Thursday, February 28, 2013

भैरोसिंग (बंटी)

बंटी म्हणजे आमच्या ताफ्यातला मोठ्ठा प्राणी. पूर्ण नाव-- यशवंत जीवनराव देशपांडे. 
खूप दिवसांआधी यांच्या नावाने एक पोस्ट टाकली होती, पण त्या वेळी याचं वर्णन अतिशय कमी शब्दांत झालं होतं. खरं तर यांच्या देहयष्टीच्या मानाने तेवढी छोटी ब्लॉग पोस्ट म्हणजे लज्जास्पद ठरेल, म्हणून परत एकदा व्यक्तीवर्णन!

बंटीचं मूळगाव अजून कुणालाही ठाऊक नाही, ते एक न समजणारं कोडं आहे. हिंगोली, वसमत, नांदेड, की यमलवाडा यावरून सगळ्याचं दुमत होतं. बंटी सांगायचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी कोडं तितकंच किचकट होत जातं, म्हणून आम्ही याविषयी अति विचार करणं सोडून दिलंय. 

बंटीची आणि आमची ओळख फर्स्ट इअर पासून. एकदा असंच कॉलेजच्या कोरीडॉरमधून फिरत असताना बंटी पळत आला, आणि फ्रेशर्स पार्टी मध्ये येण्याचं आमंत्रण देऊ लागला. १-२ दिवसांनंतर भार्ग्या कडून कळलं की बंटी त्याच्या सोबत एन. एस. बी. कॉलेजमध्ये होता. फर्स्ट इअर मध्ये त्यानंतर बंटीचा आणि आमचा जास्त काही संपर्क नाही झाला. 

सेकंड इअरचे डिजिटल इलेक्ट्रोनिक्स आणि बेसिक इलेक्ट्रोनिक्स म्हणजे बंटी आणि टोळीची दुखती नस. भार्ग्या च्या ओळखीमुळे डक्क्याची आणि माझी दोस्ती जमली, आणि तो माझ्यासोबत बसायचा, आणि त्यामुळे बंटीभाऊ आणि टोळी आमच्यासोबत चिकटली. त्यावेळी बंटीभाऊ सोबत बिल्डर घेऊन फिरायचे, म्हणून कॉलेजमध्ये एक 'दरारा' असायचा. वर्गात आणि   Practical मध्ये विनाकारण खी-खी करणे ही या टोळीची खासियत. यांच्यामध्ये बाजीराव सुद्धा शामिल होते. 

दरम्यान, बंटीला एकदा कानाचा आजार झाला आणि कमी ऐकू यायला लागलं. बंटीचं 'भैरोसिंग' असं  नामकरण व्हायला एवढं कारण पुरेसं होतं. त्यानंतर बंटीने बरेचदा सिद्ध करून दाखवलं की त्याला खरंच बहिरेपण आलंय. मग ते मोबाईल ऐकू न येणे असो, की ड्रील मशीनचा आवाज विमानासारखा वाटणे असो. 

सेकंड इअर च्या शेवटी ही टिंगल टवाळी बंटी आणि बिल्डरला महाग पडली, आणि तीन-चार विषय घालून एक वर्ष घरी बसले. बंटी म्हणजे एवढी प्रसन्नमूर्ती की, आपलं वर्ष गेलंय त्याच्या दुःखापेक्षा शत्रूचे १-२ विषय घातले याचं त्यांना समाधान! त्यात कहर म्हणजे बंटीभाऊंनी लेक्चररसोबतच्या एका भांडणात नाहक आम्हाला अडकवल होतं :) आम्ही साफ सुटलो, पण बंटी पुरता अडकला होता. 

असो, एक वर्ष कम्प्लीट झालं आणि बंटी परत कॉलेजमध्ये रुजू झाला. नवीन मित्र भेटल्यामुळे बंटीचा आणि आमचा संपर्क तसा तुटलाच. पण मी रोज भाग्यनगरची वारी करायचो म्हणून बंटी अधून मधून भेटायचा. पण टी. वी. च्या अतूट प्रेमापोटी तो आमची भेट बरेचदा टाळायचा. बालिका वधू आणि तत्सम 'सास-बहु' सिरिअयल्स म्हणजे त्याचे फेवरेट कार्यक्रम. अजूनही त्याला सगळ्या पात्रांची नावं तोंडपाठ आहेत. 

आमचं कॉलेज जीवन संपलं आणि आम्ही नोकरी निमित्ताने पुण्याला आलो. अधून मधून बंटी आम्हाला फोन करत असे. नांदेडला गेल्यावर त्याची आणि आमची भेट ठरलेलीच असायची पण इथे सुद्धा 'सास-बहु' आडव्या यायच्याच. 

बंटीने फायनल इअर डिस्टींक्शन घेऊन काढलं आणि थेट आमच्या रूमवर अवतीर्ण झाला. रूमवर आल्यावर कसून तयारी चालू झाली आणि काही महिन्यातच बंटीने नोकरी मिळवली. 

बाहेरच्या जेवणावर बंटी आधीपासूनच नाराज असायचा. जेवण घरी बनवायला सुरु केलं, आणि बंटीच्या कलागुणांना वाव मिळाला. रोज नवनवीन पदार्थ आम्हाला खायला मिळत आहेत. तसंच बंटीच्या वसमत वारीनंतर नवनवीन शब्द सुद्धा शिकायला मिळतात. 

उदा. 
१. सिनेमात एखादा इरोटिक सीन आला तर -- हिरो हिरोइनचा 'हिसाब' करत आहे. 
२. जेवण 'नंबर एक' झालंय . 
३. 'वन साईड' खाल्लं (म्हणजे खूप खाल्लं). 
४. आज 'आवताण' आहे (आमंत्रण)

मागे काही दिवसांआधी आम्ही ट्रिप्स आयोजित केल्या होत्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली कि बंटी जास्त फिरला नाही, आणि मित्रांसोबत एखाद्या ट्रीपला जाण्याची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावरून साफ दिसते. लगेच अंगाला गुदगुल्या होणे, अति एक्साईट होणे हे गुणधर्म. 

त्यातल्या त्यात कुणाच्या हातात केमेरा दिसला तर बंटी सहनशीलता सोडून फोटोसाठी तयार होतो. मग समोरच्या माणसाला फोटोग्राफी सोडून पोट्रे काढावे लागतात. मागे दिवेआगरच्या पोस्ट्स मध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की एस. एल. आर. केमेरा असून सुद्धा मला 'नेचर फोटोग्राफी' करता आली नाही :P 

तर असा हा बंटी. अजून काही गोष्टी आहेत, त्या लिहिल्या तर बंटी हाणेल. म्हणून पोस्ट आटोपतो. 

-पी. के. 

No comments: