Wednesday, February 20, 2013

पंक्या

माझ्या बऱ्याच ब्लॉग पोस्ट्स मध्ये मी माझ्या मित्रांबद्दल लिहिलं आहे, पण कधीच त्यांची ओळख नाही लिहिली. आता एकेक करत सगळ्या कार्यकर्त्यांबद्दल लिहावं म्हणतो. सुरुवात पंक्यापासूनच झाली पाहिजे. 

पंक्या काही कॉलेजचा दोस्त नाही, मी जेव्हा कॉलेज सोडून कंपनी जॉईन केली, त्या दिवशी पंक्याची आन माझी भेट झाली. ठिकाण होतं कंपनीचं ऑफिस-- आम्ही सगळे चोर धरून आणल्यागत उभे होतो. आमच्या कॉलेजचा मी फक्त एकटा कार्यकर्ता सेलेक्ट झालो होतो, त्यामुळे माझे कोणी मित्र नव्हते. म्हणायला तसा बंटी होता माझ्यासोबत, तो नांदेडच्याच दुसऱ्या कॉलेजमधून आला होता. 

मी आन बंटी जरा गप्प गप्पच बसायचो, पण पंक्या आणि त्याच्या कॉलेजचे बाकी पोट्टे खी-खी करायचे. आमचं इंडक्शन चालू झालं, आणि हळू हळू पोट्यांची ओळख होऊ लागली. महिन्याभराने मी कंपनीने दिलेली हॉटेलची रूम सोडली, आणि कर्वेनगरला शिफ्ट झालो. इथून येणं-जाणं श्रीकांत्याच्या बाइकवरच.

पंक्या राहतो वडगावला, आणि जाता जाता राजाराम पूल लागतो. मग पंक्या माझ्यासोबत यायचा, मी त्याला राजाराम पुलाजवळ सोडून पुढे जायचो. त्यावेळी मी जरा रिजर्व्ड टाईपचाच होतो, आणि कधी कधी रूमपार्टनरला पिक अप कराव लागायचं म्हणून पंक्याला दुसरा ऑप्शन पहाव लागायचा. 

पण नंतर मी स्वतःची गाडी घेतली, आणि पंक्याची आणि माझी चांगलीच दोस्ती झाली. हार्डली असा एखादा दिवस जायचा की मी आन पंक्या सोबत घरी गेलो नाही. ऑफिसमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता सोबतच व्हायचा. 

ओळख झाल्यापासून थोड्याच दिवसात आम्हा दोघांना कळल की आम्ही दोघे एकाच केटेगरीचे आहोत, मग काय! रोज धिंगाणा चालू झाला, उठता बसता शिव्या चालू झाल्या. नव-नवीन शिव्या आम्ही शोधून काढायचो. कधीकधी नवीन म्हणी सुद्धा बनवायचो. मागे एका ब्लॉग पोस्ट मध्ये बोललोच की आम्ही गाण्यांना सुद्धा सोडलं नाही. 

पुण्यात नवीन असताना मी माझ्या कोलेजच्या मित्रांना प्रायोरिटी द्यायचो, पण आता पंक्या आणि बाकी ऑफिसचे पोट्टे जिगरी दोस्त बनले. पंक्या एवढा खास, की आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो- घरचे प्रॉब्लेम्स, गर्लफ्रेंडचे लफडे (म्हणजे एकेरी लफडं असो, की दोन्ही बाजूने), आणि बरंच काही. 

कहर तर तेव्हा झाला जेव्हा आमचा डेस्क शिफ्ट झाला आणि आम्ही दोघे एकमेकांच्या बाजूला बसायला लागलो. आमचं काही नाही, पण आजूबाजूच्या लोकांना आमच्या शिवीगाळीची सवय झाली :) आधी त्यांना जरा आमचं बोलणं आक्षेपार्ह वाटायचं. पण नंतर त्यांना कळून चुकलं की हे पोट्टे सुधारणारे नाहीत, आपणच बदलावं. त्यांचा तो डिसिजन चांगला होता. 

तसं पाहिलं तर पंक्या पटापट दोस्त बनवतो. रिसेंटली तो दुसऱ्या टीममध्ये शिफ्ट झाला, आणि २-३ दिवसातच त्याने तिकडेपण टोळी बनवली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला राग लई कमी येतो. आणि प्रत्येक गोष्ट लाईटली घ्यायची सवय असल्यामुळे लोकही लवकर कनेक्ट होतात. पंक्यामुळे पारेख, अप्पी आणि बाकी पोट्टे आमच्या ग्रुप मध्ये आले, त्यांच्या बाबतीत नंतर कधी लिहीन. 

जरी पंक्या आता दुसऱ्या टीम मध्ये गेला, तरी आमचा धिंगाणा काही कमी नाहीये. सकाळी सकाळी ९ वाजता मी ऑफिसला येतो, तेव्हा अर्ध्या वाटेत असतानाच पंक्याचा पिंग येतो-- "लई भूक लागलीय, कधी येणारेस?".  अजूनही आमचा ब्रेकफास्ट सोबतच होतो, आणि मग खाली टपरीवर जाउन स्पेशल चाय. तिथंही वाह्यातपणा अजूनही चालूच आहे. विशेष म्हणजे टपरीवाला पण कधी कधी आमच्या वाह्यातपणात सहभागी होतो :)

तर असा हा पंक्या. लिहायला भरपूर काही आहे, पण नेमकं आत्ता लक्षात येत नाही :)

-पी. के. 

1 comment:

pankaj said...

Thanks PK....sagal Kasa mast lihil ahe......Chan vatal Vachun....thanks