा पर्यंत बसलो, आणि सकाळी ३:३० ला इथून आम्हाला निघायचं होतं. आता उशिरा पर्यंत बसल्या मुळे मी काही जाण्याच्या स्थितीत नव्हतो. पण तरीही निघालो. सोबत फोटो काढायचे म्हणून केमेरा घेतला.
एकंदरीत प्रवास मस्त झाला, लग्न आटोपलं, आणि परतलो. आता दिन्याच्या भावाचं लग्न आहे, आणि त्याने आम्हाला बोलावलं. पण ह्या वेळेस खरंच जाणं अवघड आहे. हा विषय निघाला होता, आणि आमच्या ऑफिसचा एक बहाद्दर, ज्याला नेहमी आपलीच लाल करून घ्यायची सवय आहे तो कोकलला. तू दिन्याच्या लग्नाला गेला नव्हता न?
मी- गेलो होतो बे.
तो- मला माहित आहे न, तू गेला नव्हता!
मी- गप ए, तुला काय माहित?
तो- खोटं बोलू नको. मला माहित आहे तू गेला नव्हता.

हे त्याचं पहिल्यांदा नव्हतं. तो नेहेमी प्रत्येक गोष्टीत टांग अडवतो, किंवा आपला मोठेपणा सांगतो आणि आपली लाल करतो. बरेच वेळेस आम्ही सहन करून घेतो, पण कधी कधी पारा चढतोच. तसा काल पण चढला.

मी- अरे मादर**, गाडी मी बुक केली, सगळ्यांना मी बोलावलं, केमेरा माझा, फोटो मी काढले, लग्नात त्याच्यासोबत १०-१५ फोटो आहेत माझे, आणि मी खोटा? मी गेलो नाही हे प्रूव करण्यात तुला एवढा का इंटरेस्ट?

शेवटी पंक्याने त्याला फेसबुक वर फोटो दाखवला, आणि हा गार झाला.
तर असा हा स्वभाव. अशी मानसं तुम्हाला पण भेटतच असतील की. तुम्ही कसं ट्रीट करता त्यांना?


-पी.के.

Tuesday, February 28, 2012

चालेंज

आम्ही झांबरे निवास मध्ये राहायचो, तेव्हाची गोष्ट आहे. उन्हाळा लागलेला, आणि वीकेंड असायचा. बारकं, पाजी, भैरोसिंग आणि अन्या सोबतच असायचे. डोईफोडे आणि पतंगे साहेब देशाबाहेर गेलेले, म्हणून त्यांचा इथ संबंध आलाच नाही. अरे हो, सोबत गुळ्या पण असायचं. आता ते पण देशाबाहेर गेलंय.

सकाळ व्हायची ते गुळ्याच्या मोठ्या आवाजातल्या गाण्याने. एक एक करत मी, अन्या, बारीक, भैरोसिंघ उठायचो. मग हळूच (म्हणजे आरामात) नाश्ता व्हायचा. परत तीन मजले चढून वर आल्यावर सगळे अंग टाकायचे, आणि काय कराव काय कराव विचार विनिमय व्हायचा. 

भैरोसिंघांना काही काम नव्हतं. घर त्यांच्यानी सुटत नव्हतं. पत्त्यांचा कॅट तिथेच पडलेला असायचा, तो उचलून रम्मी किंवा चालेंजचा डाव मांडायचा. नंतर नंतर हा आमचा रोजचा कार्यक्रम झाला.

असंच एका वीकेंडला डक्क्याला घातलेली हुज्जत कामी आली, आणि डक्क्या रूमवर आला. सुरुवातीला त्याला कळेना, आम्ही काय खेळतोय ते. नंतर थोडं कळल्यावर तो पण आमच्या डावात सामील झाला.
पत्त्यांचे नाव ठरलेले होते.
१- एक्का
२- दुर्री
३- तिर्री
४- चव्वी
५- पंजा 
६- छक्का 
७- सत्ता 
८- आठ्ठी 
९- नववी/ नऊली
१०- दहेली
J- गुलाम
Q- राणी
K- राजा

चालेन्ज्ला सहसा अन्या कडे सगळ्यात जास्त पत्ते असायचे. आम्ही हरामी, ब्लफ केलं नाही तरी असे एक्स्प्रेशन आणायचे की त्याला ब्लफ वाटायचं आणि चालेंज करायचा. घे सगळे.
गुळ्या पण काही कमी नव्हतं. पाजी सगळे पत्ते सोडून लवकर मोकळा व्हायचा. डाव मी, बारीक, भैरोसिंघ, आणि अन्यामधेच जास्त वेळ चालायचा.

त्या दिवशी डक्क्या आमच्या गटात सामील झाला, आणि पत्ते टाकताना आम्हाला पंजासाठी नवीनच शब्द कळला-- "घ्या.. पाच पच्चे!"

सगळ्यांनी पत्ते फेकले आणि हसून हसून लोळत पडले. आजही डक्क्या भेटला, तर त्याला डक्क्या ऐवजी लोक, काय पच्चे, काय चालले? असं बोलतात!
आम्ही पण कधी पत्ते खेळू लागलो, तर ५ ला पंजा म्हणतात हे विसरलोत :P

-पी.के.

Sunday, February 19, 2012

महाशिवरात्रीच्या आठवणी

जय भोलेनाथ!
आज महाशिवरात्र.. शंकर म्हणजे हिंदूंचे आराध्य दैवत. पोस्ट लिहितोय, म्हणजे आम्ही शंकराचे म्हणावे तेवढे मोठे भक्त नाहीत. कारण फक्त एवढंच की, महाशिवरात्रीच्या आमच्या काही आठवणी आहेत, त्या दर वर्षी ताज्या होतात.

२००९ साली महाशिवरात्र २३ फेब्रुवारी रोजी आली होती. वार होता सोमवार. अर्थातच आधीचा दिवस २२ फेब्रुवारी म्हणजे रविवार असणार! आणि हा दिवस म्हणजे आमच्या बाजीरावांचा वाढदिवस. आता बाजीराव म्हणल्यावर त्यांना वाढदिवस कसा एडवेंचरस करावा वाटला. शनिवारच्या जागण्यामुळे सगळे उशिरा उठले. माझा पुरंदर गडावर जायचा प्लान होता, आणि मी रूटपण विचारून घेतलेला होता. सगळ्यांचा होकार आला, आणि पुरंदर फायनल झालं.

रूमवर बारीक सोडून सगळेजन होते. बारक्याची कुठली तरी परीक्षा होती. मी त्याला आणायला गेलो. आम्ही रूमवर येई पर्यंत १ वाजला होता. मग बारक्याच नटून झालं. गाडीला किक मारे पर्यंत १:३० झाले. एन.एच. ४ वर गाड्या लागल्या, आणि विखुरल्या. एक गाडी ८० च्या स्पीड ने (माझी), दुसरी ७० (ओम्या), तिसरी ५०-६० (बगळ्या) आणि चौथी ४० (डक्क्या आणि अवधूत). 

एन.एच ४ आणि आमची साथ संपली ते कापूरहोळपाशी. तिथून मग नारायणपूर आणि मग पुरंदरचे घाट. जाताना ओम्याच्या गाडीने चेन कवर इजेक्ट करून टाकल. ते जोडून घ्याव लागल. अरे हो, बगळ्याने नवीन आयपॉड घेतला होता. पूर्ण रस्त्याने तो गाणे ऐकत गाडी चालवत होता.

आता गडापर्यंत जायला मस्त रोड झालाय. त्यावेळी सगळं खडकाळ होत. पायथ्याला गेल्यावर विचार विनिमय झाला, आणि आम्ही गाड्या वर पर्यंत न्यायच्या ठरवल्या. नेहमी प्रमाणे सिक्वेन्स ठरलेला होता. मी, ओम्या, बगळ्या आणि डक्क्या. ओम्या च्या मागे ओंक्या होत, आणि पल्सरवर अति प्रेम. ओम्या गाडी देत नाही असं लक्षात आल्यावर ओम्याच डोक खायला चालू केल. अबे, प्रसाद्या कडे बघ बे.. कसं चालवायले.. पडल.
शेवटी, ओम्याने मला थांबवून ओंक्याला गाडी द्यायला सांगितलं. ओंक्याने तिथेही पराक्रम करूनच दाखवला होता. गाडी दगडात फसली म्हणून गनीमत, नाही तर ओंक्या आणि गाडी दोघेही खाली!

कसा बसा गड आला. तिथून पुढे पायी जायचं होत.
अवधुत्याच फोटो सेशन चालू झालं. प्रसाद, असा फोटो काढ, आता असा. मग तसा..
निख्याच्या नकला चालू होत्या. बघ, प्रसाद्या असा चालते, अवधुत्या असा हात करते, ओम्या असं हासते.
आत्याच्या धावण्ड्याच्या गोष्टी चालू झाल्या.
बगळ्या एक तर गाणे ऐकू लागल नाही तर आयआयआय करून हसू लागल.
माझ आणि निख्याच एकच काम. आयआयआयआय करून ओरडायच.

काही वेळाने बगळ्याला एवढा राग आला, कि कोणी जरी ओरडलं तरी निख्यालाच मारतो म्हणू लागलं.
गड फिरून झाला, आणि परतीच्या वाटेला लागलो. आता सगळे थकलेले होते, गाड्या संथ गतीने चालल्या होत्या. तेवढ्यात एक गाडी ओवरटेक करत गेली. जाताना आय आय आय आय करत कोणी हसत गेलं, आम्हाला ओळखायला एक सेकंद सुद्धा लागला नाही, कि हे बगळा आहे. ओरडून त्याला सांगत होतो, अबे स्पीड कमी कर, पुढे दगडी पूल आहे. कानात आयपॉड चे बुच असल्याने बगळ्या थांबला नाही, आणि खडखडत धडपडत कसा बस पूल पार केला. आम्ही सुटकेचा श्वास सोडला, कारण आम्हाला हाडं वेचाव लागले असते त्याचे.

त्या नंतरचा शिवसुंदर धाब्यावरचा थरार!
तर अशी आमची महाशिवरात्र. बाजीरावची एडवेंचर, बगळ्याच्या किंकाळ्या, अवधुत्याच्या फोटो पोजेस, आणि निख्याचे चाळे. म्हणून कधीही महाशिवरात्र आली, की आमच्या ह्या आठवणी ताज्या होणारच!

(आज भरपूर काम आहे, म्हणून पोस्ट खूपच आटोपती घेतलीये. नाहीतर सांगण्यासारख खूप काही आहे)

-पी.के.

Wednesday, February 15, 2012

वात्रटपणा

 आत्ताच बसल्या बसल्या वैलेंटाइन डेवर वात्रट पोस्ट सुचली. वात्रट म्हणजे जरा हलकटच म्हणावी लागेल. विचार आला, आधी जे कोणी थोडे वाचक (:P) आहेत, त्यांना विचारून घ्याव. पटत असेल किंवा नसेल, रिप्लाय करा. म्हणजे अशा पोस्ट टाकायच्या कि नाही ते कळेल.

धन्यवाद!
-पी.के.