एक आटपाट नगर होतं. आटपाट नगराला सुंदर राजपुत्र होता. खूप गुणी आणि सालस होता. संपूर्ण नगर त्या राजपुत्राचे गुणगान गाण्यात मग्न असायचं, खरं तर त्याची जेवढी स्तुती (तुती) करावी तेवढी कमीच. राजपुत्राचे बालपण गाण्यात, मजा मारण्यात आणि हुंदडण्यात चालले होते.
परंतु राजाला आपल्या राजपुत्राच्या भविष्याची चिंता होती. राजपुत्राने बारावीमध्ये चांगले गुण मिळवताच राजाने राजपुत्राला इंजिनियरिंगला भरती करायचं ठरवलं. इंजिनियरिंगचं विद्यापीठ बरंच दूर असल्यामुळे राजपुत्राला एक रथ घेऊन दिला. राजपुत्र खूपच गुणी असल्यामुळे त्याला तो रथ कितीही आवडला नसला तरी तसं दाखवलं नाही. पित्याचा मान राखण्यासाठी किंवा पित्याची अवज्ञा होऊ नये म्हणून नित्यनेमाने त्याच रथातून शिकण्यासाठी जायचा. खरं सांगायचं तर रथाचा घोडा खूप क्षीण व म्हातारा होता. म्हणून व्हायचं असं, की राजपुत्राला कितीही वाटलं तरी तो रथ जोरात पळवू शकायचा नाही. तसेच, कधी कधी एखादा जाड मित्र रथात बसला कि त्याचा घोडा "पिचकायचा". एव्हाना राजपुत्राने रथाचे नामकरण सुद्धा केले - "टोबो".
राजपुत्र एव्हाना शिक्षणामध्ये पुरता मग्न झाला. ध्यानी-मनी, उठता-बसता अभ्यास चालू असे. राजपुत्राचा अभ्यास पाहून राजाला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटे.
परंतु नियतीला हे बहुतेक मान्य नसावं. राजाच्या स्वप्नांवर जणू विरजणच पडलं. राजपुत्राच्या वर्तणुकीत बदल व्हायला लागले, इंजिनियरिंग त्याच्या चालण्या-बोलण्यात भिणायला लागली. जो राजपुत्र आजपर्यंत पित्याच्या शब्दाबाहेर नव्हता तोच राजपुत्र आज पित्याला हे सांगत होता कि धूम्रकांडीच्या एका टोकाला विस्तू आणि दुसऱ्या टोकाला मूर्ख माणूस असतो. राजाने वेळीच आवर घालायचा प्रयत्न केला, आजही ती घटना राजपुत्रास नीट आठवते आणि त्याचे गाल-कान दुखून येतात.
इंजिनियरिंगचं पहिलं वर्ष राजपुत्राने गंमतीत घेतलं, म्हणून त्याला परीक्षा अवघड गेली. परंतु शेवटी तो राजपुत्रच! हार तो कसली मानणार? त्याने स्वतःच्या अंगात नवसंजीवनी संचारून घेतली, परत नव्या जोशाने प्रयत्न सुरु केले. मग काय! कसली ती परीक्षा, तिचा काय टिकाव लागणार राजपुत्रासमोर?
ह्या सगळ्या घडामोडींमध्ये राजपुत्राचे जुने मित्र हरवले. परंतु आपला राजपुत्र खूप मनमिळावू होता (उगाच का लोक त्यांचे गुणगान गातात?) त्याने परत नवीन मित्र जमवले. यावेळी मागच्यापेक्षा दुप्पट आणि मागच्या पेक्षा तीनपाट. सगळे एका पेक्षा एक कलांमध्ये पारंगत. कुणी क्रिकेटमध्ये तर कुणी कोडींगमध्ये, कुणी अभ्यासात तर कुणी सी. डी. राईट करण्यात, कुणी शरीरसौष्ठव तर कुणी श्रवणगुणांमध्ये पारंगत. राजपुत्राने या सर्वांसोबत मैत्री जोपासली आणि वृद्धिंगत केली. ही मैत्री इतकी दृढ होती, की राजपुत्र आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून सगळ्या विषयांचा अभ्यास करून घेई आणि त्यांना पारंगत करे. या सर्व प्रकारात त्यास स्वतःस परीक्षेत कमी गुण मिळाले तरी त्यास त्याचे दुःख नसे.
पहिल्या वर्षानंतर राजपुत्राने अपयशाला कधीही जवळ फिरकू दिले नाही. प्रत्येक वर्षी उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि राजपुत्राने इंजिनियरिंग हाहा म्हणता पूर्ण केली. कथेत राजपुत्राच्या प्रोजेक्टबद्दल न लिहिल्यास कथा अपुरी राहील.
मोठमोठ्या संकटांशी चार हात करण्यास राजपुत्रास फार आवडे. म्हणून त्याने आणि त्याच्या सवंगड्यांनी कुणासही जमणार नाही असा विषय घेतला आणि त्यावर त्यांचा प्रोजेक्ट चालू झाला. राजपुत्राच्या काळात त्यांना अशी टेक्नोलॉजी हवी होती की ज्यात तुम्ही एक छायाचित्र द्यायचं आणि संगणक तुम्हाला तशीच किंवा त्याच प्रकारची दुसरी छायाचित्रं देईल. निरनिराळ्या भाषांचा वापर करून झाला, परंतु राजपुत्राचे उद्दिष्ट काही सध्या होईना. परंतु त्याने एकदा शब्द दिला तो दिला, आता माघार घेणे नाही. राजपुत्राला तोच प्रोजेक्ट बनवायचा होता, मग सवंगड्यांशी युद्ध झाले तरी चालेल. याची देही याची डोळा घमासान युद्ध पाहिले आहे आम्ही. याच जिद्दीमुळे राजपुत्राने त्याच्या सवंगड्यांच्या साथीने तोच प्रोजेक्ट पूर्ण केला आणि इंजिनियरिंगचा गड सर केला.
राजपुत्राची कहाणी अजून बरीच आहे, परंतु या अध्यायात एवढं पुरे.
-पी. के.
1 comment:
प्रसाद,
लिहित रहा …
Post a Comment