Thursday, February 7, 2013

कुत्री ("कुत्रा" शब्दाचं अनेकवचन)

हा काय विषय आहे का? अरे, पण ब्लॉगचं नावच उगाच काहीतरी आहे, म्हणून मी काहीही लिहू शकतो.
तर विषयाला लगेच हात घालू. 
माणसा खालोखाल पृथ्वीवर कुणाची संख्या जास्त असेल, तर मला वाटत की कोंबड्या आणि कुत्री. 
ता.क.: आता यात वाद घालण्यात काहीही अर्थ नाही, की कोंबड्या जास्त, की कुत्रे जास्त कि मुंग्या. मी बोलतोय म्हणलं की हं म्हणायचं.

तसं कुत्र्याचं आमच्या घरी सगळ्यांनाच वेड. आत्ता पर्यंत आम्ही २-३ कुत्रे पाळले असतील. ती गोष्ट वेगळी आहे म्हणा, कुत्रे कधी विकत नाही आणले. आमच्या मायबापांना लई हौस. एखादं पिल्लू गोंडस दिसलं की घाला त्याला पोळी, आणि आणा रोजचीच कटकट.

एक कुत्रा पाळला होता, आईनं त्याचं नाव 'ब्राउनी' ठेवलं. का? तर ब्राउन कलरचे ठिपके त्याच्या अंगावर होते. त्याला रोज चांगलाच खुराक असायचा. कधीकधी तर आई त्याला दुधात पोळी कुस्करून खाऊ घालायची. त्यावर माझा टोमणा-- "स्वतःच्या लेकरांना कधी कुस्करून खाऊ घातलं नाही, कुत्र्यांची लई माया!".
त्यावर आई म्हणायची-- "शिक त्याच्याकडून. तुझ्या पेक्षा जास्तच ऐकतो तो माझं. कमीत कमी घराकडे लक्ष तरी असतंय त्याचं".

एक भारी गोष्ट म्हणजे त्याला लहान मुलांची फार एलर्जी होती. गेटजवळ मुलांच्या खेळण्याचा आवाज आला तरी हा भुंकत जायचा. एके दिवशी चुकून कुणीतरी गेट उघडं ठेवलं, आणि समोरच्या शाळेचे पोट्टे खिदळत चालले. ब्राउनीचा राग अनावर झाला आणि लेकरांच्यामागे सुसाट लागला. 
सीन असा होता-- लेकरं पुढे.. त्यांच्या मागे ब्राउनी आणि त्याच्या मागे मी. कसं बसं १००-२०० मीटरची शर्यत झाल्यावर ब्राउनीला गाठलं, आणि सगळ्यात आधी त्याच्या साखळी वर पाय ठेवला. लेकरं आणि मी पळू-पळू दमलो, पण हा साला फुल मूडमध्ये होता.
 
मला फार सवय होती.. येता-जाता त्याच्या कानफाडीत झापड मारायची. आधी तो लहान असताना क्वाय-क्वाय करून बोम्बलायचा. पण नंतर नंतर त्याने दादागिरी चालू केली. एके दिवशी अशीच जोरात कानशिलात हाणली, आणि त्याने माझा तळहात चावला. ब्राउनीनं 'कुत्र्या'सारखा मार खाल्ला त्यादिवशी. पण माझ्या चुकीमुळे बिचाऱ्याला बेघर व्हाव लागलं. काय शिव्या खाल्ल्या मी आईच्या.. बाप रे. एक तर ब्राउनी घर सोडून गेला, आणि दुसरी गोष्ट मला ४ इंजेक्शन्स घ्याव लागले होते.

त्यानंतर कुत्रे आणि माझ्यात हाडवैर झालं. याचा अर्थ असा नाही, की मी कुत्र्यांना भ्यायला लागलो.
काही दिवसांनी कळलं की माझ्या भरपूर मित्रांना कुत्र्यांची भीती वाटते. उदा. अज्या, डक्क्या, इ.

अज्या तर कहर होता. रात्री आमची मीटिंग संपली, आणि घरी जाताना गल्लीच्या तोंडाशी एखादा कुत्रा दिसला, तर अज्या तासंतास तिथंच बसून राहायचा. जेव्हा तो कुत्रा तिथून निघून जाइल तेव्हाच अज्या घरात जाई.

पंक्या आणि मी चहा पिताना कुत्र्यांचे डिस्कशन करतो. म्हणजे हा कुत्रा आता काय बोलत असेल? समोरच्या कुत्र्याची काय प्रतिक्रिया असेल? असं.

मागच्या दिवाळीला डक्क्याने कार घरी घेऊन जायचा प्लान ठरवला. जाता जाता एक कुत्रा त्याने यमसदनी पाठवला. त्यानंतर प्रत्येक कुत्रा त्याचा वैरी झाला. परवा आम्ही लोहगडावर चाललो होतो, आणि वाटेत बरेच कुत्रे दिसले. आम्ही त्यांना हाय-बाय करत चाललो होतो, पण एका कुत्र्याने डक्क्याची हलकट नजर ओळखली आणि आमच्या मागेच लागला. डक्क्या एवढा दचकला की त्याने चौधरीची अनमोल बॉटल हातातून सोडून दिली. नशीब, माझा मोबाईल फेकला नाही. एकवेळ माझा मोबाइल पडला असता तर मी कमी शिव्या दिल्या असत्या. पण चौधरीने अर्धा तास डक्क्याचा दिमाख खाल्ला. का? तर बॉटल पाडली! ती पण कुत्र्याच्या भीतीने!

असो, श्वान-पुराणात इतकंच!

-पी.के.

No comments: