Monday, March 14, 2016

राजपुत्र

एक आटपाट नगर होतं. आटपाट नगराला सुंदर राजपुत्र होता. खूप गुणी आणि सालस होता. संपूर्ण नगर त्या राजपुत्राचे गुणगान गाण्यात मग्न असायचं, खरं तर त्याची जेवढी स्तुती (तुती) करावी तेवढी कमीच. राजपुत्राचे बालपण गाण्यात, मजा मारण्यात आणि हुंदडण्यात चालले होते.

परंतु राजाला आपल्या राजपुत्राच्या भविष्याची चिंता होती. राजपुत्राने बारावीमध्ये चांगले गुण मिळवताच राजाने राजपुत्राला इंजिनियरिंगला भरती करायचं ठरवलं. इंजिनियरिंगचं विद्यापीठ बरंच दूर असल्यामुळे राजपुत्राला एक रथ घेऊन दिला. राजपुत्र खूपच गुणी असल्यामुळे त्याला तो रथ कितीही आवडला नसला तरी तसं दाखवलं नाही. पित्याचा मान राखण्यासाठी किंवा पित्याची अवज्ञा होऊ नये म्हणून नित्यनेमाने त्याच रथातून शिकण्यासाठी जायचा. खरं सांगायचं तर रथाचा घोडा खूप क्षीण व म्हातारा होता. म्हणून व्हायचं असं, की राजपुत्राला कितीही वाटलं तरी तो रथ जोरात पळवू शकायचा नाही. तसेच, कधी कधी एखादा जाड मित्र रथात बसला कि त्याचा घोडा "पिचकायचा". एव्हाना राजपुत्राने रथाचे नामकरण सुद्धा केले - "टोबो". 

राजपुत्र एव्हाना शिक्षणामध्ये पुरता मग्न झाला. ध्यानी-मनी, उठता-बसता अभ्यास चालू असे. राजपुत्राचा अभ्यास पाहून राजाला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटे. 

परंतु नियतीला हे बहुतेक मान्य नसावं. राजाच्या स्वप्नांवर जणू विरजणच पडलं. राजपुत्राच्या वर्तणुकीत बदल  व्हायला लागले, इंजिनियरिंग त्याच्या चालण्या-बोलण्यात भिणायला लागली. जो राजपुत्र आजपर्यंत पित्याच्या शब्दाबाहेर नव्हता तोच राजपुत्र आज पित्याला हे सांगत होता कि धूम्रकांडीच्या एका टोकाला विस्तू आणि दुसऱ्या टोकाला मूर्ख माणूस असतो. राजाने वेळीच आवर घालायचा प्रयत्न केला, आजही ती घटना राजपुत्रास नीट आठवते आणि त्याचे गाल-कान दुखून येतात. 

इंजिनियरिंगचं पहिलं वर्ष राजपुत्राने गंमतीत घेतलं, म्हणून त्याला परीक्षा अवघड गेली. परंतु शेवटी तो राजपुत्रच! हार तो कसली मानणार? त्याने स्वतःच्या अंगात नवसंजीवनी संचारून घेतली, परत नव्या जोशाने प्रयत्न सुरु केले. मग काय! कसली ती परीक्षा, तिचा काय टिकाव लागणार राजपुत्रासमोर? 

ह्या सगळ्या घडामोडींमध्ये राजपुत्राचे जुने मित्र हरवले. परंतु आपला राजपुत्र खूप मनमिळावू होता (उगाच का लोक त्यांचे गुणगान गातात?) त्याने परत नवीन मित्र जमवले. यावेळी मागच्यापेक्षा  दुप्पट आणि मागच्या पेक्षा तीनपाट. सगळे एका पेक्षा एक कलांमध्ये पारंगत. कुणी क्रिकेटमध्ये  तर कुणी कोडींगमध्ये, कुणी अभ्यासात तर कुणी सी. डी. राईट करण्यात, कुणी शरीरसौष्ठव तर कुणी श्रवणगुणांमध्ये पारंगत. राजपुत्राने या सर्वांसोबत मैत्री जोपासली आणि वृद्धिंगत केली.  ही मैत्री इतकी दृढ होती, की राजपुत्र आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून सगळ्या विषयांचा अभ्यास करून घेई आणि त्यांना पारंगत करे. या सर्व प्रकारात त्यास स्वतःस परीक्षेत कमी गुण मिळाले तरी त्यास त्याचे दुःख नसे. 

पहिल्या वर्षानंतर राजपुत्राने अपयशाला कधीही जवळ फिरकू दिले नाही. प्रत्येक वर्षी उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि राजपुत्राने इंजिनियरिंग हाहा म्हणता पूर्ण केली. कथेत राजपुत्राच्या प्रोजेक्टबद्दल न लिहिल्यास कथा अपुरी राहील. 

मोठमोठ्या संकटांशी चार हात करण्यास राजपुत्रास फार आवडे. म्हणून त्याने आणि त्याच्या सवंगड्यांनी कुणासही जमणार नाही असा विषय घेतला आणि त्यावर त्यांचा प्रोजेक्ट चालू झाला. राजपुत्राच्या काळात त्यांना अशी टेक्नोलॉजी हवी होती की ज्यात तुम्ही एक छायाचित्र द्यायचं आणि संगणक तुम्हाला तशीच किंवा त्याच प्रकारची दुसरी छायाचित्रं देईल. निरनिराळ्या भाषांचा वापर करून झाला, परंतु राजपुत्राचे उद्दिष्ट काही सध्या होईना. परंतु त्याने एकदा शब्द दिला तो दिला, आता माघार घेणे नाही. राजपुत्राला तोच प्रोजेक्ट बनवायचा होता, मग सवंगड्यांशी युद्ध झाले तरी चालेल. याची देही याची डोळा घमासान युद्ध पाहिले आहे आम्ही. याच जिद्दीमुळे राजपुत्राने त्याच्या सवंगड्यांच्या साथीने तोच प्रोजेक्ट पूर्ण केला आणि इंजिनियरिंगचा गड सर केला. 

राजपुत्राची कहाणी अजून बरीच आहे, परंतु या अध्यायात एवढं पुरे. 
 

-पी. के.

Wednesday, June 12, 2013

नवीन सिरीज

काहीतरी खरडून खूप दिवस झाले, आणि खूप दिवसांनी थोडा वेळ मिळाला. बकबक करायला यापेक्षा चांगला मुहूर्त नाही म्हणून सकाळपासून विचार करत होतो की काय लिहाव. तेवढ्यात बाजूच्या कॉम्प्यूटरवर नजर गेली. कुणीतरी गेम खेळतंय, आणि गेम मधल्या पात्राला (character) कुत्रं चावतंय. चावण्यावरून पोस्टसाठी लागणारा विषय मिळाला. 

मागील काही महिन्यात रूमवर भरपूर घडामोडी झाल्या. वादळी पण म्हणू शकता. जुन्याच मित्राची नव्याने भरती झाली. म्हणून वादळ आले. सध्या वादळ निवळलय, म्हणून पोस्ट लिहिण्याएवढा वेळ आहे. 

असो, तर हा जो कार्यकर्ता आहे तो मूवी, सिरीजचा फार दिवाणा. एखादी मूवी पाहायसाठी कुणी तयार असो वा नसो, हा एकटासुद्धा जाइल एवढं डेडिकेशन! मागे याबाबतीत बोललोच आहे, आणि हे ही सांगितलेलंच आहे की मी या बाबतीत किती इंटरेस्टेड असतो. 

जेव्हा ह्याची एन्ट्री झाली तेव्हा त्याने आम्हाला सगळे सिरीज नीट समजून सांगितले.
१. प्रिजन ब्रेक 
२. शेरलॉक 
३. ट्वेंटी फोर (२४)
४. टू एंड हाफ मेन 
५. फ्रेंड्स 
६. हाऊ आय मेट युअर मदर 
७. स्मॉल विल 
८. डेक्सटर

अजून  बरेच आहेत पण मला आत्ता आठवत नाहीत. पहिली वेळ होती म्हणून आम्ही मन लावून ऐकलं. पण हा कार्यक्रम रोजचाच झाला! 

टी. वी. लावलीय आणि आम्ही काही बघतोय, तेवढ्यात अचानक फ्रेंड्स किंवा तत्सम सिरीज मधला जोक सांगायचा. किंवा टी. वी. वर काही दिसलं की लगेच पूर्ण हिस्टरी सांगायची. हिरो कोण होता, आधी काय करायचा, त्याला मूवी कशी मिळाली, मूवी नंतर काय झालं. लगेच विषय देवांकडे वळवायचा - Michael Jackson, Kurt Cobain किंवा सचिन तेंडूलकर. हे भली मोठी हिस्टरी चालू. 

प्रत्येक नवीन आलेल्या मित्राला त्याने पाहिलेल्या सिरीजची के. टी. दिलीच पाहिजे. मग सुरु होतं- कोणत्या सिरीजचे किती सीजन आलेत, ह्याने किती पाहिलेत, प्रत्येक सिरीजचा प्लॉट काय आहे, इ. 

परवा मला राहावलंच नाही, आणि मी त्याला सजेशन दिलं. आमच्या रूमवर एक व्हाईट बोर्ड आहे. मी त्याला म्हनल - की तुझे सगळे सिरीज यावर लिहून ठेव. कुणाचे किती इपिसोड, आणि काय काय ते डिटेल लिही. म्हणजे आम्हाला कधी कन्फ्युजन झालं तर लगेच वर पाहून लिंक लावता येते ;)


मागे एकदा चुकून बोललो की "Man of Steel" साठी आयमॅक्सला जाव काय की. हा तेच घेऊन बसला! तिकीट बुक करू का? तिकीट बुक करू का?
अरे भाई, मागच्या वेळी कारमधून गेलो होतो मुंबईला. या वेळी कार नाहीये! आणि एकाच दिवसात गर्मीने एवढा त्रस्त झालो होतो, की नंतर कधीच इच्छा होणार नाही मुंबईला जायची!
आणि आता तर पावसाळा लागलाय! मूवी पाहून पोहत पोहतच याव लागल पुण्याला ;)

नाही! तरी आयमॅक्स मधेच पहायचा! मग त्यासाठी बेंगलोरला पण जाईन ;)

तर वादळी घडामोडी इथेच संपतात. खरं तर लिहिण्यासारखं बरंच आहे, पण क्युबिकल मध्ये काम येताना दिसतंय म्हणून लगेच आटोपतं घेतोय :)

रामराम!

-पी. के.

Wednesday, April 24, 2013

गाण्यातली एनर्जी

कडक उन्हाळा पडलाय आणि ऑफिसमधून दहादा खाली जाण्याच्या आमच्या सवयीमुळे अंगाची काहिली झाली. ऑफिसचा ए. सी. जेमतेम थंडावा देतो, आणि त्यातच कसंबसं आयुष्य निघतंय, अशी गोष्ट झाली!

अंधारात आशेचा किरण दिसावा त्याप्रमाणे हा विडीओ दिसला आणि खणखणीत एनर्जी आली 


विडीओ :- रंग्याकडून साभार!

हे गाणं मला ५ वर्ष झप्पकन मागे घेऊन गेलं, आणि कॉलेजच्या gathering ची आठवण आली. त्यावेळीही मी असंच एनर्जेटिक गाणं ऐकलं होतं. गायकाने माईक हातात घेऊन "नीले नीले अंबर पर" म्हटलं आणि मी आणि भैरोसिंग एवढे उत्साहित झालो की आम्ही ५०  उठ-बशांचा एक सेट मारला! एम. जी. एम. च्या लोकांनी वाटल्यास gathering चा विडीओ पाहावा, खरं की नाही ते पटेल ;)

आजही तशीच गोष्ट घडली. ह्या गाण्यातला आवाज मला एवढी एनर्जी देऊन गेला की ती एनर्जी डीसीपेट करण्यासाठी मला ५० पुश-अप्स माराव्या लागल्या (उठ-बशा जरा कॉमनच झाल्यात म्हणून). क्षणभरासाठी विसरून गेलो होतो की आपण ऑफिसमध्ये आहोत. ज्यावेळी हातांना कळ आली, आणि एनर्जी संपली त्यावेळी उठून उभा राहिलो आणि पाहतो काय! टीम गोळा झाली!!

तर मित्राचे नाव न डिस्क्लोज करता त्याला त्रिवार अभिवादन करतो आणि वटवट बंद करतो!

-पी. के. 

Monday, March 18, 2013

चौधरी

सारी दुनिया देख दंग, ताकत और अकल की जंग… 
देसी रंग और देसी राग, कम्प्युटर से तेज दिमाग… 
अकल की खेती हरी भरी, बात सुनाउ खरी खरी… 
चाचा चौधरी 

(वरच्या चार ओळी निखिल जोशी कडून साभार)

हर्षद चौधरी म्हणजे माझा लई जुना मित्र. प्रतिभा निकेतन शाळेपासून त्याची आणि माझी ओळख. शाळा झाल्यावर अकरावी आणि बारावी आमचं कॉलेज चेंज झालं, पण नंतर इंजिनियरिंगला परत सोबतच आलो. 

आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चौधरी शांत माणूस. जास्त बोलणं नाही, बडबड नाही, थिल्लरपणा नाही. राहणीमान एकदम व्यवस्थित. कपडे टाईम टू टाईम धुतलेले, धुतल्यावर लगेच इस्त्री करून ठेवलेले, आणि इस्त्री झाली की पेटीत भरून ठेवलेले. 

बाय द वे, पेटी उचकने आणि वरचे कपडे खाली आणि खालचे कपडे वर ठेवणे हा चौधरीचा छंद! तसा चौधरी वीकेंडला आमच्यासोबत नसतोच, गुणी बाळासारखा सगळ्या नातेवाईकांना भेट देऊन येत असतो. पण चुकून एखादा वीकेंड रूमवर घालवावा लागला, आणि करमत नसेल तर चौधरी लगेच bag कडे पळतो आणी उचका उचकी सुरु!

चौधरीला तशी मोबाइल किंवा हाय टेक वस्तूंची हौस नाही. आपला जुनाच नोकिया फोन वापरत असतो, आणि त्याचा वापर सुद्धा लिमिटेडच. फार फार तर कॉल करणे किंवा एसएमएस करणे, इंटरनेट तर फार दूरची गोष्ट. एके दिवशी चौधरी असाच माझ्याकडे आला आणि म्हनला 'अबे, फोनची बेटरी गेली वाटतं! खूप लवकर डिस्चार्ज व्हायला' मी म्हणलं लवकर म्हणजे किती? '२ दिवसात एकदा चार्ज कराव लागायले'… तर असा धन्य कार्यकर्ता!

चौधरीला आमच्यासारख्या लांब पल्ल्याच्या ट्रिप्स झेपत नाहीत, लोहगड सोडला तर मला तरी नाही आठवत की चौधरी आमच्यासोबत कुठं आलाय (बाय द वे, लोहगड म्हणजे लांब पल्ला नाही). चौधरीची गाडीपण व्यवस्थित ठेवलेली असते, मला वाटत की तीच गाडी शोरूम मध्ये ठेवली असती तर खराब झाली असती, पण चौधरी नियमित काळजी घेतो म्हणून आजपर्यंत टिकून आहे, आणि गाडीची फायरिंगसुद्धा जशीच्या तशीच आहे! नाहीतर आमच्या गाड्या पहा, रोज वापरात असून सुद्धा धूळ खात पडलेल्या असतात आणि निष्काळजीपणाच्या चालवण्याने इंजिनची माय-बहिण झालेली आहे ;)

घरचं जेवण चालू असतानाच चौधरींनी ढेरी कमावली आहे, आणि आता झिजवायचा प्रयत्न चालू आहे. म्हणूनच चौधरींचं जेवण एकदम मोजून मापून. त्यातल्या त्यात जिममध्ये हाड मोडेस्तोवर व्यायाम, पण परिणाम शून्य!

बर, बाकी पोट्टे ऑफिसला जाताना जीन्स, टी-शर्ट घालतात. पण चौधरी प्रॉपर फ़ोर्मल कपडेच घालून जातात. दर दोन दिवसाला शेविंग केलीच पाहिजे, नख कापलेच पाहिजेत, बुटांची पॉलीश केलीच पाहिजे! चष्म्याची व्यवस्था गाडीतच! गाडीच्या बॉक्समध्ये गॉगल आणि साधा चष्मा सापडायलाच पाहिजे. दिवसा गॉगल वापरायचा आणि संध्याकाळी येताना साधा चष्मा वापरायचा हे ठरलेले नियम!

महत्वाची गोष्ट म्हणजे चौधरीचा दिमाग लई तल्लख, कुठलीही गोष्ट त्यांना एकदा सांगितली की ती झालीच म्हणून समजा! मग ते दुकानातून कुठलं सामान आणणं असो, की चतुर्थीला गणपती मंदिरात जाणं असो. चौधरीला सगळं लक्षात राहतंय. यावरून आठवलं, चौधरी गणपतीचा निस्सीम भक्त! दगडूशेठ गणपतीला नियमित वारी असतेच, पण समजा चतुर्थी वीकडेला आली आणि जाणं झालं नाही तर कमीतकमी गल्लीतल्या गणपतीचं दर्शन घेऊनच येतो.

एटीएम आणि चौधरींची खूप दुष्मनी. चौधरी सहसा स्वतःसोबत एटीएम कार्ड ठेवतच नाहीत. महिन्याच्या सुरुवातीला एकदाच एटीएम मधून पैसे काढायचे हा उसूल!

डक्क्या सारख्या पोराला आम्ही बोलतं केलं, पण चौधरी लई अवघड माणूस! तसा चौधरी कधी कधी गप्पा मारतो, पण लई क्वचित. सहसा त्याचा बोलायचा मूड असेल तरच गप्पा चालतात, नाही तर टीवी लावून बातम्याच बघतो.

चौधरी पुराणात इतकंच! चौधरींचा एक फोटो चिकटवून ४ शब्द संपवतो!
-पी. के.