Wednesday, May 26, 2010

कॉलेज प्रोजेक्ट-२

आमच्या बॅचसाठी अजून एक फंडू रूल काढला आमच्या कॉलेजने. प्रोजेक्टचे डेमो होणार होते आमच्या बॅचपासून! त्यापैकी पहिले डेमो आपल्या प्रोजेक्ट इन्चार्जला दाखवायचे, आणि तिसरा म्हणजे फायनल डेमो म्हणे. पहिला डेमो महिन्याच्या आतच ठेवला होता, आमची तारांबळ उडाली. आम्ही अख्खा महिना काहीच केल नव्हतं. परवा डेमो द्यायचा म्हटल्यावर आम्ही आज प्रोजेक्टची सुरुवात केली.

सुरुवात जी.यु.आय. पासुन करायचं ठरवल आम्ही. मी आणि डक्क्या त्यादिवशी नेटवर बसलो, आणि एक मस्त थीम शोधून काढली आणि ती वापरायची म्हणून फायनल केली. आता प्रश्न उरला, आमच्या वेबसाईटला नाव काय द्यायचं? एक असंच नाव देऊन टाकल- ****mail ! थीम थोडी मोडीफाय करायची गरज होती, आमच्याकडे बरेचसे सोफ्टवेअरस होते, कुठूनतरी **** नाव घेतल, आणि दोन इमेजेस वजा करून एक नवीन इमेज मिळवली, ती थीम म्हणून वापरली. आता आमची वेबसाईट कुठे थोडी चांगली दिसू लागली.

आता पहिलं पेज, साईन अप. ते बनवलं, साईन अप चा थोडा कोड लिहिला. तो व्यवस्थित वर्क करायला लागला. लॉग इनचं सुद्धा पेज बनवल, आणि युजर ऑथेंटीकेशनचा थोडा कोड लिहिला, तो सुद्धा मस्त काम करायला लागला. विचार केला, पहिल्या डेमोसाठी एवढ खुप झाल, जास्ती नको. नाहीतर उगाच मास्तरला वाटायचं की ह्यांनी प्रोजेक्ट विकत आणलाय.

लगेच एकाचा फोन आला, "प्रसाद्या, अबे आमच्या प्रोजेक्ट मध्ये लफडे आहेत बे! जरा करून देतोस का?"
मी- मिनिट थांब. माझा प्रोजेक्ट झाला की लगेच करतो.
माझ काम झाल, आणि मी लगेच त्याला कॉल केला. "ये बे!".

त्याच काम कमीच होत, पण किचकट होत. झालं एखाद्या तासात कम्प्लीट. मग मस्त इडली खाऊन दुसऱ्या दिवशीच्या तयारीला लागलो. प्रोजेक्ट इन्चार्ज तसा माझा मित्रच होता, माझा म्हणजे, माझ्या घराबाजुच्या पोराचा क्लासमेट होता तो. तर बरेचदा आम्ही मस्त गप्पा मारायचो. प्रोजेक्टच्या वेळी सुद्धा इन जनरल गप्पा चालू होत्या आमच्या (अवांतर ;) ). पहिला डेमो झाला, आणि त्याने मस्त ग्रेड दिला. खुश झालो. (अजून अद्दल घडवायची बाकी राहिली होती.)

पुढचा डेमो अजून बराच लांब होता. जवळपास एक महिना! बाकी पोर पण वर्गात त्याच गप्पा करायचे, "अबे ह्याच काय झालं? त्याच काय झालं?" वगैरे वगैरे! मी आणि डक्क्यासुद्धा मग चर्चा करायचो. आणि हा गण्या सगळ ऐकायचा, पण हरामखोर कधीच मदत करायचा नाही. बहुतेक आम्ही जी चर्चा करायचो, त्यातल ह्याला फारस कळायचं नाही. आणि मी मुद्दाम सांगायचो सुद्धा नाही, तशी मी डक्क्याला सुद्धा सक्त ताकीद देऊन ठेवली होती. ह्यावेळी मी आणि डक्क्या थोडे अगोदरपासूनच कामाला लागलो. कारण ह्यावेळी जवळपास ५०-६०% कम्प्लीट करायचा होता प्रोजेक्ट. मस्त प्रोग्रेस होती, आणि जस पाहिजे तसं आउटपुट येत होत.

एव्हाना डक्क्याला सुद्धा कोडींग जमायला लागली होती. छोटे मोठे पेजेस तो सुद्धा बनवायला मदत करत होता. किंवा कमीत कमी कुठून छानशी इन्फोर्मेशन काढत होता आणि मला सांगायचा. त्याच दरम्यान बारक्याचा प्रोजेक्ट सुद्धा अडकला होता. तो सुद्धा आम्हाला कधी बोलावी. त्यासाठी आम्ही श्रीकांतच्या घरी जायचो. तिथे कुणीही नसायचं, इकडे बारकं आम्हाला बोलावून परेशान, आणि तिकडे श्रीकांत आणि निखील चे भांडण!

पहिल्यांदा मी आणि डक्क्या तिथे गेलो, तेव्हा ते दोघे अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी मारामारी करत होते. मी बारक्याला विचारल, अबे काय झालंय? तो म्हणाला, काही नाही तू बस. हे नेहमीचंच आहे! तिथे रात्रभर बसण्यात काय मजा यावी, व्वाह! त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये काही लफडा झाला की २ मिनिट तिकडे पहायचं, आणि मग परत आपल काम सुरु! ते त्याचं करत बसणार. आपण आपलं. मध्येच निख्याचे चाळे चालू व्हायचे.

अशीच एक गम्मत आहे- आमचा प्रोजेक्ट आलमोस्ट झालाच होता, आणि श्रीकांतला काही तरी मदत हवी होती. मलाही काही सुचत नव्हतं. मग आम्ही दोघांनी नेटवर खूप शोधून शोधून एक युक्ती काढली आणि पाहिजे तसा कोड करत होतो, तेवढ्यात निख्याच्या डोक्यात काय आलं देव जाणे, तो श्रीकांतला म्हणाला, "अबे श्रीकांत्या, हे बटन कशाचं आहे?" आणि काही कळायच्या आत त्याने ते बटन दाबले!
ते लटापच्या लीडचे बटन होते. ते दाबताच सगळ बंद पडल. लगेच श्रीकांत्या खवळला, आणि मारायला कुठली वस्तू भेटते का ते बघू लागला. इकडे निख्याची कुठे लपू आणि कुठे नाही अशी घाई चालली होती :)


क्रमशः

No comments: