पोस्टचं नाव वाचून तुम्हाला वाटल की आम्ही गोव्याला जाऊन आलो, आणि आता मी गोव्यातल्या गोष्टी सांगणार आहे. गलत!
झालं काय, की मागच्या एपिसोड (ब्लॉग पोस्ट) मध्ये मी बोललो होतो ना, की महाबळेश्वरवरून माणगावला जाताना डक्क्याने गाडी गोवा हायवेने घेतली होती. त्या वेळी मी, बारक्या आणि भैऱ्याने स्वप्न रंगवलं. डक्क्याची कार, डक्क्या आणि आम्ही तिघं असा प्लान होता. असंच डिसेंबरमध्ये जाऊ बोललो होतो.
पण दिवाळीत डक्क्यानं आमच्या आनंदावर विरजण घातलं. घरी कार घेऊन गेलं आणि तिथंच ठेऊन आलं! काय शिव्या खाल्ल्या त्यानं, विचारू नका.. भैरं तर येता जाता त्याचं डोकं खायलय!
एक उदाहरण सांगतो. परवा 'दिल चाहता है' पाहू लागलो. डक्क्या बाजूलाच बसलं होतं. पिक्चर थोडा पुढे गेला आणि ते तिघं गोव्याला निघतात. लगेच मी आणि भैऱ्याने पिक्चर ठेवला बाजूला, आणि डक्क्याला घेतलं.
"मायला रे.. बघा ते पोट्टे गोव्याला चालले.."
"आमचे मित्र बघा.. असलेली गाडी घरी ठेऊन येतेत"
"आमचं गोवा जायचं स्वप्न बहुतेक स्वप्नंच राहील.."
"आमच्याकडे गाडी असती, तर पोट्यांना दुनिया दाखवून आणली असती.."
हे तर झालं त्या दिवशीचंच! एरव्हीसुद्धा डक्क्याला ही डोकेदुखी झालीय.
परवाच आम्ही 'बसलो' होतो. कधी नाही ते डक्क्यापण आलं त्या दिवशी. सहजंच कोणीतरी गोव्याचा विषय काढला आणि झालं.. मग काय.. अर्धा तास तेच चाललं. दुसऱ्या दिवशी पाजी मला सांगू लागला 'अबे, त्याला एवढं घेत जाऊ नका... काल चिडल होतं ते'
आमचा पाजी लई ग्रेट माणूस. ह्याबद्दल डक्क्याला विचारलं तर ते म्हणलं 'मला कधी तरी रागात येताना पाहिलंय का? पाजी काही म्हणते'
तर डक्क्यानं राग मानून घेतला नाहीच, पण नांदेडला गेल्यावर त्यानं माझ्यासाठी सेकंड हेंड कार मात्र पाहिली. मी त्याला नेहमी म्हणत असतो, तुझी कार विक बे मला.. तू नवीन घे. चुकून घरी म्हणलं काय कि ते.. घरच्यांनीच माझ्यासाठी दुसरा ऑप्शन दिला :)
तर असं आहे ते.. लोकांना वाटते मजा आहे.. बघू, गोवा कधी नशिबात लिहिलाय!!
-पी.के.