Tuesday, May 25, 2010

कॉलेज प्रोजेक्ट- १

असंच बसल्याबसल्या कॉलेजची आठवण आली (का आली ते नका विचारू), लगेच पाठोपाठ प्रोजेक्ट आठवू लागला. ऑफिसमध्ये काही जास्त काम नव्हतं, म्हटलं एखादी पोस्ट लिहूनच टाकावी प्रोजेक्टवर!

आमच्याकडे प्रोजेक्टच फार फॅड लोकांना! जेव्हा लेक्चरर सांगतो, की येत्या १५ दिवसात तुम्हाला प्रोजेक्टची नावे द्यायची आहेत, सगळ्यांची धावपळ सुरु होते. काही जणांना मी तर प्रोजेक्टची लिस्टच घेऊन येताना पाहिलं. सरकडे जायचं आणि त्यांना एखादा प्रोजेक्ट सांगायचा, त्यांना आवडला नाही की नेट वर बसायचं, आणि दाखवायचं की मी काहीतरी सर्च करतोय. आणि लगेच - तासात नवीन प्रोजेक्टच नाव घेऊन जायचं. आणि शेवटी कसबसं प्रोजेक्ट फायनल झाल्यावर जिथून ती लिस्ट आणलीये, त्याच्याकडे जाऊन प्रोजेक्टची किंमत ठरवायची, असा मस्त बेत असायचा.

माझ्या प्रोजेक्टची कहाणी थोडी वेळी आहे. माझा एक मित्र होता, मी जवळपास दुसऱ्या वर्षापासून त्याच्यासोबत राहत होतो. जेव्हा सरांनी प्रोजेक्टची नावे सुचवा असे सांगितले तेव्हा हा सुट्टीवर गेला होता त्याच्या गावी. कॉलेज चालू होऊन जवळपास १० दिवस झाले होते तरी याचा यायचा पत्ता नाही. म्हणून आम्ही थोडी गम्मत करायचं ठरवल. त्याला फोन केला, आणि सांगितल- "अबे, आज संध्याकाळपर्यंत प्रोजेक्टच नाव द्यायचय, सर म्हणले की जर एखादा पोरगा नसेल तर त्याला तुम्ही प्रोजेक्ट पार्टनर बनवू शकत नाही. तू लगेच इकडे ये. आणि येणार नसशील तर सांग काय करायचं ते!". तो चपापला, पण त्याला घरी राहायचा मोह आवरत नव्हता. तो काही आला नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी फोन करून त्याला सांगितल, "अबे, काल आम्ही खूप प्रयत्न केले, पण सर काही ऐकले नाहीत. मी आणि डक्क्या दोघे मिळून प्रोजेक्ट करणार आहोत. आम्ही एक टॉपिक दिला आणि सरांनी तो मान्य केला". हा लगेच चिडून तिळपापड झाला. दुसऱ्याच दिवशी हा कॉलेजात थडकला. अरेरावीची भाषा चालू केली त्याने! तू असा कसा दुसऱ्या सोबत प्रोजेक्ट करू शकतो? आपण ठरवल होत , की सोबत प्रोजेक्ट करायचा, मग?

पण तो पर्यंत सगळ्यांना ह्याबद्दल कळून चुकले होते, आणि सगळे पोरं माझी साथ द्यायला लागले. सगळ्यांनी त्याला सांगितल, अरे, सर ऐकत नव्हते. आम्हीही तसंच केल. जे आमचे मित्र नव्हते त्यांना प्रोजेक्ट मधून बाहेर काढल. हा तेवढ्या पुरता शांत झाला. लगेच दुसऱ्या पोराकडे गेला, हा मुलगा त्याच्या रूम्शेजारी राहायचा. त्याला ह्याने माझ्याबद्दल बरेच सांगितले, लई शहाणपणा करतो म्हणे, स्वतःला काय समजतो म्हणे, मी त्याला दाखवतो मी काय चीज आहे ते! प्रोग्रामिंग फक्त ह्यालाच येते काय? आम्ही पण करू शकतो म्हणे!! चल बे, आपण दोघे मिळून प्रोजेक्ट करू म्हणे! आणि त्या दोघांनी युती बनवली. काय काय बोलला तो कोणास ठाऊक?

- दिवसांनी त्याला समजले की हे सगळेजण गम्मत करत होते, मग हा परत त्या पोराकडे गेला. आणि त्याला सांगितल, "अबे प्रसाद्या मजाक करत होता. एक काम कर, तू दुसरा कुणीतरी पार्टनर शोध आणि तू तुझा प्रोजेक्ट कर". आता हा जो मुलगा होता, तो भयंकर संतापला ! त्याने लगेच मला फोन केला आणि बोलावून घेतले. आणि त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या माझ्या प्रोजेक्ट पार्टनर ने त्याच्याकडे बोलल्या. मी हि संतापलो. आणि त्याला म्हणालो- "मर भडव्या! आता तर खरच मी तुला प्रोजेक्ट मध्ये घेणार नाही. जा खड्ड्यात!". पण माझा तिसरा जो प्रोजेक्ट पार्टनर होता (डक्क्या) , त्याने माझी समजूत काढली आणि ह्याला आमच्या प्रोजेक्टमध्ये घेतल.

त्या दिवशीपासून प्रोजेक्टची तयारी चालू झाली. कुठून सुरुवात करायची, काय काय युज करायचं, कुठली टेक्नोलॉजी वापरायची सगळ ठरल होत. पण हा जो आहे, त्याला आपण "गण्या" म्हणू (खर नाव सांगितलेलंच बरं) हा गण्या कुठल्याही डिस्कशन मध्ये सहभागी व्हायचा नाही. ह्याच सगळ लक्ष पोरी, जी.एस. इलेक्शन, gathering ह्यात असायचं. आम्ही त्याला बरेच वेळेस समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण हा कधी ऐकायचा नाही. पण मी ही काही कमी नव्हतो, मी सुद्धा ह्याला अद्दल घडवण्याचा प्लान तेव्हाच तयार केला आणि पुढच्या कामाला लागलो.

क्रमशः

Friday, May 14, 2010

मी पाहिलेला थर्ड क्लास चित्रपट: जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ

असाच एके दिवशी ऑफिस मधून निघत होतो, म्हटलं एखादा चित्रपट रूमवर नेऊन बघावा. माझ्या ऑफिसमध्ये बरेच चित्रपट असतात इकडे तिकडे पडलेले. चांगला एखादा न्यावा म्हणत होतो म्हणून बाजूच्या मित्राला विचारल, अरे बाबा, ह्यापैकी बघण्यासारखा कोणता आहे? त्याने लगेच उत्तर दिलं-- जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ.
मी-- हम्म, नाव तर भारी दिसत आहे, बघुयात तरी काय आहे ते ह्यात?
मी तो चित्रपट पेन ड्राइव्ह मध्ये टाकला आणि रूमकडे निघालो. गेल्या गेल्या रूमवरच्या मित्रांना खुशीत सांगितलं, बाबांनो मस्त पिच्चर आणलाय. बघुयात.

चालू केला, तेव्हा थोडा ठीक वाटला कारण अजून जर्नी चालू झाली नव्हती. ष्टोरी काही अशी आहे--

एक मुलगा असतो, त्याचा बाप म्हणे कुठला की शास्त्रज्ञ असतो. आणि असे सांगितले गेले आहे की त्याच्या बापाने पृथ्वीचे सेंटर पहिले आहे. तो तिथे गेला होता, काही काळ राहिला होता, नंतर त्याला डायनासोरने खाल्ले आणि तो तिथेच मेला.
ह्या पोराच्या बापाचा कुणी एक मित्र असतो, ज्याला नेहमी स्वप्न पडत असते की हा कुठे तरी विचित्र ठिकाणी गेलाय आणि ह्याच्या मागे एक डायनोसोर लागलाय. तो धडपडत पळतोय जीव वाचवण्यासाठी आणि भसकन मध्येच त्याला जाग येत असते.

मग काही दिवसांनी तो मित्र ह्या पोराकडे येतो. ह्याला एके ठिकाणी घेऊन जातो, ते म्हणे पृथ्वीच्या केंद्राकडे जायचे ठिकाण आहे! त्याअगोदर ते कुठल्यातरी पोरीकडे थांबतात. जेव्हा हे तिथे (केंद्राकडे जाण्याच्या ठिकाणी) जातात, तेव्हा त्यांना तिथे कुठलेसे यंत्र दिसते. यंत्र कसले, साली पंक्चर ची मशीन असेल, उग आपल्याला भासवतात की काहीतरी लई भारी मशीन आहे. मग तो (ह्या पोराचा काका) ते यंत्र उखडून टाकतो, की लगेच आकाशात काळे ढग काय येतात! विजा काय चमकतात! भूकंप काय व्हायला लागतो, बाप रे.. मग तिथे त्यांना एक खंदक दिसतो. आडोसा म्हणून ते त्यात जातात, आणि लगेच एक वीज पडते आणि तो खंदक बुजून जातो! आता काय?

मग हे थोडे मध्ये जाऊन पाहतात. मध्ये त्यांना कुठली तरी खान असल्यासारखी दिसते. तिथे खूपसारे यंत्र असतात. छोटी रेल्वे सुद्धा दाखव्लीये. मग हे लोक एकेका डब्ब्यात जातात. हा रस्ता मग भयानक होत जातो. एका डब्ब्याची धावपट्टी संपल्यावर एक जन दुसऱ्या डब्ब्यात उडी मारतो, दुसरा तिसऱ्या डब्ब्यात.. अरे काय हा पोरखेळपणा? मग ती गाडी एके ठिकाणी थांबते, तिथे ते लोक पाहतात तर हिऱ्याची खान असते. हे लोक खाणीत जातात खरे, पण तिथली जमीन म्हणे फारच तकलादू असते. त्या पोराच्या हातून एक हिरा जमिनीवर पडतो, आणि जमीन तडकून हे तिघे मध्ये पडतात. आणि खाली सेंटर कडे जातात. तिथे ते पाण्यात पडलेले दाखवले आहे.

मग ते लोक पाण्यातून बाहेर येतात, चालत जाताना त्यांना एक ठिकाण दिसते तिथे कुठले तरी पक्षी असतात, ह्या पक्ष्यांच्या अंगातून लाईट येत असतो! काय माहिती, त्या डायरेक्टरला बहुतेक काजवे दाखवायचे असतील पण चुकून पक्षी दाखवल्या गेला :) मग एक पक्षी येऊन ह्यांना पुढचा रस्ता दाखवतो. तिथे तापमान १०० डी.से. द्खावलेले आहे! आणि तेवढ्या तापमानात हे लोक जिवंत सुद्धा राहतात म्हणे! तिथे ह्यांना सूर्य सुद्धा दिसतो, आणि पुढे एक समुद्र दाखवलाय, ज्यामध्ये हे लोक एका रेडीमेड जहाजातून प्रवास करतात.. मग त्यांच्यांवर समुद्रातल्या भयानक माश्या हल्ला करतात! आणि सगळ्यात कहर म्हणजे तिथे ह्या पोराला त्याच्या आईचा फोन येतो! अरे, लोकांना काय पागल समजतो का तो डायरेक्टर? मग हे बेशुद्ध होतात आणि एकमेकांपासून वेगळे होतात..

मग ह्या पोराच्या काकाच्या मागे खरोखरच एक डायनोसोर लागतो, पण यावेळी तो वाचतो. ह्या पोराला एक पक्षी वाट दाखवतो आणि परत काकाकडे नेतो.. मग हे तिघे काहीतरी दिव्य प्रयत्न करून तिथून बाहेर पडतात आणि भूतलावर येतात.

पण एकंदरीत पिच्चर थर्ड क्लास आहे. पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जायला ह्यांना ते रेल्वेचे डबे काय मिळतात, तिथे लाईट वाले पक्षी काय दिसतात, डायनोसोर काय मागे लागतो, सूर्य काय दिसतो, केंद्रापाशी समुद्र काय दिसतो, तिथे माश्या काय हल्ला करतात, ह्याला तिथे मोबाईल फोनचे कवरेज काय येते! अरे अरे अरे, काही तरी रियालीस्टिक दाखवा न यार! बहुतेक १०-१२ वर्षाचा एखाद्या पोराने हा पिच्चर डायरेक्ट केला असावा!

तुम्हाला कधी या पिच्चरची सी.डी. मिळाली तर ती बघण्याच्या अगोदर तोडून फेकून द्या! विश्वास करा माझ्यावर.. चला, पोस्ट कम्प्लीट झाली. बर वाटल.

निरोप घेतो,
-पी.के.

Monday, May 10, 2010

लोकमत जाहिरात

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सकाळ-सकाळी काय मस्त झोप लागते (हिवाळा असल्यामुळे), बहुतेक साखरझोप म्हणतात ती हिलाच की काय! पण ह्या वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मला साखरझोप अनुभवताच नाही आली, मग काय! रोज सकाळी एक रिक्षावाला आमच्या रूमच्या खाली येऊन थांबायचा, आणि लगेच मोठ्या आवाजात एक गाणं लावायचा -- "वाचका, कोणते वृत्तपत्र घेऊ हाती..", तसं पाहिलं तर चाल एका गाण्याची घेतली आहे त्यांनी, ते गाणं झेंडा चित्रपटातील आहे- "विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती" मूळ गाणे फार छान आहे. पण हा गायक यार.. अक्षरशः बरळतो.

तो रिक्षावालासुद्धा भल्या पहाटे यायचा, म्हणजे सकाळी ६.३०-७.०० वाजता, आणि मी लगेच खडबडून उठायचो. मग घड्याळात पहायचे, किती वाजलेत बघू? च्या मारी! आत्ता ६.३० झालेत, झोपा अजून! पण झोप काही यायची नाही. कधी कधी थोडा डोळा लागायचा, की लगेच चालू.. वाचका कोणते वृत्तपत्र घेऊ हाती.. लोकमत फक्त एका रुपयात.. लोकमत फक्त एका रुपयात..

मी एके दिवशी विचार करत होतो, च्यायला ह्या रिक्षावाल्याच डोक दुखत कस नसेल? एके दिवशी त्या भल्या माणसाला पहायचा योग आला, हा कानात मस्त हेडफोन टाकून बसला होता! मी म्हटल बर आहे, आपण छान गाणी ऐकायची आणि इकडे दुसऱ्यांची झोप उडवायची..

मी एवढा चिडलो होतो त्या जाहिरातीवर, की एके दिवशी मला स्वप्न पडल, तो रिक्षा सकाळ-सकाळी आला, आणि जोरजोरात ती जाहिरात वाजवू लागला. मी चिडून उठलो, आणि एक चेंडू हातात घेतला, (हा तो स्पंज सारखा चेंडू आहे, ज्यावर स्माईली असते) गच्चीवर गेलो आणि त्या रिक्षावाल्याला फेकून मारला. पण तो रिक्षावर टप्पा खाऊन बाजूच्या मिठाईवाल्याच्या तेलाच्या कढईत पडला. तो माणूस वडापाव तळत होता, आणि त्याने तो तळलेला चेंडू एका माणसाला पावमध्ये घालून दिला, आणि त्या माणसाने तो खाल्ला सुद्धा! खाल्ल्यावर त्याला म्हणाला, आज पाव लई भारी झाला होता, मस्त मऊ होता.. मी पळत जाऊन झोपी गेलो.. आणि सकाळी उठल्यावर स्वतः वरच हसत होतो..

आता ती जाहिरात बंद झालीये. आणि वेगळीच कुठली तरी जाहिरात चालू केलीये त्या लोकमतवाल्यांनी. काही का असेना, आता मी माझी रूम बदलली आहे म्हणून झोपमोड होत नाही :) पण हे स्वप्न मात्र एक नंबर वाटल. म्हणून म्हटल पोस्त करूनच टाकाव.. त्यासाठी हा उपद्व्याप!

-पी.के.

Thursday, May 6, 2010

ट्राफिक: एक गंभीर प्रश्न

काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर ते कर्वेनगर मी १० मिनिटात जायचो, पण हल्ली २५-३० मिनिट लागतात, त्यामुळे विचार केला, च्यायला ह्या ट्राफिकवरती एखादी पोस्ट करावीच!

कारणे तशी भरपूर आहेत, पण काही ठळक करणे आपण इकडे डिस्कस करू :)

माझ्या मते सर्वात मोठं कारण म्हणजे चारचाकी वाहन चालविणारे.. जर आपण पाहणी केली तर १० पैकी फक्त २-३ चारचाकी वाहनात तुम्हाला २ जण बसलेले दिसतील. इतर कार्समध्ये फक्त १ माणूस बसलेला सापडेल. म्हणजे तुम्ही पाहू शकता, एका माणसासाठी एवढे पेट्रोल, रस्त्यावरती एवढी जागा वाया जात आहे आणि प्रदूषणाचाही प्रश्न आहेच की! परवाचीच गोष्ट सांगतो, मी नळस्टॉपच्या सिग्नलला थांबलो होतो आणि थोड्या वेळाने तिथे टोयोटा फोर्च्यूनर कार येऊन थांबली. आईशप्पथ सांगतो, एवढी उष्णता होती त्या कारची, की मला तिथून शेवटी थोडं पुढे जाव लागल! हा, ही एक समस्या. कारवाले मस्त ए.सी. लावून बसतात, पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या ए.सी.मुळे बाहेर किती उष्णता फेकल्या जात आहे!

त्यातल्या त्यात, काही गर्भश्रीमंत लोकांना आजकाल एस.यु.वी. चे फॅड लागले आहे. ह्या गाड्या पेट्रोल किंवा डिझल अक्षरशः गटागट पितात! परिणाम- प्रदूषण, उष्णता, आणि इंधन टंचाई. आणि मी काही गोष्टी पाहिलेल्या आहेत जशा-- सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीस्वार लवकर सुटून जातात, जेणेकरून रस्ता मोकळा होतो, पण चारचाकी वाहनधारक खूपच संथ गतीने गाडी चालवतात, त्यामुळे रस्ता मोकळा व्हायला वेळ लागतो.

दुसरा मोठा प्रोब्लेम म्हणजे पी.एम.टी.. हे पी.एम.टी. चालक भयंकर वेगात बस चालवतात. कित्येक वेळेस त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेले आहेत. बऱ्याच रस्त्यांवरती बी.आर.टी. नाहीये. त्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग बसेस व्यापून टाकतात. त्यामुळे दुचाकी आणि इतर चारचाकी वाहनांना रस्त्यावरती कमी जागा मिळते. कित्येक ठिकाणी तर सिग्नलच्या जवळच पी.एम.टी. चा स्टॉप असतो, मग प्रवासी चढू किंवा उतरू लागले की बाकी वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागते.

थोडा छोटा प्रोब्लेम म्हणजे स्त्री वाहनचालक. जेव्हा मुली किंवा स्त्रिया गाडी चालवतात, तेव्हा मागील पुरुषाला खरच सांभाळून चालवावे लागते. कारण स्त्रियांना ट्राफिक चे नियम जास्ती माहित नसतात, त्यामुळे त्या थोड्या विचित्र गाडी चालवतात. अपघातांना तेवढे कारण पुरेसे आहे, आणि अपघात झाल्यावर साहजिकच सहानुभूती मुलींकडे जाते. त्यामुळे एखाद्या पुरुषाची चूक नसताना सुद्धा त्याला मार खावा लागतो.

द्रुतगती महामार्गांवर तर कारचालक हद्द करतात. परवाचीच गोष्ट सांगतो, मी कापूरहोळ ते पुणे असा प्रवास करत होतो, तेव्हा एक कार माझ्या मागून सुसाट वेगाने पुढे गेली. पाच मिनिटानंतर मला माझ्या दृष्टीक्षेपात माणसांचा घोळका दिसत होता. मी माझा वेग जरा कमी केला, आणि पाहिले तर तीच कार अपघातग्रस्त झालेली दिसली. कारचा अक्षरशः चुराडा झालेला दिसत होता, कोण जाणे तो माणूस जगला का मेला! हे कारचालक स्वतः तर जीव धोक्यात घालतातच, आणि दुसऱ्यांचा सुद्धा जीव घेतात. त्यापेक्षा ट्रकचालक बरे, कारण त्यांच्यात "पेशंस" असतात, आणि कुठे किती वेग घ्यायचा ते त्यांना माहित असत.

कार किंवा दुचाकी वापरावर पूर्णपणे बंदी ही अशक्य आणि मूर्खपणाची गोष्ट होईल, पण खरच काहीतरी निर्बंध असले पाहिजेत, म्हणजे १ माणूस जर कार चालवत असेल तर तो कार ऐवजी दुचाकी वापरू शकतो. किंवा २ पेक्षा जास्त लोक बसणार असतील तरच कारचा वापर करावा. ही सरकारची जिम्मेदारी नसून वैयक्तिक जबाबदारी आहे असे मला वाटते. कारण जे दुष्परिणाम होतील, त्याला शेवटी आपल्यालाच सामोरे जाव लागणार आहे. कधी कधी सायकलचा वापरसुद्धा केला पाहिजे (हे मला सुद्धा लागू होईल), ह्याने ३ फायदे होतील, इंधन बचत, प्रदूषणावर कंट्रोल आणि वाहतूक सुरळीत होईल.

जाउद्या, च्यायला हे नेहमीच चालू राहील आपल्याकडे. कोण ऐकतंय?
आपण आपल्याला जे शक्य आहे ते करावे!

-पी.के.