Friday, March 8, 2013

बारकं

रेल्वे स्टेशन आणि रेल्वे जंक्शन मधला फरक माहिती आहे? सेम तसंच बारकं म्हणजे आमच्या ग्रुपचं जंक्शन आहे. नाव- संदीप पोकलवार. 

मागच्या पोस्टमध्ये सांगितल्या प्रमाणे डक्क्या आणि माझी भेट सेकंड इअर मध्ये झाली, आणि त्याबरोबर बारक्याची पण ओळख झाली. डक्क्या आणि बारक्या शाळेच्या पहिली पासूनचे दोस्त. फक्त ११वी आणि १२वी वेगळ्या कॉलेजमध्ये शिकले, आणि परत इंजिनियरिंगला एकत्र आले!

साहजिकच माझी आणि बारक्याची ओळख झाली, पण सेकंड इअरला ओळख मर्यादितच होती. याचं कारण म्हणजे बारक्याचा ग्रुप. त्यावेळी बारक्या अजीब कार्यकर्त्यांसोबत राहायचा, त्यांना असाइनमेंट, प्रोग्राम्स शेअर करणे म्हणजे संपत्ती शेअर करण्यासारखं वाटाव, इगो पण हर्ट व्हाव त्यांचा. 

थर्ड इअरला इलेक्टीव चूज करायचा होता, तेव्हा माझ्यासोबत मोजकेच पोट्टे होते आणि बारक्या त्यातला एक. डी. आय. पी. विषयाला मी, बारक्या, निख्या आणि श्रीकांत्याच! बाकी ५० लोक दुसऱ्या सब्जेक्टला! क्लासमधला धिंगाणा वाढला आणि बारक्या आमच्या ग्रुपमध्ये शामिल झाला. आता प्रोग्राम्स, असाइनमेंट आमच्या सोबत होऊ लागल्या. तरी अधून मधून त्याची वारी असायचीच जुन्या ग्रुप सोबत, आणि जुने कार्यकर्ते काड्या करायचेच. 

असो, बारक्या राहायचा भाग्यनगरला आणि जंक्शन झाल्यामुळे आम्ही सगळे रोज तिथल्या गणपती मंदिरात जमा व्हायचो. कॉलेज सुटायचं ५-६ वाजता, आणि घरी जाउन थोडी पोटपूजा झाली, की भाग्यनगर गाठून बारक्याच्या दुकानासमोर उभं राहायचं. आम्ही गोळा झालेले पाहून बारक्या काम आटोपायचा, आणि जमावात शिरायचा. तिथून एकेकाला फोन लावणे चालू. श्रीकांत्या, अज्या, भैर, चौधरी, गज्या, पर्तान्या सगळे यायचे. गणपतीचे दर्शन घेतले, की आज काय घडलं, काय लफडे झाले चर्चा चालू व्हायची. 

बारकं तसं लई नंबरी होतं. प्रत्येक पोराला त्याने एका पोरीचं नाव चिकटवलं, आणि रोज चिडवायचं. स्वतः मात्र सेफ साईड होतं. पण आम्हीही काही कमी नव्हतो, आम्ही पण नंबर १ नाव शोधून काढलं आणि बारक्याला जोडलं ;) जेव्हा त्याने आम्हाला चिडवायला चालू केलं तेव्हा आम्ही पण चालू व्हायचो. 

बारक्या क्लासमध्ये सहसा आमच्याच बाजूला बसायचा. ते बाजूला बसलंय म्हणल्यावर क्लासमध्ये काड्या चालू झाल्याच म्हणून समजा! मग बेंचवर बसलेल्या एखाद्याला हसू आवरलं नाही, की झालं! क्लासमधून हकालपट्टी झाली की बारकं नंतर येउन भेटायचं आणि परत चिडवणं चालू :)

फायनल इअरला बारक्याची आणि माझी दोस्ती चांगलीच वाढली. बारक्याला डी. आय. पी. चाच प्रोजेक्ट करायचा होता, म्हणून ते श्रीकांत्यासोबत जॉईन झालं, पण तरीही कोडींग साठी आम्ही सोबतच बसाव! त्यावेळी निख्या आणि श्रीकांत्याची हाणामारी आम्ही दोघांनी लई एन्जॉय केली :) 

होळीच्या दिवशी बारकं सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन माझ्या घरी आलं. नांदेडच्या पोरांची होळी म्हणजे कपडे फाडलेच पाहिजेत! घरातून बाहेर पडताच बारक्याने आणि आत्याने माझे कपडे फाडले आणि तोंडाला रंग फासला. तिथून आगेकूच करत आम्ही डक्क्याच्या घरापुढे गेलो, पण आमचा अवतार पाहून डक्क्या घराबाहेर आला नाही. आमचा ताफा जसा तरोडा नाक्या पर्यंत पोचला, तसं आम्हाला पोलिसांनी हटकलं, आणि गाड्या ताब्यात घेतल्या. गज्या, आत्या आणि बाकी पोट्टे पोलिसांना हुज्जत घालत होते, आणि एव्हाना तिथले चिल्लेपिल्ले येउन गोंधळ घालत होते. पोलिसवाला चिडला, आणि आम्ही थोडं दूरच जाव म्हणून पळालो. पण बारक्याला काय वाटलं कुणास ठाऊक, ते तिथंच थांबलं. पोलिसाचा पारा चढला आणि पळता पळता फाडकण आवाज आला. काय झालं म्हणून आम्ही मागे पाहतोय तर बारक्या गालावर हात ठेऊन पळत येताना दिसलं :) काय झालं ते विचारायची गरज नव्हतीच :)

पर्तान्या आणि बारक्या बरेच जिगरी दोस्त. पर्तान्या नेहमी ट्रेनने सेलू-नांदेड येरझाऱ्या घालायचा, आणि नेहमी फुशारक्या मारायचा की ट्रेनचे सगळे टी. सी. त्याच्या ओळखीचे आहेत. एकदा असंच बारक्याला इंटरव्यू निमित्ताने औरंगाबादला जायला लागलं, म्हणून त्याने सेलूच्या सेहवाग (परतान्या) सोबत जायचं ठरवलं. जनरल डब्यात गर्दी होती, म्हणून परतान्या त्याला रिजर्वेशनच्या डब्यात घेऊन गेलं आणि म्हणे तू काळजी करू नको बारक्या! मी आहे न!

बारक्याला वाटलं आता टी. सी. आल्यावर परतान्या काहीतरी जुगाड करेल, आणि आपल्याला बसायला मिळेल. कशाचं काय, रात्र भर परतान्याने त्याला ह्या डब्यातून त्या डब्यात करायला लावलं! मग काय! २ दिवसांनी पर्ताण्याच्या उद्धारच केला बारक्याने :)

कॉलेज लाईफ संपली, आणि पुण्यात जेव्हा आलो तेव्हा बाकी पोरांची आणि माझी ओळख जास्त नव्हती. मला रूम भेटली ती बारक्या मुळेच. मी, बारक्या, निख्या, श्रीकांत्या, ओम्या, आत्या, अवधूत रूम पार्टनर बनलो. 

त्याने मला बरेचदा चुना लावला. माझ्यासोबत गाडीवर बसायचा आणि एखादा सिग्नल आला, की म्हणायचा-- "चल बे, इथं पोलिस नसते, काढ गाडी"… आणि गाडी काढली, आणि पोलिसाने पकडलं की साईडला जाउन दात काढायचं… 

रूमवर सगळ्यांशी त्याची जमायची… खासकरून ओम्या आणि आत्यासोबत. एकदा असंच आत्याला काहीतरी हुक्की उठली आणि घरीच जेवायला बनवावं म्हणून बसला. आत्याच्या प्लान म्हणजे 'कशात काय आणि फाटक्यात पाय'! तेवढ्यात बारकं हात हलवत आलं आणि बोम्बललं -- "आपण तर फक्त वेजच खाणार"… आत्या आणि ओम्या लोळू लोळू हस्ले… आजही आत्याचा फोन आला तर एकदा तरी आठवण करून देतेच ते… 

मागे सांगितल्याप्रमाणे एका वर्षानंतर भैरोसिंग आमच्या रूमवर पाचारण झाले, त्यानंतर बारक्या आणि भैरोसिंगाच्या हसण्याला उधाणच आलं. रूमवर एखादी घटना घडली, की दोघे एकमेकांकडे पहाव आणि खीखीखी कराव. 

वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि दिवेआगर ट्रीप बारक्यामुळेच पॉसीबल झाली.  बारकं होतं म्हणून ती ट्रीप एन्जॉय झाली, नाहीतर डक्क्या कुठं सोफा सोडून आलं असतं?



आता बारकं गेलंय परदेशी! कधी येतंय काय माहित!

-पी. के. 

No comments: