हा किस्सा मित्रांकडून ऐकला आहे. बारकं, श्रीकांत्या, हर्श्या आणि निख्या हे सेलू च्या सेहवाग च्या रूम वर गेले होते. सबमिशनचा टाईम होता, आणि नेहेमीप्रमाणे आमच्यापैकी एकाकडेही प्रिंटआउट नव्हत्या. मग तिथून प्रोग्राम लिहा, आणि प्रिंट आउट काढा असा कार्यक्रम ठरला. ठिकाण- सेहवागची रूम.
श्रीकांत आणि झोल दोघेहि प्रोग्राम करण्यात गुंग. आणि निख्याने दुकानातून प्रिंटर आणलं. एक प्रोग्राम झाला (किंवा झोलने कुठून ढापून आणला) कि निख्या टर्र टर्र प्रिंटींग चालू करायचा. एका प्रोग्राम चे १०-१५ प्रिंट्स व्हायचे. असं करत करत रात्रीचे ३-४ वाजले आणि एक एक करत सगळे झोपले.
एवढ्यात सगळ्यांसाठी अनपेक्षित प्रकार घडला. सक्काळी ४.३० - ५.०० च्या सुमारास भांड्यांचा ठन्न ठन्न आवाज येऊ लागला आणि थोड्या वेळात सेहवागने सगळ्यांना उठवलं. हातात ४-५ ग्लास चहा! आणि असं नाही की थोडा थोडा असेल.. फुल ग्लास भरून चहा. आता तुम्हाला वाटेल की सगळ्यांनी सेहवागचं कौतुक केलं असेल, नाही. आधीच थकलेले कार्टे.. खेकसले त्याच्यावर! "तुला काय वेळ बीळ कळते का नाही बे! आत्ता तर झोपलो होतो आम्ही!".. यावर सेहवागची प्रतिक्रिया--"अबे घ्या न बे! अबे घ्या ना बे! थोडा तरी प्या.. चांगला नाही लागला तर फेकून द्या"..
काही दिवसांनी सेहवाग सोबत राहायचा योग आला. तो दिवस आमचा पुण्यातला पहिला दिवस होता. जास्त काही माहिती नव्हती आणि आम्ही डेक्कनलाच अर्धा दिवस फिरत होतो. तो पर्यंत आत्या आणि बाकी कार्यकर्ते कर्वेनगरला रूम पाहून आले होते. आलिशान रूम होती ती, तो भाग वेगळा.
तर सांगायचा मुद्दा हा, कि आत्या आम्हाला तिकडे घेऊन जात होता. आम्ही पी.एम.टी. मध्ये चढलो.
मी, आतिश आणि एक मित्र थोडे समोरच्या सीटवर बसलो, आणि गजू आणि सेहवाग मागच्या. आत्या सुद्धा पुण्यात नवीनच होता. त्यामुळे कोथरूड पाशी आल्यावर त्याला असं वाटलं कि आपली रूम आली. म्हणून आम्ही उठलो आणि बस च्या दरवाज्या जवळ जाऊन थांबलो.
आमचा सेहवाग लई उतावीळ. त्याला वाटल कि आपला स्टोप आला आणि गज्याला घेऊन तो मागच्या दरवाज्याने उतरला. बस निघाली, आणि सेहवागला कळलं कि आम्ही पुढे जातोय. मग तो ओरडायला लागला. अये प्रसाद्या.. अये आत्या.. मला कोणीतरी आवाज देत असल्यासारखं वाटलं. मी आत्याला म्हणलो - "अबे, कोणीतरी आवाज देतंय आपल्याला".
आत्या- "इथ कोण ओळखीचं आहे आपल्या?"
इतक्यात सेहवाग बसला जोरात बुक्क्या मारायला लागला. बस मधल्या मुली घाबरल्या हा काय
प्रकार ते. बहुतेक त्यांना वाटलं असावं कि पुण्यात दंगल चालू झालीये.
तेव्हा माझं लक्ष बाहेर गेलं, आणि आत्याला म्हणलं--" अबे लवकर उतर नाहीतर लोक त्यांच्यासोबत आपल्याला पण झोडपून काढतील".
मग आम्ही ड्रायवर ची माफी मागून पटकन उतरलो आणि त्यामुळे आम्हाला ३-४ किलोमीटर पायी जाव लागलं.
तो दिवस आठवून आम्ही कित्येक वेळेस लोळून हसलोय..
फायनल वर्ष.. आणि युनिक्स! तुम्हाला आठवतात का हो प्रोसेस स्टेट्स?
असाच एक भोळा माणूस युनिक्स साठी एक्सटर्णल सबमिशन साठी आला. पटेल, डक्क्या आणि सेहवाग होते एकाच ग्रुप मध्ये. त्यांनी पटेलला प्रोसेस स्टेट्स विचारल्या आणि त्याने १-२ सांगितल्या. बाकीच्या डक्क्या ने सांगितल्या. आता बारी आली आमच्या सेहवागची. सेहवागला त्यातील फक्त एकच स्टेट माहिती होती आणि तो आत्यंतिक खुश होऊन झोम्बाई झोम्बाई म्हणत बसला आणि पटेल आणि डक्क्या हसून हसून बेजार!
बाहेर आल्यावर त्यांनी हा प्रकार सगळ्यांना सांगितला. किती लोक हसून खाली पडले, ते मोजायचं विसरलोच आम्ही!
अजून काही किस्से आहेत आमच्या सेहवागचे. सांगू असंच कधीतरी.
-पी.के.