Thursday, May 27, 2010

कॉलेज प्रोजेक्ट-३

कसाबसा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला, कम्प्लीट म्हणजे अजून थोडे एन्हांसमेंट राहिले होते, पण अगदीच गरज नव्हती. बाकीच्या पोरांना सुद्धा मदत करून झाली. सगळी तयारी झाली होती, आणि कॉलेजला निघालो. आज वर्गात आल्या आल्या बारकं आल, आणि त्याने सांगितल "अबे प्रसाद्या, फायनल डेमो आपला प्रोजेक्ट गाईड घेणार नाही, दुसऱ्या पोरांचा गाईड येऊन आपला प्रोजेक्ट चेक करणार म्हणे".

मी थोडा विचार केला च्यायला, आपला प्रोजेक्ट आपणच बनवलेला आहे, टेन्शन कशाला घ्यायचं? लगेच भराभर लबमध्ये जाऊन बसलो. प्रोजेक्ट कॉलेजच्या कम्प्युटरमध्ये टाकला, पण नशीब खडतर! कॉलेजच्या कम्प्युटरमध्ये भयंकर वायरस होते, आणि त्यामुळे प्रोजेक्ट रन होत नव्हता. आली ना पंचाईत! आमच्याकडे लपटोप होता, त्यात प्रोजेक्ट व्यवस्थित रन होत होता, आम्हाला वाटल की काही प्रोब्लेम होणार नाही. पण तसं नव्हतं, एच.ओ.डी. ने अगोदरच सांगून ठेवलेलं होत की कुणीही लपटोपवर प्रोजेक्ट दाक्यावायचा नाही.

आमचा प्रोजेक्ट तपासण्यासाठी एक मडम आली. तिला जास्ती काही येत नव्हत, पण शहाणपणा अति! मी एक आयडिया केली, तो लपटोप लनमध्ये एके ठिकाणी जोडून टाकला. आणि कॉलेजच्या कम्प्युटरवर प्रोजेक्ट रन करू लागलो. व्यवस्थित रन होत होता, तेवढ्यात गण्याने तिच्याशी पंगा घेतला. ती चिडचिड करायला लागली. आणि लगेच तिने आरोळी ठोकली, तुमचा कोड दाखवा. मी त्या कम्प्युटर वर कोड कॉपी करून ठेवलेलं होता, तो दाखवणार एवढ्यात गण्याने तोंड फाडले- "मडम, कोड त्या लपटोपवर आहे!" मग काय, ती थैमान घालून एच.ओ.डी. कडे गेली. आणि सगळा प्रकार तिने तिथे सांगितला. आमची चांगलीच वाट लागली होती, पण आम्ही सुद्धा धुरंदर! सरळ एच.ओ.डी. ची केबिन गाठली, आणि सगळी माहिती दिली. डेटाबेस वर्क करत नाही, अपाचे वर्क करत नाही, वेब सर्वर वर्क करत नाही, हे सगळे उदाहरणासहीत स्पष्ट केले. आणि परत परमिशन मिळाली. पण गण्याच्या तोंड फाडण्यामुळे ग्रेड फालतू मिळाला.

इकडे बारक्या, श्रीकांत्या, आणि निख्याचा प्रोजेक्टसुद्धा बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला होता. एव्हाना श्रीकांत्याच्या घरी आमच (डक्क्या आणि मी) जाणं वाढल होत. हे गण्याला बिलकुल आवडायचं नाही. तो मला नेहमी सांगे, "प्रसाद्या यार कशाला जातोस तिकडे? ते श्रीकांत्या लई खडूस आहे, काम झाल की नंतर भांडते". मी एकदा ह्या वरून गण्याला खूप झापल. मी म्हणालो, च्यायला तुम्ही दोघं भांडून घेता, आणि आम्हाला कशाला बंधन घालता, ह्याला बोलू नको, त्याला बोलू नको.. खड्ड्यात जा.. मी जातो तिकडे, तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. तो तिकडे यायचा नाही, म्हणून त्याला प्रोजेक्टमध्ये काय चालू आहे, काय नाही, काहीही कळायचं नाही. म्हणून तो व्यथित असायचा.

एके दिवशी मी डक्क्या च्या घरी बसलो होतो, आणि डक्क्या त्याच्या वडिलांना बाहेर सोडायला गेला होता. तेवढ्यात गण्या आला. आता भांडायचं कशाला म्हणून काही बोललो नाही. मी माझ काम करत बसलो. हा नुसता तिथे बसून होता, पेपर चाळीत! काही वेळाने मला तहान लागली. उन्हाळा होता. कुलर चालू होत. मी गण्याला म्हणालो, "गण्या, तहान लागलीये यार. जरा डक्क्याच्या घरी पाणी मागतोस का?" तो म्हणाला, नाही यार. मला कोणी ओळखत नाही. त्यावरून आमच्यात खटका उडाला. मी म्हणालो, हरामखोर, पाणी मागायला ओळख लागते का बे? पण त्याने शेवट पर्यंत पाणी काही आणल नाही. थोड्या वेळाने, उकडत होत. म्हणून मी गण्याला म्हणालो, "अबे, त्या कुलर मध्ये पाणी आहे का पहा!". लगेच तो म्हणाला "कशाला, प्यायला का?". मी अजूनच चिडलो, "अबे अये, कुलरच पाणी आपल्या बापाने पिलं होतं का रे?" लगेच हाणामारी चालू होणार होती. पण डक्क्याने ती टाळली.

प्रोजेक्टच्या शेवटच्या काही दिवसात मी श्रीकांतकडे जायचो. तिथे काही गमती झाल्या. त्या पैकी ही एक-
सकाळी ९ पासून आम्ही प्रोजेक्टमध्ये किडे करत होतो. दुपारी १-२ वाजता थोडे थकलो. मग, उगाच त्याच्या घरात फिरत बसलोत. ह्या खोलीतून त्या खोलीत. तिथे त्याच्या बहिणीने बनवलेला एक रोबो होता.

मी-- अबे हे काय आहे?
तो-- अरे हा रोबो आहे. माझ्या बहिणीने बनवला आहे.
मी-- चालतो का हा?
तो-- हो, चालतो की.
मी-- सेल वर चालतो का?
तो-- नाही बहुतेक डायरेक्ट पावर द्याव लागते. थांब. आपण चालू करूयात.

तोपर्यंत तिथे निख्या आणि बारकं पण आले, आणि तमाशा बघू लागले. श्रीकांतने रोबो हातात धरला, आणि मी त्याच्या वायर्स मेन स्वीचपाशी घेऊन गेलो. मी त्याला विचारल, लावू का रे? तो म्हणाला लाव!
मी पावर लावली, पण काही होत नव्हत. मग त्याला लक्षात आल, की तिथे एक बटन आहे. त्याने ते बटन दाबल, आणि फाडकण आवाज आला. मोठ्ठी ठिणगी निघाली त्या रोबो मधून आणि अक्षरशः जळाला. आमच्या दोघांना धडधड होत होती. कारण मोठ्या संकटातून वाचलो होतो. तिकडून निख्या आणि बारक्या विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होते.

तेवढ्यात बारकं बोंबललं, "अबे प्रोजेक्ट सेव केला होता का?"
मी- नाही, पण काय झालंय?
तो- अबे पूर्ण घराची लाईट गेलीये.
मी- च्या मायला! अबे श्रीकांत्या, तुला त्या लपटोपला बटरी बसवून घ्यायला काय होतंय बे?

मग आमची धावपळ चालू झाली ते इनवर्टर शोधण्यासाठी. ते कुठेतरी सज्जावर ठेवलेलं होत. तिथे गेलो, आणि २-३ बटन होते. कुठले तरी बटन दाबले, आणि त्याचा टिंग-टिंग आवाज बंद झाला. आणि लाईट आली.
हा दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाही :)
मी म्हणालो, च्यायला, उगाच त्या रोबो च्या मागे लागलो. चांगला प्रोजेक्ट करत बसलो होतो.

प्रोजेक्टमध्ये जे-जे चेंजेस केले होते, ते परत करावे लागले. पण ह्या वेळेस तेवढ अवघड गेल नाही.


क्रमशः

Wednesday, May 26, 2010

कॉलेज प्रोजेक्ट-२

आमच्या बॅचसाठी अजून एक फंडू रूल काढला आमच्या कॉलेजने. प्रोजेक्टचे डेमो होणार होते आमच्या बॅचपासून! त्यापैकी पहिले डेमो आपल्या प्रोजेक्ट इन्चार्जला दाखवायचे, आणि तिसरा म्हणजे फायनल डेमो म्हणे. पहिला डेमो महिन्याच्या आतच ठेवला होता, आमची तारांबळ उडाली. आम्ही अख्खा महिना काहीच केल नव्हतं. परवा डेमो द्यायचा म्हटल्यावर आम्ही आज प्रोजेक्टची सुरुवात केली.

सुरुवात जी.यु.आय. पासुन करायचं ठरवल आम्ही. मी आणि डक्क्या त्यादिवशी नेटवर बसलो, आणि एक मस्त थीम शोधून काढली आणि ती वापरायची म्हणून फायनल केली. आता प्रश्न उरला, आमच्या वेबसाईटला नाव काय द्यायचं? एक असंच नाव देऊन टाकल- ****mail ! थीम थोडी मोडीफाय करायची गरज होती, आमच्याकडे बरेचसे सोफ्टवेअरस होते, कुठूनतरी **** नाव घेतल, आणि दोन इमेजेस वजा करून एक नवीन इमेज मिळवली, ती थीम म्हणून वापरली. आता आमची वेबसाईट कुठे थोडी चांगली दिसू लागली.

आता पहिलं पेज, साईन अप. ते बनवलं, साईन अप चा थोडा कोड लिहिला. तो व्यवस्थित वर्क करायला लागला. लॉग इनचं सुद्धा पेज बनवल, आणि युजर ऑथेंटीकेशनचा थोडा कोड लिहिला, तो सुद्धा मस्त काम करायला लागला. विचार केला, पहिल्या डेमोसाठी एवढ खुप झाल, जास्ती नको. नाहीतर उगाच मास्तरला वाटायचं की ह्यांनी प्रोजेक्ट विकत आणलाय.

लगेच एकाचा फोन आला, "प्रसाद्या, अबे आमच्या प्रोजेक्ट मध्ये लफडे आहेत बे! जरा करून देतोस का?"
मी- मिनिट थांब. माझा प्रोजेक्ट झाला की लगेच करतो.
माझ काम झाल, आणि मी लगेच त्याला कॉल केला. "ये बे!".

त्याच काम कमीच होत, पण किचकट होत. झालं एखाद्या तासात कम्प्लीट. मग मस्त इडली खाऊन दुसऱ्या दिवशीच्या तयारीला लागलो. प्रोजेक्ट इन्चार्ज तसा माझा मित्रच होता, माझा म्हणजे, माझ्या घराबाजुच्या पोराचा क्लासमेट होता तो. तर बरेचदा आम्ही मस्त गप्पा मारायचो. प्रोजेक्टच्या वेळी सुद्धा इन जनरल गप्पा चालू होत्या आमच्या (अवांतर ;) ). पहिला डेमो झाला, आणि त्याने मस्त ग्रेड दिला. खुश झालो. (अजून अद्दल घडवायची बाकी राहिली होती.)

पुढचा डेमो अजून बराच लांब होता. जवळपास एक महिना! बाकी पोर पण वर्गात त्याच गप्पा करायचे, "अबे ह्याच काय झालं? त्याच काय झालं?" वगैरे वगैरे! मी आणि डक्क्यासुद्धा मग चर्चा करायचो. आणि हा गण्या सगळ ऐकायचा, पण हरामखोर कधीच मदत करायचा नाही. बहुतेक आम्ही जी चर्चा करायचो, त्यातल ह्याला फारस कळायचं नाही. आणि मी मुद्दाम सांगायचो सुद्धा नाही, तशी मी डक्क्याला सुद्धा सक्त ताकीद देऊन ठेवली होती. ह्यावेळी मी आणि डक्क्या थोडे अगोदरपासूनच कामाला लागलो. कारण ह्यावेळी जवळपास ५०-६०% कम्प्लीट करायचा होता प्रोजेक्ट. मस्त प्रोग्रेस होती, आणि जस पाहिजे तसं आउटपुट येत होत.

एव्हाना डक्क्याला सुद्धा कोडींग जमायला लागली होती. छोटे मोठे पेजेस तो सुद्धा बनवायला मदत करत होता. किंवा कमीत कमी कुठून छानशी इन्फोर्मेशन काढत होता आणि मला सांगायचा. त्याच दरम्यान बारक्याचा प्रोजेक्ट सुद्धा अडकला होता. तो सुद्धा आम्हाला कधी बोलावी. त्यासाठी आम्ही श्रीकांतच्या घरी जायचो. तिथे कुणीही नसायचं, इकडे बारकं आम्हाला बोलावून परेशान, आणि तिकडे श्रीकांत आणि निखील चे भांडण!

पहिल्यांदा मी आणि डक्क्या तिथे गेलो, तेव्हा ते दोघे अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी मारामारी करत होते. मी बारक्याला विचारल, अबे काय झालंय? तो म्हणाला, काही नाही तू बस. हे नेहमीचंच आहे! तिथे रात्रभर बसण्यात काय मजा यावी, व्वाह! त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये काही लफडा झाला की २ मिनिट तिकडे पहायचं, आणि मग परत आपल काम सुरु! ते त्याचं करत बसणार. आपण आपलं. मध्येच निख्याचे चाळे चालू व्हायचे.

अशीच एक गम्मत आहे- आमचा प्रोजेक्ट आलमोस्ट झालाच होता, आणि श्रीकांतला काही तरी मदत हवी होती. मलाही काही सुचत नव्हतं. मग आम्ही दोघांनी नेटवर खूप शोधून शोधून एक युक्ती काढली आणि पाहिजे तसा कोड करत होतो, तेवढ्यात निख्याच्या डोक्यात काय आलं देव जाणे, तो श्रीकांतला म्हणाला, "अबे श्रीकांत्या, हे बटन कशाचं आहे?" आणि काही कळायच्या आत त्याने ते बटन दाबले!
ते लटापच्या लीडचे बटन होते. ते दाबताच सगळ बंद पडल. लगेच श्रीकांत्या खवळला, आणि मारायला कुठली वस्तू भेटते का ते बघू लागला. इकडे निख्याची कुठे लपू आणि कुठे नाही अशी घाई चालली होती :)


क्रमशः

Tuesday, May 25, 2010

कॉलेज प्रोजेक्ट- १

असंच बसल्याबसल्या कॉलेजची आठवण आली (का आली ते नका विचारू), लगेच पाठोपाठ प्रोजेक्ट आठवू लागला. ऑफिसमध्ये काही जास्त काम नव्हतं, म्हटलं एखादी पोस्ट लिहूनच टाकावी प्रोजेक्टवर!

आमच्याकडे प्रोजेक्टच फार फॅड लोकांना! जेव्हा लेक्चरर सांगतो, की येत्या १५ दिवसात तुम्हाला प्रोजेक्टची नावे द्यायची आहेत, सगळ्यांची धावपळ सुरु होते. काही जणांना मी तर प्रोजेक्टची लिस्टच घेऊन येताना पाहिलं. सरकडे जायचं आणि त्यांना एखादा प्रोजेक्ट सांगायचा, त्यांना आवडला नाही की नेट वर बसायचं, आणि दाखवायचं की मी काहीतरी सर्च करतोय. आणि लगेच - तासात नवीन प्रोजेक्टच नाव घेऊन जायचं. आणि शेवटी कसबसं प्रोजेक्ट फायनल झाल्यावर जिथून ती लिस्ट आणलीये, त्याच्याकडे जाऊन प्रोजेक्टची किंमत ठरवायची, असा मस्त बेत असायचा.

माझ्या प्रोजेक्टची कहाणी थोडी वेळी आहे. माझा एक मित्र होता, मी जवळपास दुसऱ्या वर्षापासून त्याच्यासोबत राहत होतो. जेव्हा सरांनी प्रोजेक्टची नावे सुचवा असे सांगितले तेव्हा हा सुट्टीवर गेला होता त्याच्या गावी. कॉलेज चालू होऊन जवळपास १० दिवस झाले होते तरी याचा यायचा पत्ता नाही. म्हणून आम्ही थोडी गम्मत करायचं ठरवल. त्याला फोन केला, आणि सांगितल- "अबे, आज संध्याकाळपर्यंत प्रोजेक्टच नाव द्यायचय, सर म्हणले की जर एखादा पोरगा नसेल तर त्याला तुम्ही प्रोजेक्ट पार्टनर बनवू शकत नाही. तू लगेच इकडे ये. आणि येणार नसशील तर सांग काय करायचं ते!". तो चपापला, पण त्याला घरी राहायचा मोह आवरत नव्हता. तो काही आला नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी फोन करून त्याला सांगितल, "अबे, काल आम्ही खूप प्रयत्न केले, पण सर काही ऐकले नाहीत. मी आणि डक्क्या दोघे मिळून प्रोजेक्ट करणार आहोत. आम्ही एक टॉपिक दिला आणि सरांनी तो मान्य केला". हा लगेच चिडून तिळपापड झाला. दुसऱ्याच दिवशी हा कॉलेजात थडकला. अरेरावीची भाषा चालू केली त्याने! तू असा कसा दुसऱ्या सोबत प्रोजेक्ट करू शकतो? आपण ठरवल होत , की सोबत प्रोजेक्ट करायचा, मग?

पण तो पर्यंत सगळ्यांना ह्याबद्दल कळून चुकले होते, आणि सगळे पोरं माझी साथ द्यायला लागले. सगळ्यांनी त्याला सांगितल, अरे, सर ऐकत नव्हते. आम्हीही तसंच केल. जे आमचे मित्र नव्हते त्यांना प्रोजेक्ट मधून बाहेर काढल. हा तेवढ्या पुरता शांत झाला. लगेच दुसऱ्या पोराकडे गेला, हा मुलगा त्याच्या रूम्शेजारी राहायचा. त्याला ह्याने माझ्याबद्दल बरेच सांगितले, लई शहाणपणा करतो म्हणे, स्वतःला काय समजतो म्हणे, मी त्याला दाखवतो मी काय चीज आहे ते! प्रोग्रामिंग फक्त ह्यालाच येते काय? आम्ही पण करू शकतो म्हणे!! चल बे, आपण दोघे मिळून प्रोजेक्ट करू म्हणे! आणि त्या दोघांनी युती बनवली. काय काय बोलला तो कोणास ठाऊक?

- दिवसांनी त्याला समजले की हे सगळेजण गम्मत करत होते, मग हा परत त्या पोराकडे गेला. आणि त्याला सांगितल, "अबे प्रसाद्या मजाक करत होता. एक काम कर, तू दुसरा कुणीतरी पार्टनर शोध आणि तू तुझा प्रोजेक्ट कर". आता हा जो मुलगा होता, तो भयंकर संतापला ! त्याने लगेच मला फोन केला आणि बोलावून घेतले. आणि त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या माझ्या प्रोजेक्ट पार्टनर ने त्याच्याकडे बोलल्या. मी हि संतापलो. आणि त्याला म्हणालो- "मर भडव्या! आता तर खरच मी तुला प्रोजेक्ट मध्ये घेणार नाही. जा खड्ड्यात!". पण माझा तिसरा जो प्रोजेक्ट पार्टनर होता (डक्क्या) , त्याने माझी समजूत काढली आणि ह्याला आमच्या प्रोजेक्टमध्ये घेतल.

त्या दिवशीपासून प्रोजेक्टची तयारी चालू झाली. कुठून सुरुवात करायची, काय काय युज करायचं, कुठली टेक्नोलॉजी वापरायची सगळ ठरल होत. पण हा जो आहे, त्याला आपण "गण्या" म्हणू (खर नाव सांगितलेलंच बरं) हा गण्या कुठल्याही डिस्कशन मध्ये सहभागी व्हायचा नाही. ह्याच सगळ लक्ष पोरी, जी.एस. इलेक्शन, gathering ह्यात असायचं. आम्ही त्याला बरेच वेळेस समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण हा कधी ऐकायचा नाही. पण मी ही काही कमी नव्हतो, मी सुद्धा ह्याला अद्दल घडवण्याचा प्लान तेव्हाच तयार केला आणि पुढच्या कामाला लागलो.

क्रमशः

Friday, May 14, 2010

मी पाहिलेला थर्ड क्लास चित्रपट: जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ

असाच एके दिवशी ऑफिस मधून निघत होतो, म्हटलं एखादा चित्रपट रूमवर नेऊन बघावा. माझ्या ऑफिसमध्ये बरेच चित्रपट असतात इकडे तिकडे पडलेले. चांगला एखादा न्यावा म्हणत होतो म्हणून बाजूच्या मित्राला विचारल, अरे बाबा, ह्यापैकी बघण्यासारखा कोणता आहे? त्याने लगेच उत्तर दिलं-- जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ.
मी-- हम्म, नाव तर भारी दिसत आहे, बघुयात तरी काय आहे ते ह्यात?
मी तो चित्रपट पेन ड्राइव्ह मध्ये टाकला आणि रूमकडे निघालो. गेल्या गेल्या रूमवरच्या मित्रांना खुशीत सांगितलं, बाबांनो मस्त पिच्चर आणलाय. बघुयात.

चालू केला, तेव्हा थोडा ठीक वाटला कारण अजून जर्नी चालू झाली नव्हती. ष्टोरी काही अशी आहे--

एक मुलगा असतो, त्याचा बाप म्हणे कुठला की शास्त्रज्ञ असतो. आणि असे सांगितले गेले आहे की त्याच्या बापाने पृथ्वीचे सेंटर पहिले आहे. तो तिथे गेला होता, काही काळ राहिला होता, नंतर त्याला डायनासोरने खाल्ले आणि तो तिथेच मेला.
ह्या पोराच्या बापाचा कुणी एक मित्र असतो, ज्याला नेहमी स्वप्न पडत असते की हा कुठे तरी विचित्र ठिकाणी गेलाय आणि ह्याच्या मागे एक डायनोसोर लागलाय. तो धडपडत पळतोय जीव वाचवण्यासाठी आणि भसकन मध्येच त्याला जाग येत असते.

मग काही दिवसांनी तो मित्र ह्या पोराकडे येतो. ह्याला एके ठिकाणी घेऊन जातो, ते म्हणे पृथ्वीच्या केंद्राकडे जायचे ठिकाण आहे! त्याअगोदर ते कुठल्यातरी पोरीकडे थांबतात. जेव्हा हे तिथे (केंद्राकडे जाण्याच्या ठिकाणी) जातात, तेव्हा त्यांना तिथे कुठलेसे यंत्र दिसते. यंत्र कसले, साली पंक्चर ची मशीन असेल, उग आपल्याला भासवतात की काहीतरी लई भारी मशीन आहे. मग तो (ह्या पोराचा काका) ते यंत्र उखडून टाकतो, की लगेच आकाशात काळे ढग काय येतात! विजा काय चमकतात! भूकंप काय व्हायला लागतो, बाप रे.. मग तिथे त्यांना एक खंदक दिसतो. आडोसा म्हणून ते त्यात जातात, आणि लगेच एक वीज पडते आणि तो खंदक बुजून जातो! आता काय?

मग हे थोडे मध्ये जाऊन पाहतात. मध्ये त्यांना कुठली तरी खान असल्यासारखी दिसते. तिथे खूपसारे यंत्र असतात. छोटी रेल्वे सुद्धा दाखव्लीये. मग हे लोक एकेका डब्ब्यात जातात. हा रस्ता मग भयानक होत जातो. एका डब्ब्याची धावपट्टी संपल्यावर एक जन दुसऱ्या डब्ब्यात उडी मारतो, दुसरा तिसऱ्या डब्ब्यात.. अरे काय हा पोरखेळपणा? मग ती गाडी एके ठिकाणी थांबते, तिथे ते लोक पाहतात तर हिऱ्याची खान असते. हे लोक खाणीत जातात खरे, पण तिथली जमीन म्हणे फारच तकलादू असते. त्या पोराच्या हातून एक हिरा जमिनीवर पडतो, आणि जमीन तडकून हे तिघे मध्ये पडतात. आणि खाली सेंटर कडे जातात. तिथे ते पाण्यात पडलेले दाखवले आहे.

मग ते लोक पाण्यातून बाहेर येतात, चालत जाताना त्यांना एक ठिकाण दिसते तिथे कुठले तरी पक्षी असतात, ह्या पक्ष्यांच्या अंगातून लाईट येत असतो! काय माहिती, त्या डायरेक्टरला बहुतेक काजवे दाखवायचे असतील पण चुकून पक्षी दाखवल्या गेला :) मग एक पक्षी येऊन ह्यांना पुढचा रस्ता दाखवतो. तिथे तापमान १०० डी.से. द्खावलेले आहे! आणि तेवढ्या तापमानात हे लोक जिवंत सुद्धा राहतात म्हणे! तिथे ह्यांना सूर्य सुद्धा दिसतो, आणि पुढे एक समुद्र दाखवलाय, ज्यामध्ये हे लोक एका रेडीमेड जहाजातून प्रवास करतात.. मग त्यांच्यांवर समुद्रातल्या भयानक माश्या हल्ला करतात! आणि सगळ्यात कहर म्हणजे तिथे ह्या पोराला त्याच्या आईचा फोन येतो! अरे, लोकांना काय पागल समजतो का तो डायरेक्टर? मग हे बेशुद्ध होतात आणि एकमेकांपासून वेगळे होतात..

मग ह्या पोराच्या काकाच्या मागे खरोखरच एक डायनोसोर लागतो, पण यावेळी तो वाचतो. ह्या पोराला एक पक्षी वाट दाखवतो आणि परत काकाकडे नेतो.. मग हे तिघे काहीतरी दिव्य प्रयत्न करून तिथून बाहेर पडतात आणि भूतलावर येतात.

पण एकंदरीत पिच्चर थर्ड क्लास आहे. पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जायला ह्यांना ते रेल्वेचे डबे काय मिळतात, तिथे लाईट वाले पक्षी काय दिसतात, डायनोसोर काय मागे लागतो, सूर्य काय दिसतो, केंद्रापाशी समुद्र काय दिसतो, तिथे माश्या काय हल्ला करतात, ह्याला तिथे मोबाईल फोनचे कवरेज काय येते! अरे अरे अरे, काही तरी रियालीस्टिक दाखवा न यार! बहुतेक १०-१२ वर्षाचा एखाद्या पोराने हा पिच्चर डायरेक्ट केला असावा!

तुम्हाला कधी या पिच्चरची सी.डी. मिळाली तर ती बघण्याच्या अगोदर तोडून फेकून द्या! विश्वास करा माझ्यावर.. चला, पोस्ट कम्प्लीट झाली. बर वाटल.

निरोप घेतो,
-पी.के.

Monday, May 10, 2010

लोकमत जाहिरात

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सकाळ-सकाळी काय मस्त झोप लागते (हिवाळा असल्यामुळे), बहुतेक साखरझोप म्हणतात ती हिलाच की काय! पण ह्या वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मला साखरझोप अनुभवताच नाही आली, मग काय! रोज सकाळी एक रिक्षावाला आमच्या रूमच्या खाली येऊन थांबायचा, आणि लगेच मोठ्या आवाजात एक गाणं लावायचा -- "वाचका, कोणते वृत्तपत्र घेऊ हाती..", तसं पाहिलं तर चाल एका गाण्याची घेतली आहे त्यांनी, ते गाणं झेंडा चित्रपटातील आहे- "विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती" मूळ गाणे फार छान आहे. पण हा गायक यार.. अक्षरशः बरळतो.

तो रिक्षावालासुद्धा भल्या पहाटे यायचा, म्हणजे सकाळी ६.३०-७.०० वाजता, आणि मी लगेच खडबडून उठायचो. मग घड्याळात पहायचे, किती वाजलेत बघू? च्या मारी! आत्ता ६.३० झालेत, झोपा अजून! पण झोप काही यायची नाही. कधी कधी थोडा डोळा लागायचा, की लगेच चालू.. वाचका कोणते वृत्तपत्र घेऊ हाती.. लोकमत फक्त एका रुपयात.. लोकमत फक्त एका रुपयात..

मी एके दिवशी विचार करत होतो, च्यायला ह्या रिक्षावाल्याच डोक दुखत कस नसेल? एके दिवशी त्या भल्या माणसाला पहायचा योग आला, हा कानात मस्त हेडफोन टाकून बसला होता! मी म्हटल बर आहे, आपण छान गाणी ऐकायची आणि इकडे दुसऱ्यांची झोप उडवायची..

मी एवढा चिडलो होतो त्या जाहिरातीवर, की एके दिवशी मला स्वप्न पडल, तो रिक्षा सकाळ-सकाळी आला, आणि जोरजोरात ती जाहिरात वाजवू लागला. मी चिडून उठलो, आणि एक चेंडू हातात घेतला, (हा तो स्पंज सारखा चेंडू आहे, ज्यावर स्माईली असते) गच्चीवर गेलो आणि त्या रिक्षावाल्याला फेकून मारला. पण तो रिक्षावर टप्पा खाऊन बाजूच्या मिठाईवाल्याच्या तेलाच्या कढईत पडला. तो माणूस वडापाव तळत होता, आणि त्याने तो तळलेला चेंडू एका माणसाला पावमध्ये घालून दिला, आणि त्या माणसाने तो खाल्ला सुद्धा! खाल्ल्यावर त्याला म्हणाला, आज पाव लई भारी झाला होता, मस्त मऊ होता.. मी पळत जाऊन झोपी गेलो.. आणि सकाळी उठल्यावर स्वतः वरच हसत होतो..

आता ती जाहिरात बंद झालीये. आणि वेगळीच कुठली तरी जाहिरात चालू केलीये त्या लोकमतवाल्यांनी. काही का असेना, आता मी माझी रूम बदलली आहे म्हणून झोपमोड होत नाही :) पण हे स्वप्न मात्र एक नंबर वाटल. म्हणून म्हटल पोस्त करूनच टाकाव.. त्यासाठी हा उपद्व्याप!

-पी.के.

Thursday, May 6, 2010

ट्राफिक: एक गंभीर प्रश्न

काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर ते कर्वेनगर मी १० मिनिटात जायचो, पण हल्ली २५-३० मिनिट लागतात, त्यामुळे विचार केला, च्यायला ह्या ट्राफिकवरती एखादी पोस्ट करावीच!

कारणे तशी भरपूर आहेत, पण काही ठळक करणे आपण इकडे डिस्कस करू :)

माझ्या मते सर्वात मोठं कारण म्हणजे चारचाकी वाहन चालविणारे.. जर आपण पाहणी केली तर १० पैकी फक्त २-३ चारचाकी वाहनात तुम्हाला २ जण बसलेले दिसतील. इतर कार्समध्ये फक्त १ माणूस बसलेला सापडेल. म्हणजे तुम्ही पाहू शकता, एका माणसासाठी एवढे पेट्रोल, रस्त्यावरती एवढी जागा वाया जात आहे आणि प्रदूषणाचाही प्रश्न आहेच की! परवाचीच गोष्ट सांगतो, मी नळस्टॉपच्या सिग्नलला थांबलो होतो आणि थोड्या वेळाने तिथे टोयोटा फोर्च्यूनर कार येऊन थांबली. आईशप्पथ सांगतो, एवढी उष्णता होती त्या कारची, की मला तिथून शेवटी थोडं पुढे जाव लागल! हा, ही एक समस्या. कारवाले मस्त ए.सी. लावून बसतात, पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या ए.सी.मुळे बाहेर किती उष्णता फेकल्या जात आहे!

त्यातल्या त्यात, काही गर्भश्रीमंत लोकांना आजकाल एस.यु.वी. चे फॅड लागले आहे. ह्या गाड्या पेट्रोल किंवा डिझल अक्षरशः गटागट पितात! परिणाम- प्रदूषण, उष्णता, आणि इंधन टंचाई. आणि मी काही गोष्टी पाहिलेल्या आहेत जशा-- सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीस्वार लवकर सुटून जातात, जेणेकरून रस्ता मोकळा होतो, पण चारचाकी वाहनधारक खूपच संथ गतीने गाडी चालवतात, त्यामुळे रस्ता मोकळा व्हायला वेळ लागतो.

दुसरा मोठा प्रोब्लेम म्हणजे पी.एम.टी.. हे पी.एम.टी. चालक भयंकर वेगात बस चालवतात. कित्येक वेळेस त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेले आहेत. बऱ्याच रस्त्यांवरती बी.आर.टी. नाहीये. त्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग बसेस व्यापून टाकतात. त्यामुळे दुचाकी आणि इतर चारचाकी वाहनांना रस्त्यावरती कमी जागा मिळते. कित्येक ठिकाणी तर सिग्नलच्या जवळच पी.एम.टी. चा स्टॉप असतो, मग प्रवासी चढू किंवा उतरू लागले की बाकी वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागते.

थोडा छोटा प्रोब्लेम म्हणजे स्त्री वाहनचालक. जेव्हा मुली किंवा स्त्रिया गाडी चालवतात, तेव्हा मागील पुरुषाला खरच सांभाळून चालवावे लागते. कारण स्त्रियांना ट्राफिक चे नियम जास्ती माहित नसतात, त्यामुळे त्या थोड्या विचित्र गाडी चालवतात. अपघातांना तेवढे कारण पुरेसे आहे, आणि अपघात झाल्यावर साहजिकच सहानुभूती मुलींकडे जाते. त्यामुळे एखाद्या पुरुषाची चूक नसताना सुद्धा त्याला मार खावा लागतो.

द्रुतगती महामार्गांवर तर कारचालक हद्द करतात. परवाचीच गोष्ट सांगतो, मी कापूरहोळ ते पुणे असा प्रवास करत होतो, तेव्हा एक कार माझ्या मागून सुसाट वेगाने पुढे गेली. पाच मिनिटानंतर मला माझ्या दृष्टीक्षेपात माणसांचा घोळका दिसत होता. मी माझा वेग जरा कमी केला, आणि पाहिले तर तीच कार अपघातग्रस्त झालेली दिसली. कारचा अक्षरशः चुराडा झालेला दिसत होता, कोण जाणे तो माणूस जगला का मेला! हे कारचालक स्वतः तर जीव धोक्यात घालतातच, आणि दुसऱ्यांचा सुद्धा जीव घेतात. त्यापेक्षा ट्रकचालक बरे, कारण त्यांच्यात "पेशंस" असतात, आणि कुठे किती वेग घ्यायचा ते त्यांना माहित असत.

कार किंवा दुचाकी वापरावर पूर्णपणे बंदी ही अशक्य आणि मूर्खपणाची गोष्ट होईल, पण खरच काहीतरी निर्बंध असले पाहिजेत, म्हणजे १ माणूस जर कार चालवत असेल तर तो कार ऐवजी दुचाकी वापरू शकतो. किंवा २ पेक्षा जास्त लोक बसणार असतील तरच कारचा वापर करावा. ही सरकारची जिम्मेदारी नसून वैयक्तिक जबाबदारी आहे असे मला वाटते. कारण जे दुष्परिणाम होतील, त्याला शेवटी आपल्यालाच सामोरे जाव लागणार आहे. कधी कधी सायकलचा वापरसुद्धा केला पाहिजे (हे मला सुद्धा लागू होईल), ह्याने ३ फायदे होतील, इंधन बचत, प्रदूषणावर कंट्रोल आणि वाहतूक सुरळीत होईल.

जाउद्या, च्यायला हे नेहमीच चालू राहील आपल्याकडे. कोण ऐकतंय?
आपण आपल्याला जे शक्य आहे ते करावे!

-पी.के.

Wednesday, April 21, 2010

दादा- भाग २

दादा आमच्या क्लासमध्ये आला आणि सगळ्यांना जणू शिस्तीचे धडे शिकवू लागला. बहुधा ह्यामुळेच त्याला जवळचा असा कोणी मित्र मिळाला नसावा. बेंचवर जो त्याच्यासोबत बसेल, त्याला तो प्रोफेशानालीजम सांगे.

अरे एक गोष्ट सांगायचीच राहिली- फाईनल इअरचे क्लासेस चालू झाल्यावर दादाला काही अपरिहार्य कारणामुळे वेळेवर येता आले नाही. तो ३-४ दिवस उशिरा आला. त्यामुळे एका प्राध्यापकाने त्याला हटकले. दादा जाम चिडला. त्याने लगेच हेड ऑफ डीपार्टमेंटची भेट घेतली आणि काय झाल होत ते सविस्तर सांगून त्या प्राध्यापकाचे कान भरवले. असा त्याचा स्वभाव!

डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीम हा त्याचा आवडता विषय. जेव्हा केव्हा ह्या विषयाचं लेक्चर चालू व्हायचं, तेव्हा हा बाजूला बसलेल्या पोराला पुढची लाईन अगोदरच सांगायचा! आमच्याकडे युनिक्सचा तास म्हटला, कि सगळे खुश व्हायचे. कारण, त्या तासाला झोप जरी काढली तरी कुणी काही म्हणायचे नाही. एकमेकांना खडू फेकून मारायचे विचित्र चित्र काढत बसायची असा आमचा त्या तासाचा प्रोग्राम असायचा. पण ह्याला मात्र ते बिलकुल खपायच नाही. एके दिवशी उठून हा चक्क त्या लेक्चररला म्हणाला- काय थेर लावलीत ही! तुम्ही पूर्ण वेळ लेक्चर का नाही घेत? त्या दिवशीपासून नवीन रुजू झालेले लेक्चरर ह्याला घाबरू लागले. एखाद्या दिवशी हा क्लास मध्ये नसेल तर पहिले पाढे पंचावन्न!

सबमिशनचे दिवस आले होते. सगळे लोक आम्ही आमच्या "एअर कंडीशन्ड" गरम लेबमध्ये बसलो होतो. जाम उकडत होत. सबमिशनसाठी उशीर होत होता. लेक्चररला त्याची काहीही काळजी नव्हती. त्याच्यासमोर पंखा चालू होता. हळू हळू एकेका पोराचे सबमिशन होत होते. आणि काय कोण जाणे आज दादा खुप खुश होता. गर्मीमुळे आम्ही सरची परवानगी घेऊन बाहेर बसलो. आता थोड बर वाटायला लागल होत. मग गमती जमती चालू झाल्या. मध्येच दादाला काय हुक्की आली कोण जाणे, त्याने तोंडातून बदकासारखा आवाज काढला. हा आवाज आमच्या लेक्चररच्या केबिनपर्यंत गेला. मग काय, भडकला की हो तो!
सर बाहेर आले. सगळ्यांना धमकी दिली.. आत्ताचा आवाज कोण काढला सांगा, नाहीतर एकाचही सबमिशन घेणार नाही. सगळे दोस्त दादाला विनवणी करू लागले. शेवटी आपला धीट दादा गेला तिकडे. आणि त्याने कबुली दिली. तरीही लेक्चरला खर वाटत नव्हत. मग ह्याने त्या लेक्चरर समोर तो आवाज काढून दाखवला आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला. आमचे सबमिशन झाले!

अरे हो! सबमिशन वरून आठवलं, असेच सबमिशनचे जर्नल लिहित असताना मला दादाचे जर्नल्स हाती लागले. लगेच त्याच्या आणि आमच्या जर्नल्स मधला फरक प्राकार्षाने जाणवू लागला.
पहिला- त्याचे जर्नल २५-३० पेजेसचे असायचे. आमचे ८-१०.
दुसरा- तो लाल पेन, काळी पेन, निळी पेन अश्या तीन पेन चा वापर करायचा. आम्ही जी मिळेल ती वापरायचो.

हे सगळ पाहून मला एका मास्तराने विचारलं, का रे कुलकर्णी? मी दिलेले प्रश्न मोठे, की तू लिहून आणलेले उत्तर?

अशा प्रकारे आमचा फाईनल इअर एकदाचं संपलं. एग्जाम झाल्यावर सेंड ऑफ ठेवला होता कॉलेजने. तिथे एकदा दादाची भेट झाली. दादा त्या दिवशी सुद्धा फुल खुश होता. जाम मजा केली आम्ही.. नंतर तशी त्याची भेट दुर्मिळच झाली.

Monday, April 12, 2010

दादा- भाग १

कॉलेजमध्ये एडमिशन घेतलं. एखादा महिना गेला. व्यवस्थित लेक्चर्स चालू होते. आता एका आठवड्यात प्रक्टीकॅल चालू होणार होते. पहिल्या सेमिस्टरमध्ये ईडी हा विषय होता (इंजिनियरिंग ड्रौविंग). मग ड्राफ्टर पाहिजे होता. मी होतो संगणक विभागाचा (कम्प्युटर सायन्स एंड इंजिनियरिंग), मला फक्त एका सेमिस्टर साठीच ड्राफ्टर लागतो. नवीन कशाला घ्यायचा म्हणून मी एखाद्या सेनिअरला शोधात होतो. एक असाच सेनिअर भेटला. तसा मी त्याला चांगला ओळखत होतो. त्याला ड्राफ्टरसाठी विचारल. त्याने आधीच कुणालातरी विकला होता. त्याने मला त्याच्या एका सेनिअर कडे फोरवर्ड केलं.

ह्या पोस्टचा कर्ता तोच आहे. नाव सांगणार नाही. पण मी त्याला प्रथमदर्शनी दादा म्हणालो (अर्थात, वयाचा मान राखणे हे माझे कर्तव्य होते). ह्या दादाचे वैशिष्ट्य म्हणजे हा खूप प्रोफेशनल रित्या वागतो. त्याचे हुबेहूब वर्णन करावे म्हणतो--

१. कधीही जीन्स किंवा टी-शर्ट घालणार नाही.
२. फॉर्मल कपडे तेही व्यवस्थित इस्त्री करून.
३. शर्टच्या खिशाला नेहमी पेन असावीच लागते. अगदी झोपताना सुद्धा .
४. स्पोर्ट शू (खेळात घालावी लागतात ते बूट) ह्याने कधी वापरले नसावेत. क्रिकेट खेळायला सुद्धा हा फॉर्मल बूट वापरायचा.
५. शरीराने दुबळा. पण मनाने फार बलवान.

अजून काही गोष्टींचे वर्णन करता येईल, पण ते योग्य वेळी करीन.
तर असा हा दादा. मी आपल्या सवयीप्रमाणे रूममध्ये चप्पल घेऊन गेलो. लगेच हा खेकसला- "बी प्रोफेशनल!". मी पळत बाहेर गेलो आणि चप्पल बाहेर सोडून आलो. दादा तसा स्वभावाने लई भारी. पण सगळ्या गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे झाल्या तरच! नाहीतर आकांडतांडव करील..

दादाकडून ड्राफ्टर घेतलं, तेव्हापासून दादा मला थोडा चांगला बोलायला लागला. आणि हो! मी सेकंड सेमिस्टर मध्ये असताना ह्याने स्वतःहून मला ह्याच्या इंजिनियरिंग मेकानिक्सच्या नोट्स दिल्या! तसे दादाने खूप कष्ट सोसलेले होते. इंजिनियरिंग अवघ्या ६ वर्षात काढली. मास्तरांनी सुद्धा बरेच अन्याय केले त्याच्यावर (शारीरिक नाही!).

फर्स्ट इअर संपलं. नंतर दादा मला १-२ वर्ष दिसलाच नाही. माझ थर्ड इअर संपलं आणि फाईनल इअर सुरु झालं. अचानक दादा मला माझ्या क्लास मध्ये दिसला. मला बराच आनंद झाला, २-४ पोट्यांना घेऊन दादाकडे गेलो. विचारपूस केली, समजल कि दादा आमच्यासोबत शिकणार आहे!

नंतर दादासोबत बऱ्याच घटना घडल्या. अगदी गमतीशीर.. लगेच नंतरच्या पोस्ट मध्ये सांगीन..


-पी. के.

Friday, March 26, 2010

अपघात

अपघात हा विषय तसा मला काही नवीन नाही. कारण बहुधा तुम्हा सर्वांना माहित असावं. तेच हो! माझी गाडी (राम्प्यारी). ही गाडी मला तशी अतिप्रिय आहे. अगदी पोरीपेक्षा जास्ती प्रिय. मग काय! सविस्तर सांगाव म्हणतो...

मी इकडे पुण्याला आलो तेव्हा दोन पायावरती आलो. म्हणजे चालत नव्हे. बसने आलो, काही दिवस ऑफिसला बसने ये-जा केल. त्यावेळेस होता पावसाळा. लोकांना काय हो, तुम्ही कितीही स्वच्छ कपडे घालून आलात तरी ते तुमच्या कपड्याला मळकट करणारच. ऑफिसला जाई पर्यंत माझे कपडे चिखलाने माखून निघायचे. संतापीपणा तर वडिलोपार्जित! मी चिडायचो आणि २ शिव्या ठेवून द्यायचो. एकेदिवशी हाणामारीपर्यंत वेळ गेली होती. पण ऑफिसला जायच होतं म्हणून टाळली.

मग संताप आवरेना. गावी गेलो आणि एक जुनी गाडी विकत घ्यावी म्हणून शोधाशोध चालू केली. हिरो होंडा ची स्प्लेंडर घ्यायची होती. पण लोक अवाजवी किंमत सांगत होते. अचानक एक मित्र आला आणि त्याने सांगितलं कि त्याची पल्सर विकायची आहे. मग काय, घेतली कि हो! पण ती मला थोडी साडेसाती सारखी लागली. अगोदर खूप खर्च काढायची. आता ठीक आहे. पण मला खूप ठिकाणी अपघात झाले.

पहिला अपघात- गाडीचे ब्रेक कसे आहेत याचा अंदाज नव्हता. गाडी जोरात पळवली आणि ब्रेक मारून पाहतोय तर काय.. समोर एका दुकानाची पाटी होती. तिला जाऊन धडकलो. दुकानदार समंजस होता. त्याने माझ्याकडून पैसे न घेता जाऊ दिले.

दुसरा- गाडी आता पुण्यात आली होती. एक्सलंरेटर ची वायर थोडी जाम होती. जरी रेस कमी केली तरी गाडी पळायची. नळस्टोपच्या चौकात सिग्नल लागला. गाडी फर्स्ट गियर मध्ये होती. मला वाटले क्लच सोडल्यावर गाडी बंद पडेल. मी सोडला. गाडीने लगेच जंप मारून समोरच्या स्कुटीला मिठी मारली. त्या पोरीने शिवी दिली !@#$$%^^. असो.

तिसरा- ऑफिसमध्ये थोड डोक खराब झालं होत. संताप्लेलो होतो. सुसाट वेगाने जात होतो. मन थोड शांत करण्यासाठी कमिन्स कॉलेजचा रस्ता धरला. १-२ लई भारी पोरी दिसल्या. समोरून खाडकन आवाज आला. बघतो तर काय, एक दुचाकीस्वार रस्त्यात थांबला होता. त्याच्या समोर विरुद्ध दिशेने एक काका होते (नशीब मामा नव्हते). माझी गाडी त्याच्या गाडीला धडकली. त्याची गाडी उसळून काकांच्या गाडीला चीपकली. दोघांच्या गाड्या कमी वजनाच्या होत्या. भरपूर नुकसान झाले. मला वाटत होते माझी चूक आहे. पण एक भाजीवाला मध्ये पडला. त्याने समोरच्या पोराचे कान भरायला चालू केले. त्याला म्हणाला, बाळा रस्त्यात थांबला कि असेच होणार! ह्या माणसाला दोष देऊन काही उपयोग नाही. चूक तुझी आहे! मी म्हणालो व्वा! चांगल्या ४००-५०० च्या भूर्दन्डातून सुटका झाली.

अजून काही आहेत. नंतर कॉमेंट्स मध्ये लिहितो.

आपला,
पी.के.

Sunday, March 21, 2010

मी पाहिलेला बहिरी ससाणा

मी आजवर खुप पक्षी पाहिलेत. पण बहिरी ससाणा काही पाहिला नाही. मग मी काय पागल झालोय? नाही. तसं नाहीये. कारण मी पाहिलेला बहिरी ससाणा हा काही पक्षी नसून माणूस आहे! काय? हो खरच!
इसमाचे नाव- सांगणे निषिद्ध.

त्याच झालं काय, की ह्याला कॉलेज मध्ये असताना कानाचा विकार झाला. मग हा चांगल्या १० दिवस सुट्ट्या मारून घरी बसला. नंतर आला कॉलेज मध्ये. काही दिवसांनी आमच्या असं लक्षात आलं, की ह्याला थोड कमी ऐकू येतंय. मग काय! नावं पडली की हो- बहिर्जी, बहिरटवाडी, भैरोसिंग, बहिरी ससाणा, इ.

मला त्यापैकी बहिरी ससाणा हे नावं फारच आवडतं. कारण मला पक्षांची जरा जास्तच आवड आहे. तर हा बहिरी ससाणा अंगापिंडाने जरा फुग्लेलाच आहे. नाही म्हटलं तरी वजन ८०-८५ च्या घरात असेल. सवयी तर लै भारी ह्या ससाण्याच्या!

जेवताना पहिला भात, मधला भात, आणि शेवटचा भात खाल्ल्याबिगर ह्याला जेवण झाल्यासारखं वाटत नाही. जेवण झाल्यावर बडीशेप, किंवा लवंग किंवा विलायची हवीच. मग थोडा वेळ नगाऱ्यावरून हाथ फिरवत चालायचं.
चालायची स्टाईल तर अजब. हा ससाणा चालायला लागला की बाजूच्या २ लोकांना चालता येत नाही. हाथ एवढे हलतात ह्याचे (बहुतेक पंख नाहीत म्हणून हाथ हलवत असावा). रस्त्यावरून चालत असला की वाहनचालकांची फार दमछाक होते! ऐकू कुठे येतं महाशयांना!
फोन आला की ऐकू यायचं नाही. मग काय, आम्हाला त्याला सांगाव लागायचं. अरे बाबा फोन आलाय. उचल.
आता एवढ सगळ सांगितल्यावर साहजिकच आहे. हा उडेल कसा? मी तरी आत्तापर्यंत एवढ्या वजनाचा पक्षी नाही पहिला.

परवाचीच गम्मत सांगतो. हा ससाणा जरा आजारी पडला होता. मग दुसऱ्या दिवशी मी फोन वरून नेट लावल. हा नेट वरती बसला होता. एका मित्राचा फोन आला. त्याने विचारल की काय करतोयस, हा म्हणाला नेट वरती बसलोय. मग तो मित्र म्हणाला, तब्येत कशी आहे? तर आमचा ससाणा म्हणाला, काही नाही भारी स्पीड आहे :)

अजून एक अशीच गम्मत. आमच्या कॉलेज च्या बाजूला विमानतळ आहे. तर एके दिवशी आमच्या कॉलेज मध्ये ड्रीलिंगचे काम चालू होते. मग वर्गात बसल्यावर थोडा गर्र्रर्र आवाज येत होता. आम्ही सहज ससाण्याकडे नजर टाकली. तर हा डोकं हलवत होता. बहुतेक सिग्नल कॅच करायचा प्रयत्न करत होता. मग आम्ही त्याला विचारल, काय झालं रे तुला? तर म्हणाला बाजूने बहुतेक विमान जातंय, त्याचा आवाज ऐकतोय :) खूप हसलो आम्ही त्या दिवशी.


अजून अशाच भारी घटना आहेत. पण सांगत बसलो तर हा ससाणा मला भेटल्यावर बदडून काढेल. तुमच्याकडे काही घटना असतील तर कॉमेंट मध्ये लिहा!

आपला,
पी.के.

Thursday, March 18, 2010

फिरकी

अतिपरिचयात अवज्ञा ही पंक्ती सदा आणि शंभू यांना मान्यच नव्हती. त्यांचं म्हणणं असं, की जे मित्र आमच्यासारखी मैत्री करतात, त्यांच्यात भांडण किंवा अपमान कसा होऊ शकतो. कारण ते इतके जवळचे मित्र होते की कधी त्यांच्यावर भांडण करण्याची वेळ येईल अस त्यांना कधीच वाटत नव्हतं.

लहानपणापासून शाळेत गेलेले मित्र, आता कॉलेज मध्ये जाऊ लागले. इंजिनीअरिंगला ही सोबत अडमिशन घेतल. कॉलेज दुसऱ्या शहरात असल्यामुळे हे तिकडे गेले. आणि एकाच रूममध्ये राहू लागले. दोघांचाही स्वभाव मनमोकळा असल्यामुळे त्यांनी भरपूर मित्र कमावले. एकत्र कॉलेज ला जायचे, यायचे.. कॅन्टीन मध्ये एकत्र बसून खायचे. परीक्षा चालू झाल्या, की हे सगळे मित्र एकत्र बसून अभ्यास करायचे. रात्र रात्र बसून सबमिशन पूर्ण करायचे. सगळ अगदी टीपीकल इंजिनीअरिंगच्या पोरांसारख चालू लागल.

पहिलं वर्ष जसं गेलं, तसेच बाकीचे तीन वर्ष उलटले. इकडेसुद्धा एकही दिवस असं गेला नाही की त्या दिवशी ह्या दोघांचं भांडण झाल. शेवटच्या वर्षी दोघांनी कॅम्पस इंटरव्यू दिला. दोघेही मोठ्या कंपन्यात सेलेक्ट झाले. फ़ाईनल एग्झाम झाल्या आणि लगेच महिन्याभरात ह्या दोघांची जोइनिन्ग आली. आणि गम्मत अशी, एकाच शहरात!

परत हे दोघे रूम पार्टनर म्हणून राहायला लागले. या वेळेला सोबत कॉलेज चे मित्र नव्हते. होते ते त्यांच्या ऑफिस मध्ये झालेले मित्र. सदा लहानपणापासून थोडा मजाकू वृत्तीचा होता. तो नेहमी काहीतरी करून मित्रांची फिरकी घ्यायचा. पण आता शंभूला ते आवडेना. शंभू कधी चिडचिड करायचा. पण ते सदाला कधी कळाल नाही.

एके दिवशी सदाच्या मनात आलं, की आपण शंभूची फिरकी घ्यावी. असे म्हणून तो शम्भूच्या जवळ गेला. आणि उगा बाचाबाची करावी म्हणून काही तरी सुरुवात केली. शंभू सुरुवातीलाच चिडला. पण सदाच्या ते लक्षात नाही आलं. सदाने कंटीन्यू केलं. आणि काही कळायच्या आत शम्भूने सदाच्या कानाखाली वाजवली.
सदा थोडा स्तब्धच राहिला. डोळ्यातून पाणी आलं. आणि आज त्याला अतिपरिचयात अवज्ञा हा पंक्ती ची प्रचीती आली. ह्यात शंभूची चूक होती अस म्हणता येणार नाही, कारण ती मानवी वृत्तीच आहे. त्याला शंभू कसा अपवाद ठरेल?

आता शंभू आणि सदा एका रूम मध्ये सोडा, एका देशात नाहीयेत. सदा कुठे तरी कॅनडाला राहतो तर शंभू इकडे बंगलोरला. आणि ते दोघे सहसा एकमेकांना बोलत सुद्धा नाहीत. पण सदाला आजही वाटत, की त्याने शंभूची फिरकी घ्यायला नको होती. आणि शंभू आजही त्या भांडणासाठी सदाला दोष देतो.

आपला,
पी.के.

Sunday, March 14, 2010

टोपण नाव

बहुधा सर्वांनाच लहानपणी टोपण नाव असते. मलाही टोपण नाव होते. तुम्हालाही असेल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट्स मध्ये तुमचे टोपण नाव देऊ शकता. तुमची मर्जी.
हा, तर सांगायचा मुद्दा आहे टोपण नाव. गेल्या काही दिवसात मी बर्याच जणांना टोपण नाव दिलेले आहे. जरी त्यांच्या आईबापांनी दिले असेल तरी मी अजून एक टोपण नाव असावे म्हणून ठेवून दिलेले आहे. काही मित्रांना दिलेली टोपण नावे खाली दिली आहेत:

१. बगळ्या: बापरे! ह्या नावाने तर मी कित्येक लोकांना हाक मारतो. पण त्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण असते. उदाहरणासहीत स्पष्ट करतो न मी! एक मित्र आहे त्याला मी बगळ्या म्हणतो-- त्याचा कारण म्हणजे तो अगदी उंच आहे.. आणि मेन गोष्ट म्हणजे तो बहुधा एका पायावरती उभा राहतो. आणि दुसऱ्या पायाची घडी करतो. एके दिवशी असंच मी लक्ष दिलं आणि त्याला बगळ्या नाव देऊन टाकलं. अजून एक मित्र आहे, त्यालाही हेच नाव दिल आहे-- त्याचा कारण असं कि तो अति पांढरा होता (म्हणजे गोरा). म्हणून त्याला बगळा नाव देऊन टाकलं.

२. बिबळ्या: माझा एक कलीग आहे. एके दिवशी तो थोडासा पिवळसर शर्ट घालून आला (म्हणजे परिधान करून आला. गैरसमज होऊ नये म्हणून अगोदरच स्पष्ट केलेलं बरं). त्या शर्ट वरती थोडे काळे काळे ठिपके होते. तो थोडा बिबळ्या सारखा दिसला.. म्हणून बिबळ्या नाव पडल त्याच.

३. टीवटीवी: माझा कॉलेज मधला एक मित्र आहे. तसा तो माझा रूममेट सुद्धा आहे. त्याला बडबड करायची फार सवय आहे.. म्हणून त्याच नाव टीवटीवी पडल.

४. सायबेरीयन करकोचा: एक मित्र आहे तोसुद्धा उंच आहे. पण अगोदर एक बगळा झाला असल्यामूळे त्याला सायबेरीयन करकोचा बनवावा लागला.

५. कुबड्या खवीस: एक माणसाला मी रोज येता जाता पाहत असतो. तो थोडा कुबड काढून चालत असतो. म्हणून त्याच नाव कुबड्या खवीस.

६. कवट्या महाकाळ: एक इसम आहे, तो कवटी दाखवत फिरतो. आणि वागण्याने सुद्धा थोडा धसमुसळा आहे. म्हणून त्याला कवट्या महाकाळ बनाव लागल.


आता एवढ सगळ झाल्यावर लोक मला कसे सोडतील ना! त्यांनीही मला एक नाव ठेवून दिल-- "आन्ना". ह्या मागचं शास्त्रीय कारण अस की मला इडली सांबार आणि वडा सांबार आवडतात. आणि मी बरेचदा तेच खात असतो. म्हणून त्यांनी साउथ इंडिअन म्हणून मला आन्ना नाव देऊन टाकल.

असो, तुमच्याकडे काही टोपण नावे असतील तर तीही इकडे पोस्ट करा. म्हणजे कॉमेंट्स मध्ये द्या.

आभारी,
पी.के.

Tuesday, March 9, 2010

सुरुवात करावी..

नमस्कार मित्रांनो..

माझा पहिला ब्लोग लिहित आहे..
खर पाहिलं तर मी बरेच ब्लोग्स वाचेलेले आहेत.. त्यामुळेच मला "इन्स्पिरेशन" मिळाले आहे :)

बघुयात किती सक्सेसफुल होतो ते..

आपला प्रसाद (पी.के.)

Friday, March 5, 2010

इदर--उदर फंडा

मी माझ्या लहानपणापासून मराठवाड्यात राहिलेलो आहे. नोकरीनिमित्त इकडे आलो. इकडे म्हणजे पुण्याला. सांगायची गोष्ट म्हणजे, मी लहानपणापासून "इधर" ला "इधर" म्हणायचो आणि "उधर"ला "उधर" म्हणायचो.

पण हल्ली गोष्ट थोडी वेगळी झाली आहे. म्हणजे इकडे आल्यापासून इधर ला "इदर" आणि उधर ला "उदर" म्हणायची सवय झाली आहे. इतकी, कि मी माझ्या घरी किंवा मित्रांसोबत असताना सुद्धा इदर आणि उदर म्हणत असतो :)

ही सवय कशी लागली ते नका विचारू. कारण मी त्याचे कारण जर सांगत सुटलो तर भाषावाद आंनी प्रांतवाद उफाळून येईल. आणि मला ते नकोय.
इदर उदर वरून आठवले.. काही दिवसांपूर्वी मी ओर्कुट वरती फोटो अपलोड केले. त्या फोटो चे टाइटल सुद्धा इदर--उदर दिले आहे :) आणखी एक गोष्ट. माझा एक कलीग होता, त्याला बसल्या जागी इदर उदर इदर उदर असा जप करायची सवय होती ही सांगायची मुख्य गोष्ट. बहुतेक त्याच्यामुळेच मला इदर उदर म्हणायची सवय लागलीये.

असो, पण कधीकधी इधर ला "इदर" आणि उधरला "उदर" म्हणून पहा.. तुम्हालाही मजा येईल..


-पी.के.