Monday, March 18, 2013

चौधरी

सारी दुनिया देख दंग, ताकत और अकल की जंग… 
देसी रंग और देसी राग, कम्प्युटर से तेज दिमाग… 
अकल की खेती हरी भरी, बात सुनाउ खरी खरी… 
चाचा चौधरी 

(वरच्या चार ओळी निखिल जोशी कडून साभार)

हर्षद चौधरी म्हणजे माझा लई जुना मित्र. प्रतिभा निकेतन शाळेपासून त्याची आणि माझी ओळख. शाळा झाल्यावर अकरावी आणि बारावी आमचं कॉलेज चेंज झालं, पण नंतर इंजिनियरिंगला परत सोबतच आलो. 

आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चौधरी शांत माणूस. जास्त बोलणं नाही, बडबड नाही, थिल्लरपणा नाही. राहणीमान एकदम व्यवस्थित. कपडे टाईम टू टाईम धुतलेले, धुतल्यावर लगेच इस्त्री करून ठेवलेले, आणि इस्त्री झाली की पेटीत भरून ठेवलेले. 

बाय द वे, पेटी उचकने आणि वरचे कपडे खाली आणि खालचे कपडे वर ठेवणे हा चौधरीचा छंद! तसा चौधरी वीकेंडला आमच्यासोबत नसतोच, गुणी बाळासारखा सगळ्या नातेवाईकांना भेट देऊन येत असतो. पण चुकून एखादा वीकेंड रूमवर घालवावा लागला, आणि करमत नसेल तर चौधरी लगेच bag कडे पळतो आणी उचका उचकी सुरु!

चौधरीला तशी मोबाइल किंवा हाय टेक वस्तूंची हौस नाही. आपला जुनाच नोकिया फोन वापरत असतो, आणि त्याचा वापर सुद्धा लिमिटेडच. फार फार तर कॉल करणे किंवा एसएमएस करणे, इंटरनेट तर फार दूरची गोष्ट. एके दिवशी चौधरी असाच माझ्याकडे आला आणि म्हनला 'अबे, फोनची बेटरी गेली वाटतं! खूप लवकर डिस्चार्ज व्हायला' मी म्हणलं लवकर म्हणजे किती? '२ दिवसात एकदा चार्ज कराव लागायले'… तर असा धन्य कार्यकर्ता!

चौधरीला आमच्यासारख्या लांब पल्ल्याच्या ट्रिप्स झेपत नाहीत, लोहगड सोडला तर मला तरी नाही आठवत की चौधरी आमच्यासोबत कुठं आलाय (बाय द वे, लोहगड म्हणजे लांब पल्ला नाही). चौधरीची गाडीपण व्यवस्थित ठेवलेली असते, मला वाटत की तीच गाडी शोरूम मध्ये ठेवली असती तर खराब झाली असती, पण चौधरी नियमित काळजी घेतो म्हणून आजपर्यंत टिकून आहे, आणि गाडीची फायरिंगसुद्धा जशीच्या तशीच आहे! नाहीतर आमच्या गाड्या पहा, रोज वापरात असून सुद्धा धूळ खात पडलेल्या असतात आणि निष्काळजीपणाच्या चालवण्याने इंजिनची माय-बहिण झालेली आहे ;)

घरचं जेवण चालू असतानाच चौधरींनी ढेरी कमावली आहे, आणि आता झिजवायचा प्रयत्न चालू आहे. म्हणूनच चौधरींचं जेवण एकदम मोजून मापून. त्यातल्या त्यात जिममध्ये हाड मोडेस्तोवर व्यायाम, पण परिणाम शून्य!

बर, बाकी पोट्टे ऑफिसला जाताना जीन्स, टी-शर्ट घालतात. पण चौधरी प्रॉपर फ़ोर्मल कपडेच घालून जातात. दर दोन दिवसाला शेविंग केलीच पाहिजे, नख कापलेच पाहिजेत, बुटांची पॉलीश केलीच पाहिजे! चष्म्याची व्यवस्था गाडीतच! गाडीच्या बॉक्समध्ये गॉगल आणि साधा चष्मा सापडायलाच पाहिजे. दिवसा गॉगल वापरायचा आणि संध्याकाळी येताना साधा चष्मा वापरायचा हे ठरलेले नियम!

महत्वाची गोष्ट म्हणजे चौधरीचा दिमाग लई तल्लख, कुठलीही गोष्ट त्यांना एकदा सांगितली की ती झालीच म्हणून समजा! मग ते दुकानातून कुठलं सामान आणणं असो, की चतुर्थीला गणपती मंदिरात जाणं असो. चौधरीला सगळं लक्षात राहतंय. यावरून आठवलं, चौधरी गणपतीचा निस्सीम भक्त! दगडूशेठ गणपतीला नियमित वारी असतेच, पण समजा चतुर्थी वीकडेला आली आणि जाणं झालं नाही तर कमीतकमी गल्लीतल्या गणपतीचं दर्शन घेऊनच येतो.

एटीएम आणि चौधरींची खूप दुष्मनी. चौधरी सहसा स्वतःसोबत एटीएम कार्ड ठेवतच नाहीत. महिन्याच्या सुरुवातीला एकदाच एटीएम मधून पैसे काढायचे हा उसूल!

डक्क्या सारख्या पोराला आम्ही बोलतं केलं, पण चौधरी लई अवघड माणूस! तसा चौधरी कधी कधी गप्पा मारतो, पण लई क्वचित. सहसा त्याचा बोलायचा मूड असेल तरच गप्पा चालतात, नाही तर टीवी लावून बातम्याच बघतो.

चौधरी पुराणात इतकंच! चौधरींचा एक फोटो चिकटवून ४ शब्द संपवतो!
-पी. के.