Saturday, November 17, 2012

वाघ

आधी आम्ही नांदेडच्या सिडको मध्ये राहायचो. आधी म्हणजे मी बराच लहान होतो तेव्हाची गोष्ट.
त्या काळी नांदेडमध्ये शिवसेनेची चलती होती. आ. प्रकाश खेडकरसारखे नेते शिवसेनेत होते. जागोजागी शिवसेनेचे बोर्ड असायचे. त्यावेळी फ्लेक्स प्रिंटींग वगैरे काही नव्हत्या, ओईल पेंट मध्ये सगळे बोर्ड बनवले जात. एका बाजूला पिवळ्या आणि काळ्या रंगाने बनवलेला वाघ आणि दुसऱ्या बाजूला श्री. बाळासाहेब ठाकरे.

त्या वयात जास्त काही कळायचं नाही, पण एवढं नक्कीच माहित होतं कि हे चांगलंच मोठं व्यक्तिमत्व आहे. एवढं मोठं नाव, कि ज्यांच्या एका शब्दावर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठायचा. कधी चुकून बाळासाहेबांवर कुणी प्रक्षोभक विधान केलं तर अख्खा महाराष्ट्र बंद व्हायचा. तेव्हा एवढंच कळायचं- शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे, आणि बाळासाहेब म्हणजे वाघ.

नंतर जसं जसं कळायला लागलं तसं तसं बाळासाहेबांबद्दल वाचायला मिळालं, ऐकायला मिळालं. प्रत्येकाचे वेगळे राजकीय मत असतात, पण मी स्वतः बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होतो, राजकीय असो किंवा वैयक्तिक. त्यांची भरपूर राजकीय भाषणे ऐकली आणि भरपूर लोकांकडून बाळासाहेब एक "माणूस" म्हणून कसे आहेत हे हि ऐकलं. त्यामुळे एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा पटायचे, आणि एक माणूस म्हणून सुद्धा.

जेव्हा कधी बाळासाहेब टी.व्ही.वर बोलायचे, तेव्हा मी आणि माझे रूम पार्टनर आवर्जून ते भाषण ऐकायचो. त्यांची एक अलग स्टाईल होती, मी अजून तरी असा रोखठोख बोलणारा नेता पाहिला नाही. 

परवा दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच भाषण ऐकलं, आणि त्यांचा थकवा स्पष्ट जाणवला. पण ते एवढ्या लवकर सोडून जातील असं वाटलं नाही. १९६६ पासून मराठी माणसांसाठी लढणारा वाघ काल सोडून गेला.


बाळासाहेबांना विनम्र आदरांजली.

-पी.के.

2 comments:

Panchtarankit said...

साध्या सोप्या भाषेत तुम्ही तुमचे मनोगत लिहिले म्हणून आवडले.

Unknown said...

निनाद, अभिप्रायाबद्दल धन्यवाद!