Tuesday, March 5, 2013

डक्क्या

आमच्या टोळीतला सगळ्यात शांत आणि सुस्त प्राणी. खास बात म्हणजे शुद्ध मराठीत 'डावखुरा' माणूस, पण मराठवाडी भाषेत डक्क्या (डकन्या)! संपूर्ण नाव-- शशांक शेषराव पचलिंग. 

भैरोसिंगच्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे डक्क्या आणि माझी भेट सेकंड इअरच्या क्लास मध्ये झाली. डकन्याचं घर आणि माझं घर तसं जवळ-जवळच. कधी कधी डक्क्या बाइक घेऊन आला, की आम्ही दोघं सोबत घरी जाव!

घरी जाण्यावरून एक गोष्ट आठवली, गाडी विसरणे ही त्याच्या घरी सगळ्यांची सवय होती. कित्येक वेळेस माझ्या सोबत हनुमानगड पर्यंत पायी यायचा आणि मग त्याच्या लक्षात यायचं की आज कॉलेजमध्ये बाइक आणलीय! एकदा तर ट्युशनच्या समोर गाडी विसरली, ती दुसऱ्या दिवशी सकाळीच आणली!!

अनुवांशिक कंटाळ्यामुळे ह्याला "C प्रोग्राम्स" करणे जड जायचे. आणि त्यावेळी माझ्याकडे कॉम्प्युटर नसल्यामुळे मी याच्या घरी जाउन बसाव, आणि दोघं मिळून प्रोग्राम्स बनवाव. असं करत करत आमची दोस्ती वाढली. हाच कंटाळा इलेक्ट्रोनिक्स च्या practicals मध्ये पण दिसून यायचा आणि तिथं सुद्धा डक्क्या माझ्या सोबतच राहायचा म्हणजे ब्रेडबोर्ड ला हात लावायची गरज पडू नये :)

कुठं काय बोलाव, याची डक्क्याला बिलकुल अक्कल नव्हती. एके दिवशी मास्तरने भैरोसिंग आणि बिल्डरला फैलावर घेतलं आणि विचारत होता की कोण कोणाच्या फाईल्स कॉपी मारतो. दोघांनी तोंडावर शिलाई मारली होती, म्हणून मास्तरने डक्क्याला पाचारण केलं. डकन्या काय बोम्बलला असेल? "सर, मला काही माहित नाही, मी प्रसादची फाईल कॉपी मारतो". घ्या. आमचीच लागली, ते पण विनाकारण!

डक्क्या तसा कमीच बोलतो, पण त्याला बोलतं कराव लागतं. एकदा बोलता झाला, की मग काही नाही! आमच्या केटेगरीमध्ये मिक्स होऊन गेला. अधून मधून एखाद्याची घ्यायला त्याला लई आवडावं. असंच एकदा गज्या सुट्ट्यात घरी गेला होता आणि प्रोजेक्ट टायटल सबमिट करायचं होतं, त्यावेळी त्याने गज्याची फुल घेतली. झालं काय, की गज्याला फोन केला डक्क्याने आणि गजा गाऱ्हाणे करू लागला माझे. आणि डक्क्या सगळा तमाशा मजा घेत पाहू लागला.

हं, अजून एक गोष्ट. डक्क्याच्या घरच्यांनाही माहित पडलं होतं की कॉलेजमध्ये ह्याला 'शशांक' ऐवजी 'डक्क्या' म्हणून बोलावतात. आणि ह्याच्या वडलांचा आणि ह्याचा आवाज एकदम सेम. त्यावेळी डक्क्या कडे मोबाइल नव्हता आणि घरच्या फोनवर कॉल लावाव लागायचा. ह्याच्या वडलांनी जरी फोन उचलला तरी डक्क्याच वाटायचा.
आम्ही पोट्टे--"हेलो डकन्या?"
डक्क्याचे वडील -- "अरे छोटू? तुझा फोन आलाय!"

हां, तर प्रोजेक्ट वरून आठवलं….  डक्क्या आणि रंग्याचं घर जवळ जवळ होतं. एके दिवशी 'रियाज' करायला भारग्या रंग्याकडे गेला, जाता जाता डक्क्याला पण सोबती म्हणून घेतलं. त्या दिवशी डक्क्याने रंग्याचा प्रोजेक्ट पाहिला आणि फुल पागल झाला. अबे प्रसाद्या, आपण सेम प्रोजेक्ट करुत, फक्त युआय चेंज करुत म्हणजे जास्त काम लागणार नाही. त्याला अंदाज सांगितला की तू जे म्हणतोय ते तेवढं सोप्प नाही, नुसता युआय जरी चेंज करायचा म्हनला तरी पूर्ण प्रोजेक्टची कोडींग चेंज होते. त्यातल्या त्यात आपल्याला डेटाबेससुद्धा चेंज करायचाय… पण आळशीपणापुढे माझं काहीही चाललं नाही, आणि सेम प्रोजेक्ट करावा लागला, उलट सगळी कोडींग नव्याने करावी लागली!!

कॉलेज संपल्यावर (डिग्री मिळाल्यावर) डक्क्या आमच्या सोबत राहू नये, त्याच्या भावाचं स्वतःचं घर होतं इकडे. आमच्या रूम आणि डक्क्याच्या घरातलं अंतर फार फार तर १० किमी असेल, पण तरीही डक्क्या काही भेटायला येऊ नये. एकवेळ प्रार्थना केली तर देव अवतरेल, पण डक्क्या कधीच यायचा नाही… एवढा कमालीचा आळस!!

आमच्या कार्यकर्त्यांनी खूप स्ट्रगल केलं, सेम तेवढंच डक्क्याने केलं आणि मग नोकरी मिळाली. आता आम्ही रूम चेंज करून डक्क्याच्या शेजारीच राहायला गेलो. एव्हाना डकन्याचा भाऊ ऑनसाईट गेला, आणि डकण्याच्या हाती कार लागली. मग काय! महाबळेश्वर, वाई, दिवेआगर, लोणावळा, मुंबई अश्या ट्रिप्स नेहमीच व्हायला लागल्या. भैऱ्याच्या भाषेत 'डक्क्या आपल्या नादी लागून बरबाद झालंय ;)'

एवढी मर मर करून आत्ता कुठं डकनं बोलतं झालंय! उदाहरण म्हणजे मी आणि डक्क्या कधी फिरू लागलो आणि एखादी पोट्टी समोरून गेली तर ते स्वतःहून तारीफ करायला लागलंय ;)

त्याची खासियत म्हणजे डिस्ट्रीक्ट लेवलचा क्रिकेट प्लेयर होतं ते. नांदेड-पुणे, नांदेड-औरंगाबाद असं खेळून आलय. पण काय माहित, आम्हाला कधी त्याचा गेम दिसलाच नाही. कधी पण कॉलेज मध्ये मेच असली की साला हरूनच यायचा. त्याला याच्या वरून कित्येकदा चिडवतो आम्ही… मुद्दाम 'अंडर-आर्म' बॉलिंग करून त्याला आउट करायचं आणि मग चिडवायचं :)

डक्क्या म्हणजे दुनियेचा किरकिरी माणूस! कित्येक दिवसांपासून गोवा जायचं आमच्या मनात आहे, पण हा काही आम्हाला नेत नाही. एवढ्या लांब कोणी कार चालवावी? मला बोर होतंय!
बर, आम्हाला शिकव, आम्ही अधून मधून चालवतो … नाही! मी भावाला सुद्धा कार चालवायला देत नाही!
मग जायचं कसं?

गाणे ऐकायचेत? तर फक्त वोकल सॉंग पाहिजेत! जास्त म्युजिक नको!!
कार चालवताना लोक सहसा दणादण गाणे वाजवत चालवतात… कोणाला आवडतात म्हणून, आणि कुणी झोप येऊ नये म्हणून… पण याला मंद गाणे आवडतात… इकडे लोकांचा जीव जातो, कुठे ह्याला झोप लागली, तर विनाकारण जीव जायचा!

मागे एकदा दिवेआगरला जाताना स्टीअरिंग वरून दोन्ही हात सोडून डोक्यामागे नेऊ लागला. शेवटी राजाला राहवलं नाही, आणि ते म्हणलं -"डक्क्या काही काम असाल तर सांग, स्टीअरिंग वरून हात सोडू नको! मला इकडे मागे काहीही काम नाही, जे म्हणशील ते करतो ;)"





अजूनसुद्धा डक्क्या वीकेंडशिवाय भेटत नाही. घर जवळ असून सुद्धा त्याला सोफ्यावरून उठाव वाटत नाही. ऑफिसवरून आला, की जे सोफ्यावर बसून टीवी चालू करतो, ते रात्री ११ -११:३०  पर्यंत! मध्ये फक्त जेवणाचा व्यत्यय येतो, ते पण सोफ्यावरच उरकून घेतलं जातं!

बरं, वरचा फोटो पाचगणी जवळ काढलाय. तसं डकन्याला फोटो काढून घ्यायची हौस नाही (जशी भैरोसिंघांना आहे), पण अधून मधून मिरर मध्ये स्वतःचे केस पाहतो, आणि डाव्या हाताने "आउ आउ" म्हणत नीट करतो, आणि पळत जाउन एखाद्या स्पॉटवर बसतो. "प्रसाद्या, एक फोटो काढ बे!". आणि लगेच क्लिक!

 तर असा हा कार्यकर्ता…

-पी. के. 

3 comments:

Aditya Patil said...

सुंदर! वेळ काढून सर्व कार्यकर्त्यांची व्यक्तिरेखा चित्रण वाचण्याची इच्छा निर्माण झाली! मुंबईबाहेरील लोकांचा बिनधास्तपणा मस्तपैकी शब्दात पकडला राव!

Unknown said...

आदित्य,
मुंबई काय आणि बाकी महाराष्ट्र काय… मराठी माणूस बिनधास्तच असतो :)
फक्त बारकाईने पाहिलं की प्रत्येकाचा बिनधास्तपणा ओळखू आलाच समजा :)

तुम्हाला पोस्ट आवडली हे वाचून आनंद झाला!
धन्यवाद!
-प्रसाद

राजू वैराळ said...

Nice one.
PK