आम्ही झांबरे निवास मध्ये राहायचो, तेव्हाची गोष्ट आहे. उन्हाळा लागलेला, आणि वीकेंड असायचा. बारकं, पाजी, भैरोसिंग आणि अन्या सोबतच असायचे. डोईफोडे आणि पतंगे साहेब देशाबाहेर गेलेले, म्हणून त्यांचा इथ संबंध आलाच नाही. अरे हो, सोबत गुळ्या पण असायचं. आता ते पण देशाबाहेर गेलंय.
सकाळ व्हायची ते गुळ्याच्या मोठ्या आवाजातल्या गाण्याने. एक एक करत मी, अन्या, बारीक, भैरोसिंघ उठायचो. मग हळूच (म्हणजे आरामात) नाश्ता व्हायचा. परत तीन मजले चढून वर आल्यावर सगळे अंग टाकायचे, आणि काय कराव काय कराव विचार विनिमय व्हायचा.
भैरोसिंघांना काही काम नव्हतं. घर त्यांच्यानी सुटत नव्हतं. पत्त्यांचा कॅट तिथेच पडलेला असायचा, तो उचलून रम्मी किंवा चालेंजचा डाव मांडायचा. नंतर नंतर हा आमचा रोजचा कार्यक्रम झाला.
असंच एका वीकेंडला डक्क्याला घातलेली हुज्जत कामी आली, आणि डक्क्या रूमवर आला. सुरुवातीला त्याला कळेना, आम्ही काय खेळतोय ते. नंतर थोडं कळल्यावर तो पण आमच्या डावात सामील झाला.
पत्त्यांचे नाव ठरलेले होते.
१- एक्का
२- दुर्री
३- तिर्री
४- चव्वी
५- पंजा
६- छक्का
७- सत्ता
८- आठ्ठी
९- नववी/ नऊली
१०- दहेली
J- गुलाम
Q- राणी
K- राजा
चालेन्ज्ला सहसा अन्या कडे सगळ्यात जास्त पत्ते असायचे. आम्ही हरामी, ब्लफ केलं नाही तरी असे एक्स्प्रेशन आणायचे की त्याला ब्लफ वाटायचं आणि चालेंज करायचा. घे सगळे.
गुळ्या पण काही कमी नव्हतं. पाजी सगळे पत्ते सोडून लवकर मोकळा व्हायचा. डाव मी, बारीक, भैरोसिंघ, आणि अन्यामधेच जास्त वेळ चालायचा.
त्या दिवशी डक्क्या आमच्या गटात सामील झाला, आणि पत्ते टाकताना आम्हाला पंजासाठी नवीनच शब्द कळला-- "घ्या.. पाच पच्चे!"
सगळ्यांनी पत्ते फेकले आणि हसून हसून लोळत पडले. आजही डक्क्या भेटला, तर त्याला डक्क्या ऐवजी लोक, काय पच्चे, काय चालले? असं बोलतात!
आम्ही पण कधी पत्ते खेळू लागलो, तर ५ ला पंजा म्हणतात हे विसरलोत :P
-पी.के.